प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
परिशिष्ट.
पंजाबांतील प्रकार.
अमृतसर.
[जबाबदार अधिकारी-जनरल डायर]
लोकांच्या हातून घडलेलीं कृत्यें.- [लोक क्षुब्ध होण्याचीं कारणें-डॉ. किचलू व सत्यपाल यांची उचलबांगडी. यासंबंधांत डेप्युटी कमिशनकडे दाद मागण्यास जात असलेले लोक त्यांनां पोलिसांनीं अडविलें असतां तसेंच पुढें जाऊं लागले तेव्हां त्यांच्यावर गोळीबार केला गेला; या गोळीबारानें कित्येक लोक मरून पडले व कित्येक जखमी झाले.] लोकांनीं (१) लष्करी लोकांवर दगड फेंकले. याचें उत्तर म्हणून लष्करी लोकांनीं ताबडतोब गोळ्या झाडून वीस मुडदे पाडले व कित्येकांस जखमी केलें. यानंतर लोकांनीं (२) नॅशनल बँकेची नासधूस केली आणि चार्टर्ड व अलायन्स बँकांवर हल्ला केला. (३) टाउन हॉल, पोस्ट ऑफिस, मिशन हॉल व भगतनवाला रेलवे स्टेशनचा कांहीं भाग जाळून फस्त केला. आणि (४) मिस शेरवुडवर हल्ला केला व पांच यूरोपीयांचे खून केले.