प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १७ वें.
खलीफत व इस्लामाचा प्रसार.

हिंदुस्थान.- महंमद इब्ज कासीम या अरब सेनापतीनें हिंदुस्थानावर इ. स. ७१२ मध्यें स्वारी केली व सिंध प्रांत जिंकून तेथें मुसुलमानी राज्य स्थापन केलें. तें पुढें मोंगल साम्राज्यांत सामील करण्यांत आलें. या स्वारीनंतर सुमारें तीनशें वर्षें सिंधप्रांताखेरीज इतर हिंदुस्थानाशीं मुसुलमानांचा संबंध नव्हता. पुढें १० व्या  शतकाच्या अखेरीस सबक्तगीन व गिझनीचा महंमूद यांनीं पुन्हां हिंदुस्थानावर स्वा-या सुरू केल्या. १०३० मध्यें महंमूद वारला तेव्हां फक्त लाहोर प्रांत मुसुलमानांस अधिक मिळालेला होता. नंतर आणखी एक दीड शतकानें महंमद घोरीनें दिल्लीपर्यंत मुलुख जिंकून घेऊन तेथें आपल्या मुसुलमान घराण्याचें राज्य सुरू केलें, अशा रीतीनें १२ व्या शतकाच्या उत्तरार्धांत मुसुलमानी सत्ता हिंदुस्थानांत कायमची प्रस्थापित होऊन १८५८ मध्यें मुसुलमानी साम्राज्य लयास गेलें. या राजसत्तेचा धर्मप्रसाराशीं निकट संबंध आहे. मुसुलमानी राजे आपल्या मुसुलमानेतर प्रजाजनांनां कसे वागवीत असत हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मुसुलमानांची राजकीय सत्ता सुरू होण्यापूर्वीच्या स्वा-यांत ज्या हिंदूंनीं त्यांनां प्रतिकार केला त्यांवर त्यानीं पशूप्रमाणें जुलूम केला, व ब्राह्मणांची निर्दयपणानें वाटेल तशी कत्तल करून त्यांची पवित्र देवळें धुळीस मिळविलीं. परंतु हे रानटीपणाचे प्रकार पुढें बंद करून मुसुलमानी राजांनीं हिंदूंनां धार्मिक बाबतींत सवलती देण्यास सुरवात केली. सिंध प्रांतावर प्रथम स्वारी करणा-या अरब मुसुलमानांनीं मात्र हिंदूंनां बिलकूल त्रास न देतां त्यांनां धार्मिक विधी व रीतिरिवाज पाळण्यास पूर्ण सवलत दिली होती; व पुढें उत्तर हिंदुस्थानांत व दक्षिणेंत राज्यें स्थापन करणा-या मुसुलमानी राजांस आपल्या राज्यांत लष्कराची व्यवस्था व बंदोबस्त नीट ठेवण्याचेंच मुख्य काम असल्यामुळें धर्मप्रसाराचे कार्यांत लक्ष घालण्यास त्यांनां फारसा अवसर सापडला नाहीं. मोंगल लोकांनीं राज्ये पूर्णपणें प्रस्थापित केल्यावर सुद्धां त्यांचें धार्मिक धोरण प्रत्यक्ष धर्माच्या प्रसारापेक्षां घराण्याच्या व पैशाच्या स्थितीवर ठरत असे. याच्या उलट पुष्कळ राजांनीं आपल्या अमदानींत धर्मवेडानें परधर्मीय लोकांवर जुलूम करून त्यांचीं देवळें भ्रष्ट करून त्यांनां आपल्या धर्मांत ओढून घेतलें. अशा प्रकारच्या जुलमी कायद्यांबद्दल हिंदूलोक गुजराथमध्यें तिस-या सुलतान महंमदाच्या विरुद्ध चेतले होते. देवळें फोडल्या बद्दल, काश्मीरमध्यें हिंदूंनीं सुलतान शिकंदर (१३९३-१४१७) यास बुत्सिखन म्हणजे मूर्तिभंजक ही निंदाव्यंजक पदवी दिली होती. आणि बंगालमध्यें परधर्मीयांचा छळ केल्याबद्दल जलालउद्दिन महंमदशहा (१६१४-३१) याची फार अपकीर्ति झाली होती. अवरंगजेबानें एक धर्म पसरविण्याच्या बाबतींत अनेक जुलमी कृत्यें केलीं व असें म्हणतात कीं त्यानें आपल्या साम्राज्यांत अनेक मूर्ति व देवळें फोडून अनेक हिंदूंनां बाटविलें होतें. अगदीं अलीकडील उदाहरण म्हणजे टिपू सुलतानचें होय. त्यानें सर्व मागील राजांपेक्षां क्रूर व रानटी कृत्यें धर्मवेडाच्या भरांत केलीं. परंतु असले धर्मवेडे राजे सोडून दिले असतां एकदंर महमंदी धर्माच्या अनुयायांनीं हिंदू प्रजेला फार त्रास दिला नाहीं व कांहीं प्रसंगीं त्यांनीं हिंदूंशीं प्रेमळपणाचें व सख्याचें वर्तन केलें.

