प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

परिशिष्ट

काँग्रेसची बदलेली वृत्ति- खिलाफत व पंजाब प्रकरणें.

खिलाफत व पंजाब.

म. गांधींच्या *असहकारितेच्या चळवळीस जोर आणण्यास आणि कांग्रेसची वृत्ति एकदम पालटून ज्या कांहीं गोष्टी कारण झाल्या आहेत त्यांचें वर्गीकरण बाह्य व अंतःस्थ असें दोन तर्‍हेनें करतां येतें. बाह्य कारणांत जगाचा सर्वसामान्य इतिहास येतो. यामध्यें आयर्लंडमधील चळवळ, इजिप्तची चळवळ व दक्षिण आफ्रिकेंतील पुनरुज्जीवित झालेली चळवळ या गोष्टी येतील. खिलाफतीचा नाश हें तर असहकारितेस प्रत्यक्ष कारण म्हणूनच गांधींनीं पुढें मांडले आहे. हें सर्वांत महत्त्वाचें बाह्य कारण समजलें पाहिजे. अंतःस्थ कारणांत सर्वांत महत्त्वाचें कारण म्हणजे पंजाबप्रकरण होय.

खिलाफतीसारख्या बाह्य प्रश्नास हिंदुस्थानांत महत्त्व येण्यास कारण झालेली पूर्वींची चळवळ म्हणजे पॅन-इस्लामिझम होय. या चळवळीस, म्हणजे मुसुलमानी देशांमध्यें बंधुत्व अधिकाधिक वृद्धिंगत व्हावें व मुसुलमानी संस्कृतीचें संवर्धन व्हावें या चळवळीस, कांहीं सरकारी अधिकार्‍यांनीं उत्तेजनच दिलें होतें. त्या वेळेस पॅन-इस्लामिझमच्या चळवळीस मदत करणें म्हणजे राष्ट्रीय तत्त्वास झुगारणें होतें. आतां सुलतानाची शक्ति पार नष्ट झाली आहे आणि यामुळें या चळवळीपासून भारतीय राष्ट्रीयत्वास धक्का पोंचण्याचे दिवस गेले अशी म. गांधी वगैरे पुढार्‍यांची समजूत झालेली दिसते. तुर्कस्तानाच्या सत्तानाशाचा सनदी लेख म्हटला म्हणजे नुकता (ता. १० आगस्ट १९२०) दोस्तांचा तुर्कांशीं झालेला तह होय. या तहाचा गोषवारा खालीं दिला आहे.