प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
परिशिष्ट.
मनीयानवाला.
[जबाबदार अधिकारी-बॉस्वर्थ स्मिथ].
लोकांच्या हातून घडलेलीं कृत्यें.- [लोकक्षोभाचे कारण-अमृतसर येथें घडलेल्या हकीकतीचीं लोकांनीं ऐकलेलीं अतिशयोक्तिपूर्ण वर्णनें.] (१) धावनसिंग स्टेशन लुटले व जाळले.
अधिकार्यांच्या हातून घडलेलीं कृत्यें.- (१) जाळपोळ झाल्यावर तीन दिवसांनीं मनीयानवाल्यावर तोफा रोंखण्यांत आल्या.
(२) कांहीं शिपाई स्टेशनवरून बार काढीत गांवाकडे गेले. या गोळीबारानें एक मनुष्य ठार, एक जन्माचा व्यंग व कित्येक जखमी झाले. या गोळीबारानें कित्येक बायका घरें सोडून पळून गेल्या. त्यांत कांहीं गरोदर होत्या.
(३) अत्तरसिंग लंबरदराच्या घराचा झाडा घेतला व कपाटं फोडून रोख रक्कम व चीजवस्तू लांबवली. त्याचें वय आज ११५ वर्षांचें असून तो नेहमीं अंथरुणावर बसून असतो. त्याला स्टेशनवर नेऊन लोखंडी वाघणींत कांहीं दिवस कोंडून ठेविलें. त्या ठिकाणीं त्यास अन्नपाणी नीट मिळत नसे. ते उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळें ती वाघीण दिवसा उन्हानें तापून तेथें राहणें असह्य होत असे.
(४) मुनसी नबाबदीन व लेन्हासिंग यांनां खूप चोर दिला.
(५) गांवापासून कांहीं मैल दूर असलेल्या बंगल्यावर आठ वर्षांवरील सर्व माणसें जमल्यावर बॉस्वर्थ स्मिथ घोड्यावर बसून गांवाकडे आला, व गल्लोगल्लीं हिंडून सर्व बायकांस घरांतून बाहेर बोलाविलें व कित्येकजणींस काठ्या मारीत बाहेर काढलें. या बायाकांनां त्यानें चावडीपाशीं उभें केलें. बायकांनीं त्याच्यापुढें हात जोडले, पण त्यानें त्यांस काठ्या लगाविल्या, त्यांच्या अंगावर व तोंडावर थुंकला, त्यांनां नाहीं नाहीं त्या शिव्या दिल्या, त्यांचें बुरखे काढले, त्यांनां गाढवी, कुत्र्या, डुकरिणी माशा वगैरे शिव्या दिल्या. तुम्हीं आपल्या नवर्यापाशीं अंथरुणावर निजला असतांना नवर्यांस असलीं दुष्कृत्यें करण्याकरितां घरांतून बाहेर कसें जाऊं दिलें इत्यादि अश्लील प्रश्न विचारिले. त्यांनां खालीं वांकून पायांतून हात घालून कान धरण्याचा हुकूम केला व एकीला तर त्यानें लाथहि मारली.
(६) ऐंशींएक गांवकर्यांस पकडून त्यांस नाना प्रकारचा त्रास देण्यांत आला. अटकेंत असतां जें अन्न सरकारनें पुरवावयाचें त्याचा खर्च गांवकर्यांपासून चोपून वसूल करण्यांत आला; खोट्या साक्षी देण्याची त्यांजवर सक्ती झाली; त्यांनां फटके लगावण्यांत आले; त्यांच्यावर प्युनिटिव्ह पोलीस बसविण्यांत आले; मार्शल लॉ कमिशननें खटले चालवून काळ्या पाण्यासारख्या शिक्षा ठोठावल्या.
(या शिक्षा पुढें कमी झाल्या व बादशाही जाहिरनाम्यानें त्या माफहि झाल्या).