 इस्लामी धर्माच्या इतिहासामध्यें एक महत्त्वाची बाब म्हटली म्हणजे ही कीं जीं मोंगल घराणीं हिंदुस्थानांत पसरली गेलीं व स्थापित झालीं ती सर्व परकीय देशांतून स्वारी करणा-यांनीं स्थापलीं. त्यांनी आपल्याबरोबर परदेशस्थ लष्कर आणलें व तसेंच त्यांच्या दरबारांमध्यें परस्थ विद्वान, साहसी शिपाई कवी वगैरे आले. अशा रीतीनें या मुसलमानांच्या लोकसंख्येमध्यें अरब, पर्शिअन, अफगाण, तुर्क वगैरे लोकांची भर पडली, व त्यांनीं सामाजिक व राजकीय व धार्मिक कार्यांत बराच पुढाकार घेतला. तसेंच त्यांनीं दरबारांतून मोठमोठीं इनामें मिळविलीं व कांहीं वेळां धामधुमीच्या प्रसंगीं कांहीं प्रांत बळकावले. अशा रीतीनें बलाढ्य झाल्यामुळें अर्थातच ते या बाटलेल्या लोकांचा तिरस्कार करूं लागले. ज्या धर्मप्रसारकांनीं हें प्रसाराचें काम केलें व ज्या साधूंनां आज देखील मुसुलमानी राज्यांतून फार मान दिला जातो ते सर्व परकीय देशांतून आलेल्या लोकांचे वंशज होते. यांनीं स्थापन केलेल्या मशिदी ह्या अद्याप धर्माचें केंद्र म्हणून मानल्या जातात व दरवर्षी हजारों मुसुलमान येथें यात्रेसाठीं येतात. अशा प्रकारच्या मशीदी, अजमीर येथील मुइन अलदिन चिस्तीची (१२३६), पाकपट्टन येथील फरीद अलदिन शकरगंजची (१२६९), दिल्ली येथील निजाम अलदिन अवलियाची (१३२५) आणि अहमदाबाद जवळील शहाअलमची (१४७५) होय. या लोकांनीं आपलें किती वजन बसविलें याचें उदाहरण १३ व्या शतकांत युच येथें प्रस्थापित झालेल्या बुखारी सय्यद यांच्या कुलाचें देतां येईल. या परदेशीय लोकांच्या येण्याजाण्यानें एक महत्त्वाचा परिणाम घडून आला तो हा कीं हिंदुस्तानांतील मुसुलमानांचा तिकडील इस्लामी धर्माचे वादविवाद व त्यांतील मुख्यतत्वें यांच्याशीं कायमचा परिचय राहूं लागला व सुनी अगर शिया या दोन्ही पंथांनीं त्या तत्त्वांशीं जुळतें करून एकी उत्पन्न करण्याचा क्रम सुरू केला. या मुसुलमानी संप्रदायाचें वाङ्मय हिंदुस्थानला परकीय अशा अरबी व फारशी भाषांतच आहे. या दोन भाषांच्या अभ्यासामुळें हिंदुस्थानांतील कांहीं लोकांनीं बाहेरील धार्मिक विचारांशीं परिचय कायम ठेवला आहे. पण त्यामुळें मुसुलमानी धर्म हिंदुस्थानांत व्हावा तितका दृढमूल झाला नाहीं. कारण अशिक्षित देशी मुसुलमान व त्यांचे वंशज हे या मुसुलमानी संस्कृतीच्या केंद्रापासून दूर असल्याकारणानें त्यांच्यामध्यें व हिंदूमध्यें नांवापलीकडे फारसा भेद आढळून येत नाहीं. देशी मुसुलमान हिंदूंच्या देवांची व शीतला देवीची वगैरे पूजा करतांना आढळतो. तसेंच हिंदूंच्या होळीच्या सणांत व दस-याच्या सणांत तो भाग घेतो. अशा प्रकारें हिंदूंच्या सणांत भाग घेण्याबद्दल, ख-या धार्मीक मुसुलमानांनीं तीव्र निषेध केलेला आहे. परंतु याविरुद्ध सक्रिय निषेध करण्यास सय्यद अहमद व हाजीशरियतअल्ला यांनीं १९ व्या शतकांत सुरवात केली व वहाबी नांवाची चळवळ सुरू करून त्यानीं आपलीं तत्त्वें फैलावण्यास सुरवात केली. परंतु याच्या पेक्षांहि मौजवी करामत अल्ली (१८७४) या धर्मसुधारकाच्या जोरदार लेखांनीं याविरुद्ध जोराचा हल्ला केला. अलीकडे शिक्षणाचा फैलाव चोहोंकडे झाल्यापासून व दळणवळणाचीं साधनें सुलभ झाल्यामुळें सर्व मुसुलमानांमध्यें एकी होण्याचे परिणामकारक प्रयत्न झाले आहेत व त्यांस थोडे बहुत यशहि आलें आहे पण अगदीं अशिक्षित अशा समाजामध्यें अजून धर्मतत्त्वांबद्दल अज्ञानच आहे.

