प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

परिशिष्ट.

सांगला हिल.
[जबाबदार अधिकारी-बॉस्वर्थ स्मिथ.]

लोकांच्या हातून घडलेलीं कृत्यें.- {kosh ही कृत्यें सांगला येथील लोकांनींच केली असें सरकारी चौकशींतहि सिद्ध झालेलें नाहीं असें दिसतें.}*{/kosh}  (१) सांगला व सालनवाला यांच्या दरम्यानच्या तारा तोडण्यांत आल्यां.
(२) सांगल्याजवळील सोमन स्टेशन जाळण्यांत आलें.
(३) एका शीख इसमानें एका लष्करी कैद्याची जबरीनें मुक्तता केली.

अधिकार्‍यांच्या हातून घडलेलीं कृत्यें.- (१) आरंभीं २१ पुढार्‍यांस पकडून कांहीं वेळ अडकवून सोडून दिलें.

(२) ता. २६ एप्रिल रोजीं आणखी धरपकड होऊन या लोकांनां २९ तारखेस सोडण्यांत आलें.
(३) ता. १२ मे रोजीं दहशत बसविण्याच्या उद्देशानें एका टेकडीवरून गोळ्या झाडण्यांत आल्या.
(४) त्याच दिवशीं १३ पुढार्‍यांची हातकड्या घालून धिंड काढली.
(५) ता. १३ मे रोजीं ६४ इसमांस पकडून, त्यांच्याच पागोट्यांनीं त्यांचे हात बांधून अत्यंत अप्रतिष्ठेनें त्यांची पोलीस ठाण्याकडे धिंड काढली.
(६) पन्नास हजार दंड द्याल तर तुमची सुटका होईल असें या लोकांस बजावण्यांत आलें होतें असें लोक म्हणतात.
(७) पकडलेल्या १२४ इसमांपैकीं ११६ जण सुटले व आठजणांस अगदीं तुटपुंज्या पुराव्यावरून सहा महिन्यांची कैद व १०० रुपये दंड अशा शिक्षा झाल्या.
(८) डॉक्टरकडून तपासणी न करवितांच क्षुल्लक कारणांवरून लोकांस फटके मारण्यांत आले.
(९) किंमत न देतां दुकानदारांजवळून जिन्नस उपटण्यांत आले.
(१०) संभावित माणसांकडून अधिकार्‍यांस पंख्यानें वारा घालवून घेतला व त्यांनां प्रहरच्या प्रहर उन्हांत तिष्ठत उभें रहावयास लाविलें.
(११) शाळेंतील मुलांस दररोज दिवसांतून चार वेळ हजिरीस बोलावून उन्हांत तळमळत ठेवलें व ‘महाराज, आम्हीं कोणताहि गुन्हा केला नाहीं व पुढें करणार नाहीं’ असें प्रत्येकाकडून वदवून घेण्यांत येत असे. या हालांमुळें बालमुकुंद नांवचा एक ७ वर्षांचा मुलगा पांचव्या दिवशी घरीं परत आल्यावर तडकाफडकी आजारी पडून मरण पावला.
(१२) अटकेच्या मुदतींत कैद्यांकडून पैसे घेतल्याशिवाय त्यांनां शौचास अगर लघवीसहि जाऊं देण्यांत येत नसे. यासाठीं दररोज २ रुपयेपर्यंत खर्च येत असे.
(१३) सरदारसिंग नांवाच्या इसमास तो खोटा पुरावा देईना म्हणून चार दिवस कोंडून ठेवण्यांत आलें.
(१४) लछमनदास नांवाच्या इसमानें मक्त्यानें घेतलेली सराई लष्करी कायद्याच्या अमदानींत लष्करानें आपल्या ताब्यांत घेऊन तेथें मुशाफर उतरविण्यास बंदी केल्यामुळें त्याला जागाभाडें व नोकरचाकर यांबद्दल दोन मिहने दरमहा १५० रुपये खर्च सोसावा लागला.
(१५) एक्स्ट्रा असिस्टंट कमिशनर व पोलिस इन्स्पेक्टर यांच्यासाठीं दूध मागण्यास आलेल्या इसमास दूध देण्यासाठीं एका इसमानें रात्री दुकानांत दिवा लावला या अपराधाबद्दल त्या व त्याला पकडून नेल्यावर त्याचा वडील भाऊ काय झालें याची चौकशी करण्याकिरतां घराबाहेर पडला म्हणून त्यास ५० रुपये दंड व ५ फटके अशी शिक्षा फर्मावण्यांत आली.
(१६) कांहीं कारण न सांगतां उगाच उन्हांत उभें राहण्याच्या शिक्षा देण्यात आल्या यामुळें कांहीं लोक आजारी पडले.
(१७) धाकदपटशानें, मारहाणीनें व उन्हांत उभें करून लोकांनां सरकारी साक्षीदार बनविलें; यांत कांहीं १० वर्षांचीं मुलें होतीं.