लष्करी कायदा एकंदर पांच जिल्ह्यांत लागू केला होता. ते जिल्हे अमृतसर, लाहोर, गुजरणवाला, लियालपूर व गुजरात हे होत. या कायद्याची अंमलबजावणी दोन महिने चालू होती. या कायद्याची मुहूर्तमेढ जालियनवाला बागेंत निरपराधी लोकांच्या कत्तलीनें भिजलेल्या मैदानांत रोंवण्यांत आली. काँग्रेसनें नेमलेल्या पंजाब-चौकशी-कमिटीला मिळालेल्या आंकड्यांवरून पाहतां पंजाबांत एकंदर १२०० जीवांची हत्या घडली व ३६०० इसम जखमी व त्यांपैकीं कांहीं जन्माचे जायबंदी झाले. याशिवाय लष्करी कायद्याच्या नांवाखालीं हजारों लोकांचा अनन्वित छळ झाला तो वेगळाच.
कांग्रेस सबकमिटीनें सदरील ‘अन्यायांचें परिमार्जन होण्याकरितां, राज्यकारभाराची शुद्धता होण्याकरितां व असली बेबंदशाही पुन्हां न होण्याकरितां’ जे उपाय सुचविले ते येणेंप्रमाणें :
(१) रौलॅट कायद्याचें उच्चाटन (२) सर मायकेल ओडवायर ह्याचे अधिकार काढून घेणें (३) जनरल डायर, कर्नल जॉनसन, मि. बॉस्वर्थ स्मिथ, रायसाहेब श्रीरामसद आणि मलिकसाहेब खान ह्यांस नोकरीवरून कमी करणें (४) कमिटीपुढें आलेल्या पुराव्यावरून ज्यांचे अपराध सिद्ध होत आहेत अशा किरकोळ अधिकार्यांच्या गुन्ह्यांची चौकशी करून त्यांचे गुन्हे खरे ठरले तर त्यांस बडतर्फ करणें (५) व्हाइसरायांस परत बोलविणें (६) स्पेशल ट्रायब्यूनला आणि समरी कोर्टांनीं ज्या इसमांस दंड केला त्यांचा दंड त्यांस परत देणें, ज्या शहरांवर दंड बसविण्यांत आला त्यांस तो माफ करणें. वसूल केलेला दंड परत देणें आणि प्युनिटिव्ह पोलीस कमी करणें.
या सूचनांचा कांहींहि उपयोग झाला नाहीं. जनरल डायर यास जरी हिंदुस्थानांतून परत बोलाविलें तरी त्याचा पगार कित्येक दिवस चालूच राहिला व पुढें त्यास पेन्शन मिळावें असें ठरलें. नंतर नुकताच त्याचा राजीनामा घेण्यांत आला. पंरतु पंजाबप्रकरणाबद्दल जेव्हा पार्लमेंटमध्यें वादविवाद झाला तेव्हां ब्रिटिश लोकांचें ‘डायरी’ मत उघडकीस आलें व लॉर्डांच्या सभेंत तर डायरची पाठ थोपटणारा ठराव पास झाला. इकडे हिंदुस्थानांतील यूरोपीय लोकांनीं तर डायरची फारच वाहवा करून त्याला बक्षीस देण्याकरितां फंड गोळाकरून बरीच मोठी रकम जमा केली. इतरहि अपराधी लोकांस फारच सौम्य शिक्षा देण्यांत आल्या. या शिक्षा म्हणजे सामान्यतः ताकिदीच्या पलीकडे फारशा गेल्या नाहींत. यामुळें हिंदुस्थानच्या लोकांचा ब्रिटिश सरकारवरचा व ब्रिटिश लोकांवरचा विश्वास बहुतेक पार नाहींसा झाला. आणि ‘जो दुसर्यावरील विश्वासाला, त्याचा कार्यभाग बुडाला, जो आपणचि कष्टला, तोचि भला’ या श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या उक्तींतील स्वकष्टाच्या महतींचें तत्त्व महात्मा गांधी आदीकरून लहानथोर पुढार्यांच्या मनांत जोरानें ठसून असहकारितेचा मार्ग स्वीकारण्याचें त्यांच्या अंतःकरणांनें घेतलें.
