प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
परिशिष्ट.
गुजरणवाला.
[जबाबदार अधिकारी.- १ कर्नल ओब्रायन, डेप्युटि कमिशनर. २ हेरॉन-पोलीस सुपरिटेंडंट.]
लोकांच्या हातून घडलेलीं कृत्यें.- [लोकक्षोभाचीं कारणें.- हिंदु देवालयांच्या आसमंतांत मारून टाकलेलें वासरूं व डुकर; आणि मागाहून पोलिसांनीं झाडलेल्या गोळ्या.] १ गुरुकुलजवळच्या रेल्वे पुलास आग लावण्याचा प्रयत्न केला.
२ चर्च, पोस्ट ऑफिस, तहसील कोर्ट व रेल्वे स्टेशन हीं सर्व जाळून टाकलीं व याखेरीज आणखी कांहीं नासाडी केली.
अधिकार्यांच्या हातून घडलेलीं कृत्यें.- (१) कच्ची पुलापाशीं लोकांवर गोळ्या झाडून कित्येक लोक मारले.
(२) लोकांनीं केलेल्या जाळापोळींत पोलिसचेंहि बरेंच अंग होतें.
(३) दंगा शांत झाल्यानंतर निरपराधी लोकांवर व खालसा बोर्डिंग हाऊससारख्या ठिकाणीं बाँब टाकले.
(४) डिफेन्स ऑफ इंडिया कायद्याखालीं वकील, बॅरिस्टर वगैरे बहुतेक सर्व पुढारी लोकांस पकडण्यांत आले. यांमध्यें दंगेखोर लोकांस ज्यांनीं शांत करण्याचा प्रयत्न केला होता असेहि कांहीं लोक होते. कित्येकांस खटला न करतां कित्येक दिवस अटकेंत ठेवण्यांत आलें.
(५) जोडी जोडीनें बेड्या घालून व सर्वांस एका सांखळीनें बांधून या पुढारी लोकांची रस्त्यांतून धिंड काढली. एका गृहस्थास रेल्वनें नेत असतां त्याला लघुशंकेस जाऊं न देतां बसल्या जागींच लघुशंका करण्यास सांगितलें.
(६) लष्करी कायद्याच्या अमदानींत लोकांस फटके मारण्यांत येऊन दुसर्या कित्येक अपमानकारक शिक्षा करण्यांत आल्या.
(७) गाडींतून किंवा घोड्यावरून जाणार्या लोकांनीं गोरा माणूस पाहतांच खालीं उतरून व छत्री मिटून त्यास लवून नमस्कार करावा असा हुकूम सोडला.
(८) तसें करण्यास कोणीं चुकून विसरला तर त्यास चाबकाचा मार खावा लागे.
(९) संभावित लोकांस बाजारांतील गटारें साफ करण्यास लावलें.
(१०) मार्शल लॉ कोर्टापुढें बहुतेक सर्व पुरावा बनावट तयार करून मांडला.