प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १७ वें.
खलीफत व इस्लामाचा प्रसार.

सिरीया. - अरबस्तानांतील फाजिल वाढलेल्या लोकसंख्येला सीरिया व पॅलेस्टाईन या प्रांतांत मुक्तद्वार सापडलें. ७ व्या शतकाच्या पूर्वार्धांत अरब लोकांनीं या प्रदेशावर स्वारी करण्यास, व प्रदेश जिंकून घेण्यास तेथील लोक सेमेटिक वंशांतलेच असल्यामुळें फार सोपें गेलें. सीरियाच्या शेजारचीं घस्सान व हिरा हीं राज्यें रोमन साम्राज्य व इराणचें साम्राज्य यांच्यामध्यें 'बफर स्टेट' प्रमाणें होतीं, तेथील लोक शुद्ध अरबी रक्ताचे होते. त्यामुळें स्वारी करून येणारे अरब मुसुलमान त्यांनां बंधूप्रमाणेंच वाटले व रोमन साम्राज्याच्या जुंवाखालून सुटका झाल्याबद्दल आनंद वाटला. शिवाय इराण बरोबरच्या युद्धामुळें कांस्टंटिनोपल येथील खजिना रिता झाला होता, त्यामुळें हिरॉक्लिअसनें सरहद्दीवरच्या इतर जातींच्या लोकांना खंडणी देण्याचें बंद केल्यामुळें या जातींनाहि अरबांनां मिळण्याची इच्छा झाली. या अनेक कारणामुळे उमर खलीफाच्या फौजेनें स्वारी करतांच सर्व प्रदेश मुसुलमानांच्या ताब्यांत आला.

अरबांनीं खाल्डिया जिंकला तो केवळ अनावर द्रव्यलोभामुळें, ईजिप्त जिंकला तो अरबस्तानला धान्य पुरवठा होणें जरूर म्हणून आणि सीरिया जिंकला तो त्या प्रांतांतील लोकांबद्दल वाटणा-या बंधुभावामुळें शिवाय याच प्रांतांत अनेक पवित्र स्थळें असल्यामुळें धार्मिक भावनाहि वरील स्वारीच्या मुळाशी होतीं. अब्राहीम, सालो मन व खुद्द येशू हे या पॅलेस्टाइन प्रांतांतच जन्मले व मेले. महंमद पैगंबरहि लहानपणीं सीरियांत आपल्या चुलत्याबरोबर गेला होता यरूशलेमचें दर्शन घेण्याकरतां एकदां रात्रीं महंमद गेला होता व त्याच ठिकाणीं त्याला प्रत्यक्ष ईश्वरदर्शन घडलें असेंहि सांगतात दमास्कसलाहि तो जाणार होता पण नंदनवनांत माणसाला दोनदां प्रवेश घडत नसतो या समजुतीनें तो मार्ग फिरला. मदीना येथें यरुशलेमकडे तोंड फिरवून प्रथम दोन वर्षे मुसुलमान प्रार्थना करीत असत यावरूनहि यरुशलेमबद्दलची त्यांची पूज्यबुद्धि स्पष्ट  दिसते. उपरिर्दिष्ट स्वारीच्या वेळीं ओमाननें सर्व पवित्र ठिकाणांचें दर्शन घेतलें. यरूशलेमपेक्षांहि हेब्रॉनचें धार्मिक दृष्ट्या महत्त्व मुसुलमानांनां अधिक वाटत असे कारण तेथें अब्राहाम, जेकब, ऐझॅक हे आपल्या बायकांसह राहिलेले होते व त्यांचीं थडगींहि तेथेंच आहेत. हेब्रॉन शहर १०९९ पासून ११८७ पर्यंत ख्रिस्ती धर्मयोद्धांच्या (क्रूसेडर्स) ताब्यांत राहून पुन्हां मुसुलमानांच्या ताब्यांत आलें. येथील देवालयांचीं अंतर्गृहें अत्यंत पवित्र मानून मुसुलमान आंत शिरत नाहींत; पण ख्रिस्ती लोक मात्र बेधडक आंत शिरून अब्राहामचे वगैरे प्रत्यक्ष दर्शन करून येतात; हें ऐकून मुसुलमानांनां साश्चर्य भय वाटतें.

उमईंद खलीफांच्या कारकीर्दींत तर सीरिया (६६१-७५०) सर्व अरब संस्थानांत श्रेष्ठ बनून दमास्कस शहर हिंदुस्थानपासून स्पेनपर्यंत अफाट पसरलेल्या मुसुलमानी साम्राज्याची राजधानी होतें. या ऐश्वर्याबद्दल मत्सर वाटून मक्का येथें अरबांनीं दुसरा प्रतिस्पर्धी खलीफ गादीवर वसविला आणि लवकरच मुसुलमान मक्केच्या खलीफाला सार्वभौम मानूं लागले; तरीहि यरुशलेम, हेब्रॉन वगैरे पवित्र स्थळांमुळें सीरियाचें महत्त्व बरेंच कायम राहिलें. शिवाय उमईद अबद-अल-मलिकनें मक्केवर सैन्य धाडून तेथील खलीफाचा मोड केला व मुसुलमानी साम्राज्यावर आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केलें आणि यात्रेकरूं नाहि मक्केचें महत्त्व वाटूं नये म्हणून सालोमनच्या चर्चच्या जागींच मोठी मशीद बांधून त्यांत काबाची स्थापना केली.

