प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण ३ रें.
ईजियन संस्कृति.

कालक्रमानुसार इतिहास. -ज्या लोकांनीं ईजियन संस्कृति नांवारूपास आणिली त्या लोकांचें पूर्वजांनी प्रास्तर युगांत फार प्राचीनकाळीं ईजियन समुद्राच्या आसपासच्या मुलुखांत वसाहत केली. या लोकांच्या डोक्याचा आकार भूमध्यसमुद्रावरच्या (उत्तर आफ्रिकेंतील) वंशांतील लोकांच्या डोक्यासारखा होता. क्रीट बेटांतील वसाहती, दुसऱ्या लोकांचा संसर्ग नसल्याचें व तेथील जमीन सुपीक असल्यामुळें लवकरच रानटी स्थितींतून बाहेर पडल्या. या बेटांत फार प्राचीन काळापासून संस्कृतीच्या प्रगतीस सुरुवात झाली व सुमारें २५०० (ख्रिस्तपूर्व) च्या सुमारास येथील तुरळक असलेल्या वसाहती एकवटल्या व त्यांमध्यें राजकीय सत्ता स्थापित झाली. धर्मासंबंधींचे अधिकार राजाच्या हातीं असत, असें वाटतें. त्यानें येथें एक मोठा दगडाचा राजवाडा बांधला. यास मांडलीक राजांकडून खंडणी मिळत असे. व्यापारासंबंधानें येथील लोकांचें इजिप्त देशाशीं दळणवळण होतें व या दोन देशांचा एकमेकांशीं मातीच्या भांडयाचा व्यापार चालत असें. येथें एका विशिष्ट प्रकारच्या लिपीची वाढ झाली.

तटबंदी वगैरे दृष्टीस पडत नाहीं यावरून या वेळीं या बेटांत शांतता नांदत असावी. सुपीक जमीन ताब्यांत ठेवण्याकरितां बेटाच्या निरनिराळ्या भागीं वसाहती स्थापन केल्या. यांचा व्यापारनिमित्तानेंहि उपयोग होत असें. येथील संस्कृति ख्रिस्तपूर्व १००० वर्षांपूर्वी कळसास पोचली. नंतर उतरत्या कळेस आरंभ झाला असावा.

याचवेळीं क्रीटबेटाबाहेरील वसाहतींच्या संस्कृतीवर या बेटांतील श्रेष्ठ संस्कृतीचा परिणाम झाला व पुढें कांहीं काळानें ईजियन संस्कृति जिकडे तिकडे एकाच स्वरूपाची झाली. व क्रीटमधील संस्कृतीस नवीन चलन मिळालें. इजिप्तसारख्या देशाशीं व्यापार वाढला. व ईजियन कलेचें अनुकरण दुसरीकडे पसरले. खंडणीच्या नोंदणीवरून या सुधारणेचें व सत्तेचें केंद्रस्थान क्रोसस गांवीं असावें. पण हा क्रीट लोकांचा वरचष्मा फार थोडा काल अस्तित्वांत असावा.

ख्रिस्तपूर्व १५००च्या सुमारास या बेटावर रानटी लोकांनी स्वारी करून यांच्या संस्कृतीची घडी मोडली, पण स्वत:च्या संस्कृतीच्या अभावामुळें त्यांनीं येथील संस्कृतीचा अंगीकार केला. यामुळें या संस्कृतीनें उचल खाल्ली व कला पूर्ववत होण्याचा रंग दिसत होता.

पण ही स्थिति फार काल टिकली नाहीं. आयसयुगाच्या आरंभीं पुन्हां रानटी लोकांच्या स्वाऱ्या झाल्या व या कारणानें जी यांची संस्कृति नष्ट झाली, तिचें मात्र पुनरुज्जीवन पुन्हां कधीं झालें नाहीं.