व्हाइसरायासंबंधानें काँग्रेस सबकमिटीनें आपल्या रिपोर्टांत जीं दोन अक्षरें लिहिलीं आहेत तीं वस्तुस्थितीच्या आकलनास आवश्यक असल्यानें खालीं देत आहों.
{kosh पंजाबप्रकरण, प्रकाशक - श्री. श. ह. मुळे, पुणें.}*{/kosh} पंजाबांतील अधिकार्यांच्या कृत्यांस हिंदुस्थानसरकारनें प्रत्यक्ष मदत केली नसली तरी तेथील अधिकारी धिंगाणा घालीत असतां हिंदुस्थानसरकार स्वस्थ हात जोडून बसलें होतें ही गोष्ट दृष्टीआड करून चालणार नाहीं. लोकांची बाजू तरी काय आहे हें समजून घेण्याचीहि व्हाइसरायांनीं तसदी घेतली नाहीं. व्यक्तिशः आणि सार्वजनिक संस्थांनीं पाठविलेल्या तारा व पत्रें यांकडे त्यांनीं ढुंकूनहि पाहिलें नाहीं; आणि पंजाबकडे स्वतः डोळे उघडून न पाहतां पंजाब सरकारच्या कृत्यास मान डोलविण्यास त्यांस दिक्कतहि वाटली नाहीं. उलटपक्षीं, माफीचा कायदा घिसाड-घाईनें पास करून त्यांनीं अधिकार्यांवर पांघरूण घालण्यास कमी केलें नाहीं. निरनिराळ्या अधिकार्यांनीं हंटर कमिटीपुढील साक्षींत कबूल केलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती व्हाइसरायांस निदान मे महिन्यांत तरी झाली असलीच पाहीजे. तरी देखील जालियनवाला बागेंतील कत्तल व लष्करी कायद्याखालीं घडलेल्या गोष्टी ह्यांचें खरें स्वरूप लोकांस आणि साम्राज्यसरकारास त्यांनीं कळविलें नाहीं. मि. सीं. एफ्. अॅन्ड्र्यूज यांसारखा इंग्रज गृहस्थ, कीं ज्याच्या सत्यनिष्ठेविषयीं व उदारपणाविषयीं कोणास स्वप्नींहि शंका येणार नाहीं, अशा पापभीरु गृहस्थास पंजाबांत जात असतां बंदी करण्यांत आली. या कृत्यास व्हाइसरायांचीहि संमति होती. मि. अँड्र्यूज हे पंजाबी लोकांची मनें क्षुब्ध करण्यास जात नसून खरी हकीकत समजून घेण्याकरितां जात होतें. पंजाबसरकारचे चीफ सेक्रेटरी मि. थॉमसन यांनी वस्तुस्थितीचा मन मानेल तसा लपंडाव केला व तो व्हाइसरायांनीं चालू दिला. मि. थॉमसन यांनीं पंडित मदनमोहन मालवीय यांचा भर कौन्सिलांत अपमान केला व तो व्हाइसरायांनीं चालूं दिला. पण थॉमसन यांनीं कौन्सिलांतील ज्या विधानांबद्दल पंडितजींचा उपमर्द केला तीं सर्व विधानें सरकारी अधिकार्यांनीं आपल्या साक्षींत स्वमुखानें खरीं ठरविलीं आहेत. व्हाइसरायांनीं लोकांच्या मनोवृत्तींविषयीं इतकी बेपर्वाई टाखविली कीं, मार्शल लॉ ट्रायमलनें दिलेल्या फांशीच्या शिक्षा स्टेट सेक्रेटरी भाग पाडीपर्यंत तहकूब ठेवण्याची दयाहि त्यांचे ठिकाणीं दिसून आली नाहीं. पंडीत मदनमोहन मालवीय यांसारख्या जबाबदार नामदारांनीं विचारलेल्या प्रश्नासं बंदी करून पंजाबसंबंधानें नवीन माहितीहि आपणांस समजूं नये अशी त्यांनीं खबरदारी घेतली होती. पंजाबांत घडलें तरी काय याची चौकशी करण्यास ते पंजाबांत गेले देखील नाहींत.