तथापि उमईद खलीफांच्या मनांत मुसुलमानी धर्माबद्दल खरी निष्ठा नव्हती. हे खलीफ मूळ मक्का येथील पिढीजात श्रीमंत घराण्यांतींल वंशज असून महंमदाचे ते कट्टे शत्रू होते. महंमदाच्या प्रबल सत्तेपुढे त्यांनां नमावें लागले होतें इतकेंच. त्याच्या पश्चात् त्याच्या आवडत्या मदीना शहरावर हल्ला करून ते लुटून फस्त करण्यास त्यांस बिलकूल दिक्कत वाटली नाही; इतकेच नव्हे तर खुद्द काबाचाहि त्यांनीं नाश केला आणि महंमद पैगंबराच्या कुटुंबांतील माणसांचा बहुतेक उच्छेद केला. त्यांनां फक्त ऐहिक सत्तेची व वैभवाची हांव होती व तें साधण्याकरितां साधन म्हणून त्यांनीं मुसुलमानी धर्माचा अंगीकार केला होता. सीरिया मधील लोक बहुतेक ख्रिस्ती होते. ते शिकलेले असत, त्यामुळें लढण्याखेरीज इतर सर्व राज्यकारभाराच्या कामांत खलीफानां त्यांची अरबांपेक्षांहि अधिक मदत होत असे. बहुतेक सर्व सरकारी खात्यांत कारकून ख्रिस्ती असत ईजिप्त व इराणमध्येंहि अशी स्थिति होती. खलीफाच्या दरबारांत मोठे वजन असलेले असेहि कित्येक ख्रिस्ती बडे गृहस्थ असत दमास्कसचा जॉन व त्याचा बाप हे अरब राजाच्या पदरी वरिष्ठ दर्जाच्या हुद्यावर होते व उमईद खलीफाचा एक स्तुतिपाठकहि ख्रिस्ती कवीच होता; इतकेंच नव्हे तर कित्येक उदारधी खलीफांच्या समोर धार्मिक बाबतींत ख्रिस्ती व मुसुलमान वादविवाद करीत असत. या गोष्टींचा परिणाम असा झाला कीं, मुसुलमानांतील कट्टी धर्मनिष्ठा ढिली पडत चालली उमईद खलीफांच्या वर्तनांतील प्रमादाचें पापमयत्व कमी भासावें म्हणूनच मुसुलमानीं धर्म स्वीकारणारांचा कोणतेहि पाप समूह घात करीत नाहींत; निदान प्रयलकालन्यायदिनापर्यंत तरी त्या पाप्याला कांहींच शिक्षा भोगावी लागत नाहीं; असें मुर्जित प्रतिपादन करीत असत. निर्भेळ दैववादाला निदान इच्छास्वातंत्र्यवादाची तरी जोड मिळाली. याच मतस्वातंत्र्यांतून पुढें मुताझिलायटांची चळवळ उत्पन्न झाली. ख्रिस्ती संप्रदायाचा मुसुलमानांवर लौकिक बाबतींतहि बराच परिणाम झाला. उमईद खलीफांपैकीं शेवटचा व सर्वांत उत्तम खलीफा हिशाम हा स्वतःमोठा प्रसिद्ध शेतकींतला माहीतगार होता. त्याच्या खालिद नांवाच्या सुभेदाराची आई ख्रिस्ती होती व तो मुसुलमानांपेक्षां ख्रिस्ती लोकांनांच आपल्या नोकरींत अधिक ठेवीत असे. कुराण हाच कांहीं सनातन धर्मग्रंथ नव्हे ही गोष्ट पुष्कळांनां हिशामच्या कारकीर्दींतच मान्य झाली आणि एकंदरीनें दमास्कसच्या या उमईद खलीफांची सुमारें एक शतकभरची कारकीर्दच एकंदर अरबांच्या इतिहासांत सर्वांत अधिक उज्ज्वल झाली. उमईद खलीफांचा पाडाव होतांच अरबांच्या हातांतील राज्यसत्ता गेली व सीरिया हा मुसुलमानी साम्राज्यांतला एक सामान्य प्रांत बनला. पुढें लवकरच तेथें मुसुलमान व ख्रिस्ती यांच्यामध्यें धर्म युद्धें माजलीं व तीं दोनतीन शतकें चाललीं. मध्यंतरीच्या कांहीं कांळांत सीरिया ईजिप्तच्या ताब्यांत होता व अलीकडील चार शतकें तो तुर्कस्तानच्या सुलतानाचा एक प्रांत होऊन राहिला होता. महायुद्धानंतर कांहीं काळ तो फ्रेंचांच्या ताब्यांत होता.