प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
प्रकरण ३ रें.
ईजियन संस्कृति.
राजकीय संघटना. - कीट बेटांतील राजवाडे व मायसीनी, टिरीन्झ व हिसारली येथील तटबंदी केलेले अंतरकोट हीं सर्व एका घराण्याच्या राहण्याच्या सोयीचीं दिसतात. हीं सभोंवतालच्या घरांत प्रमुख दिसतात. यांवरून येथें सर्व सत्ता राजाच्या हातीं असावी अशी संशोधकांची समजूत आहे. ख्रिस्तपूर्व दीड हजार वर्षांपूर्वी निरनिराळ्या ठिकाणीं झालेल्या कलांच्या वाढीवरून तेथें स्वतंत्र राज्यें असूं शकण्याचा संभव आहे. वरील कालानंतर सर्व सत्तेचें केंद्र क्रोसस येथें असावें असें अनुमान तेथें सांपडलेल्या खंडणीच्या नोंदीवरून निघतें.