प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण ३ रें.
ईजियन संस्कृति.

पारमार्थिक कल्पना. - आजपर्यंत सांपडलेल्या सर्व समाधी राजवाड्यांत आढळल्या. यावरून धार्मिक सत्ता राजाकडे असावी किंवा राजेच धर्मगुरू असावेत. देवांविषयींच्या कल्पनांचा खालीं सांगितल्याप्रमाणें विकास झाला असावा प्रथम ज्यांवर पीकपाणी अवलंबून आहे अशा सृष्टींतील प्रमुख पदार्थांची उदाहरणार्थ, सूर्य, चंद्र, पर्वत, झाडें वगैरें यांची उपासना होई. त्याचाच अविशिष्ट संस्कार मनावर राहिल्यामुळें, झाडें, स्तंभ, परशु अशा वस्तूंस पूजेचा मान मिळत असला पाहिजे. यापुढें देवांच्या मूर्तीची पूजा प्रचारांत आली असावी. ही मूर्ति म्हणजे मानवी जननतत्त्वाचें एक स्वरूप होय. समान्यत: बहुतेक सर्व प्राण्यांस व वनस्पतींस पू्ज्य मानीत. ख्रि. पू. १५०० इतक्या प्राचीन ग्रीक लोकांची पारमार्थिक व धार्मिक विचारपद्धति व ही ईजियन लोकांची विचारपद्धति एकच असणें शक्य आहे. ईजियन समाज म्हणजे प्राचीन ग्रीकांच्या पूर्वजांचा समाज होय असें विरुद्ध पुरावा येईपर्यंत धरून चालण्यास हरकत नाहीं. अत्यंत प्राचीन ग्रीक पारमार्थिक विचार पुढें विवेचिले आहेत.