प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
परिशिष्ट.
पंजाबांतील प्रकार.
अमृतसर.
[जबाबदार अधिकारी-जनरल डायर]
सरकारी अधिकार्यांच्या व नोकरांच्या हातून घडलेलीं कृत्यें.- (१) नॅशनल बँकेचा माल पोलिसांच्या घरीं लपवलेला सांपडला. (२) शहरांतील विद्युत्प्रवाह बंद केले. (३) जालियांवाला बागेंत सभेसाठीं जमलेल्या लोकांवर १६५० गोळ्या झाडून कमींत कमी पांचशें लोक तरी ठार केले. तेथें मरून पडलेल्या किंवा जखमी झालेल्या लोकांची कोणतीहि व्यवस्था अधिकार्यांनीं केली नाहीं. व रात्रीं आठ वाजल्यानंतर घराबाहेर राहण्याचा हुकूम नसल्यामुळें लोकांनांहि ती करतां आली नाहीं. (४) एकंदर ५० इसमांवर पोटावर सरपटत चालण्याचा सक्तीचा प्रकार अंमलांत आणला. (५) शेरवुड बाईवर केलेल्या हल्ल्याबद्दल कोणत्या तरी सहा मुलांनां पकडून आणून त्यांनां प्रत्येकीं तीस तीस फटके मारले. (६) जे गोर्या लोकांस सलाम करण्यास चुकले त्यांचा निरनिराळ्या रीतीनें अपमान करण्यांत आला. (७) ९३ वकीलबॅरिस्टरांनां स्पेशल कॉन्स्टेबल बनवून त्यांच्याकडून २० दिवसपर्यंत साध्या शिपायाप्रमाणें काम घेतलें. (८) ३२६ लोकांनां तडकाफडकी कोर्टांकडून पुष्कळ प्रसंगीं खोट्या पुराव्याच्या आधारावर शिक्षा ठोठावण्यांत आल्या. कांहींनां तर देहांत शिक्षा देखील सुनावण्यांत आली. (९) शेंकडों लहानथोर लोकांस पकडून कबुलीजबाब देण्यासाठीं व खोट्या साक्षी देण्यासाठीं त्यांचे नानाप्रकारचे हाल करण्यांत आले. (१०) खासगी घरांत लष्करी ठाणें बसविणें लाथा मारणें प्रतिष्ठित लोकांस शिवीगाळ करणें, कैद्यांनां राहत्या कोठडींतच मलमूत्रोत्सर्ग करावयास लावणें, सात फूट लांब, दोन फूट रूंद व चार फूट उंच अशा लोखंडी पिंजर्यांत कोंडणें, दोघा दोघा कैद्यांचे हात एके ठिकाणीं बेडीनें अडकावून त्यांनां पायखान्यांत शौचास नेणें, जैन लोकांचें पवित्र स्थान भ्रष्ट करणें, गोर्या शिपायांनीं विहिरीजवळ लघुशंका व शौचविधि करणें, कैद्यापासून किंवा दुकानदारापासून मोबदला न देतां माल हिसकावून घेणें, गुडघ्याखालून हात घालून कान पकडून बसावयास लावणें, पागोटें हातांस बांधून झाडाला टांगून ठेवणें, रात्रभर उघड्या मैदानांत पडावयास लावणें उन्हांत उभें करणें, दाढी धरून ओढणें, खाटेच्याखालीं हात ठेवून त्यावर आठ आठ शिपाई बसविणें, अगदीं विष्ठामूत्र बाहेर येईपर्यंत गुदद्वारांत काठी खुपसणें, असले प्रकार करण्यांत आले.