जे हिंदू मुसुलमानधर्मीय झाले त्यांच्यावर अजून हिंदू संस्कृतीचा किती कायमचा परिणाम झालेला आहे हे त्यांनीं शारिआचा त्याग करून हिंदूंची विवाहपद्धति व वारसपद्धति स्वीकारली आहे त्यांवरून दिसतें. इस्लाम हा कांहीं धर्मतत्वांचा समूह नसून तो एक शासनसंप्रदाय आहे हें प्रसिद्धच आहे. पण दक्षिण हिंदुस्थानच्या पश्चिम किना-यावर वास करणारे मुसुलमानी धर्माचा स्वीकार केलेले मोपिला व तसेच मलकाना रजपूत व जाट हे मुसुलमानी कायद्यानुसार न वागतां आपल्या हिंदूपूर्वजांच्या कायद्याप्रमाणेंच आचरण करतात.

 इस्लामीधर्माचा परिणाम हिंदुस्थानांत निवळ मुसुलमान लोकांवरच झाला असें नाहीं तर मुसुलमानेतर जातीवरहि झाला. १५-१६ व्या शतकांतील व विशेषतः कबीर व नानक यांनीं केलेल्या धार्मिक चळवळीवर यांचा परिणाम झाला हें निःसंशय आहे. उत्तर हिंदुस्थानांतील खालच्या जाती मुसुलमान साधूंची पूजा करतात. यांपैकीं कांहीं साधू केवळ काल्पनिक असतात व कांहीं खरे असतात. तसेंच दरबारांतील मोठमोठ्या हिंदू सरदारांनीं जे कांहीं मुसुलमानी रिवाज उचलले आहेत ते देखील याचेच निदर्शक आहेत.

इस्लाम धर्मामध्यें पडदा पद्धति सांगितली आहे व त्यामुळें स्त्रियांनां समाजांत वावरण्याची व नाच व इतर खेळ खेळण्याची देखील मनाई आहे. याच नीतिकल्पनामधून न्यायाधीश हा एकान्तांत राहणारा विरक्त मनुष्य असला पाहिजे, कारण तो समाजांत मिळून असला म्हणजे त्याला एक प्रकारची आसक्ति उत्पन्न होऊन तो पक्षपाती होण्याचा संभव असतो अशी कल्पना निघाली. तद्वतच अशीं कांहीं विद्वानांचीं उदाहरणें आहेत कीं ते आपल्या पुस्तकांमुळें पैसे मिळविल्याबद्दल रडले आहेत. ह्या नीतीच्या कल्पना कुराणाच्या आधारावरच रचिल्या आहेत. व वागणुकीबद्दलच्या म्हणी कवीपासून व शफी लेखकांपासून उदाहत करण्याची वहिवाट आहे. अखलाक इ. नाशिरी, अखलाक इ. मुहानी सारखे नीतिशास्त्रावरील ग्रंथ हे विद्वान लोक वाचतात व अखलाक इ जहांगिरी सारखे ग्रंथ हिंदुस्थानांत निर्माण झाले आहेत तरी पण त्यांचा परिणाम फारसा झाल नाहीं. इतका कडक सोंवळेपणा थोडा फार ढोंगीपणाच्या उत्पत्तीलाहि कारणीभूत होतो तरी पण हिंदुस्थानांतील मुसुलमान वर्गाची मनोवृत्ति पवित्र आचरणाकडे नाहीं असें म्हणतां येणार नाहीं.

महंमदी संप्रदायाच्या प्रसाराचा हिंदुस्थानावर झालेला राजकीय परिणाम व त्याचा इतिहास हे स्वतंत्र प्रकरणांत दिले आहेत.