प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
प्रकरण ३ रें.
ईजियन संस्कृति.
आतां यूरोपीय संस्कृतीच्या जनक अशा प्राचीन संस्कृतीचें विवेचन करतांना आग्नयीकडे सुरुवात करूं. जी संस्कृति यूरोपीय संस्कृतीच्या मुळाशीं होती ती प्रथम घेऊं. ही संस्कृति ईजियन होय. ही संस्कृति, इजिप्तची संस्कृति बाबिलोनी संस्कृति, चिनी संस्कृति व भारतीय संस्कृति या पांच स्वतंत्र संस्कृती आहेत. यांचा एकमेकांवर परिणाम झाला आहे. तथापि प्रत्येक संस्कृतीमध्यें इतक्या स्वतंत्र गोष्टी आहेत कीं त्यांस पृथकत्व दिलें पाहिजे.
ईजियन संस्कृति. - या नांवाचा उपयोग पाश्चात्यांच्या ऐतिहासिक कालपूर्वी होऊन गेलेल्या संस्कृतीचा निर्देश करण्याकडे करितात. ही संस्कृति ग्रीक संस्कृतीच्या आधीं होऊन गेली, म्हणून हिचें महत्त्व फार आहे. ह्या संस्कृतीचा ग्रीक लोकांवर परिणाम झाला. क्रीट बेटाचा इतिहास समजण्यास हिचा फार उपयोग होतो. या संस्कृतीची माहिती क्रीट बेटांत क्रोसस गांवीं शोधून काढिलेल्या पुराणवस्तूंवरून काढलेली आहे. ती बऱ्याच अंशी अनुमान स्वरूपाची आहे. ज्या अवशेषांवरून या संस्कृतीचें स्वरूप लक्षांत येतें, ते येणेंप्रमाणें.-(१) राजवाड्यासारख्या दिसणाऱ्या इमारतीचें भाग, त्याचप्रमाणें जुनीं घरें, थडकीं यांचे उकरून काढलेले अवशेष. (२) खांबांवर, भिंतीवर केलेलें नक्षीकाम, तसेंच शोभेकरितां ठेवलेल्या पदार्थांवरील रंगी चित्रकाम. (३) दगड, हस्तिदंत, धातू व रत्नें यावरील खोदीव, कातीव, उठावदार व रंगीत चित्रकर्म. (४) आयुधें, हत्यारें, आउतें हीं दगड, माती, ब्रांझ, व शेवटीं लोखंड यांचीं केलेली आढळतात. यांवर कधीं चित्रें काढलेलीं असतात व कधीं हीं रत्नजडीत असतात. (५) आंगावरील अलंकार. (६) सामानसुमान-(गृह्य) भांडीं लहान मोठीं, सिंहासनें, मेजें, आसनें, उपासनेसाठीं केलेल्या मूर्ति, शवपेटिका. (७) लेख-भाजलेली माती व रत्नें यावरील लेख. (८) उकरलेलीं थडगीं. (९) लोकोपयोगीं कामें-पूल, फरशी, रस्ते, गटारकाम. हा पुरावा संस्कृतींत आविष्ट होणाऱ्या वस्तूंचा होय. भौतिक अवशेषांखेरीज या संस्कृतीसंबंधानें पुरावा म्हटला म्हणजे (१) समकालीन सुधारणेचे उल्लेख व स्मारक चिन्हें. (२) होमरसारख्यांच्या ग्रंथांत या लोकांविषयीं केलेले उल्लेख आणि (३) परक्या लोकांच्या प्रचारांत अंशेंकरून शिल्लक राहिलेल्या पण त्या परक्यांच्या सुधारणेशीं विसंगत अशा ईजियन चाली, पंथ, विधि वगैरे होय.