प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
प्रकरण ३ रें.
ईजियन संस्कृति.
संस्कृतीचा इतिहास. - कालक्रमनिर्णयासंबंधानें ठाम मत देतां येत नाहीं. या संस्कृतीच्या ब्राँझ युगाचे ''इव्हॉन्सच्या'' मतें तीन मुख्य भाग पडतात व त्यांस मिनोआन अशीं नावें दिलीं आहेत. प्रत्येक मिनोआनचे तीन पोटभाग पाडलेले आहेत. पहिल्या मिनोआनच्या १ल्या पोटभागाच्या वेळच्या भांड्यासारखीं भांडी इजिप्त देशांत अबिडॉस गांवीं सांपडलीं यावरून या युगाचा काल ख्रिस्त पूर्व ४००० वर्षे असावा असें अनुमान संशोधक काढितात.
व्यापार. - येथील भांडीं मेलॉस इजिप्त व ग्रीक देशांत सांपडतात. व मेलॉसची उभी भांडीं क्रीट बेटांत आढळतात, यावरून या देशांचे व्यापारनिमित्तानें दळणवळण होतें असें दिसते.
मृतांची व्यवस्था. - शवास दगडाच्या पेटींत घालून पुरीत असत. पुढें एका खळग्यांत हाडें टाकीत. नंतर शवपेटिका व मधमाशीच्या घरासारखी षट्कोनी थडगीं प्रचारांत आलीं. मृतांबरोबर त्यांची हत्यारें, अन्नपाणी, उटणी, दागिने पुरीत असत. मृतांस जाळण्याची चाल असल्याचें कोणत्याहि काळांत दिसत नाहीं.
कलाकौशल्याचीं कामें. - ख्रिस्तपूर्व अडीच हजार वर्षांच्या सुमारास मातीच्या कामांत या लोकांनीं चांगलें प्रावीण्य संपादन केलें होतें. भाजलेल्या मातीचीं चित्रें करणें हस्तीदंत व पाषाणशिल्प याची कला या लोकांस अवगत होती. शोभेच्या भांड्यांवरील चित्रकाम, रत्नावरील खोदीव काम व जडावाचें काम हीं ह्या लोकांस चांगलीं माहीत होतीं.
या सुधारणेचें स्वरूप व उगम. - ह्या संस्कृतीस आलेलें महत्त्व व तिच्या वैशिष्ट्यमुळें आहे. ही संस्कृति अमक्या एका देशांत उदयास आली म्हणून हसि महत्त्व देत नाहींत, तर ही इतर तत्कालीन संस्कृतींपासून अनेक बाबतींत भिन्न असल्यामुळें व तिच्या आंगच्या विशिष्ट धर्मामुळें ही इतक्या मोठ्या पदवीस पोंचली आहे.
विशिष्ट धर्म. -
(१) या लोकांच्या लिपीचें दुसऱ्या कोणत्याहि लिपीशीं जवळ जवळ अगदींच कांहीं साम्य नाहीं.
(२) कला कौशल्याचीं कामें.
(३) वास्तुविषयक रचना व भूषणें.
(४) थडग्याचा आकार व ठेवण.
मिनोआन भाग दुसरा पोटभाग दुसरा या वेळच्या मातीच्या भांडयावरील नक्षीकामांत नागमोडीसारखा आकार प्रमुख आहे. अशाच प्रकारचें नक्षीकाम इजिप्त देशांत १२व्या घराण्याचे वेळीं आढळतें. यावरून या भागाचा काल ख्रिस्तपूर्व २५०० (अडीच हजार) वर्षे असावा. त्याचप्रमाणें इजिप्तमधील ''ख्यान'' राजाचें चित्र मीनोआन भाग दुसरा पोटभाग तिसरा यावेळच्या थरांत सांपडलें. या राजाचा काल ख्रिस्तपूर्व १९०० वर्षे धरतात. मिनोआन भाग तिसरा पोटभाग एक व दोन या वेळीं इजिप्त देशांत १८व्या घराण्याची सत्ता अथवा अंमल चालू होता. याचा काल (१६००-१४०० ख्रिस्तपूर्व) आहे.
कांस्य युगाचा शेवट व आयस युगाचा आरंभ या सर्वधानें नक्की असें कांहीं सांगतां येत नाहीं.