प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

परिशिष्ट.

वजिराबाद.
लोकांच्या हातून घडलेलीं कृत्यें.- [लोकक्षोभाचीं कारणें.- लाहोर, अमृतसर व गुजरणवाला येथें घडलेल्या गोष्टी]. १ लोक तारा तोडण्यास व आगगाडीचे रूळ निखळून काढण्यास गेले.

२. रे. बेली यांचें घर त्यांच्या पुस्तकालयासकट जाळलें.

अधिकार्‍यांच्या हातून घडलेलीं कृत्यें.-

(१) लोकांच्या घरावर नोटिसा लावून घराच्या मालकांवर त्यांजवर पाहरा करण्याची जबाबदारी टाकली.
(२) कोणी सलाम करण्यास विसरला तर त्याचेंच पागोटें काढून व तें त्याच्या गळ्याभोंवतीं गुंडाळून त्यास छावणीकडे ओढून नेत व त्यास फटके मारण्यांत येत.
(३) घरटीप एक रुपया वसूल करण्यांत आला व याशिवाय ६७००० रुपये खंडणी घेतली व शिवाय पोलिसांनीं बराच लांचहि घेतला.
(४) शाळेंतील मुलांनां रोज सांयकाळीं हजिरी द्यावी लागे व युनियन जॅकला तीन वेळां सलाम करावा लागे. यासाठीं मुलांनां भर दोनप्रहरीं उन्हांतून पुष्कळ लांब जावें लागे.
(५) लढाईमध्यें मोठी कामगिरी बजावल्याबद्दल खुद्द कमांडर इन चीफची ज्याच्याजवळ सनद होती अशा एका ६२ वर्षें उमरीच्या गृहस्थाची सर्व मालमिळकत तो घरीं नसतां त्याच्या घरात शिरून व बायकांपोरांस अंगावरील कपड्यांनिशीं घराबाहेर काढून जप्त केली.
(६) लहान लहान पोरांस व बदमाष लोकांस साक्षीदार करून त्यांच्या साक्षीवर लोकांनां शिक्षा ठोठावल्या.