प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १७ वें.
खलीफत व इस्लामाचा प्रसार.

मध्य आशिया.- कांस्टंटिनोपलपासून पूर्वेकडील मुसुलमानी देशांत धर्मवेडेपणा व अज्ञान उत्तरोत्तर अधिक प्रमाणांत असलेलें दृष्टीस पडतें व आशियाखंडांत जसजसें आंत खोल शिरावें तसतसा मुसुलमानेतरांबद्दल अधिकाधिक द्वेष व तिटकारा असलेला दृष्टीस पडतो. तुर्कस्तानांत ख्रिस्ती व मुसुलमान लोक अनेक शतकें एकमेकांसंन्निध राहात असल्यामुळें त्यांचे एकमेकांबद्दलचे दुराग्रह बरेच दूर झालेले असून सलोखा वाढलेला आहे. इराणांत आरंभापासून सुरू असलेलें शिया व सुनी या पंथांमधील शत्रुत्व व कलह अद्याप कायम आहेत. शिया पंथांच्या तेथील लोकांची धार्मिक वृत्ति व नीतिमत्ता अगदीं हलक्या दर्जाची आहे. तुर्कस्तानांत धार्मिक सत्ता बहुतेक सुलतानाच्या हातांत असते, तर इराणांत धर्माधिका-यांचा वर्ग अगदीं स्वतंत्र असून सर्वसत्ताधीश आहे. शहाच्या राजकीय सत्तेला ते जुमानीत नाहींत, इतकेंच नव्हे तर, त्याला प्रत्यक्ष विरोध पुष्कळ वेळां करतात. इराणांतील चालू घराण्याच्या शहांनीं गेलीं शंभर वर्षें या धर्माधिका-यांची सत्ता मर्यादित करण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ इस्फहान व कर्बला येथील इमाम जुम्मा हे शहाला बरोबरीनें लेखितात व प्रत्यक्ष शहाच्या हुकुमाला त्यांची सम्मति असल्याशिवाय कोणीहि कवडीची किंमत देत नाहीं.

मध्य आशियांत वरील दोन्ही देशांहून अगदीं भिन्न परिस्थिति दृष्टीस पडते. पूर्व तुर्कस्थानांतच फक्त शफी पंथाचे लोक आहेत. या देशांतील धार्मिक आचारविचार व चालीरीती फार निराळ्या आहेत. येथें धर्मवेडेपणांचा अतिरेक, धर्मविधींचा सुळसुळाट आणि सुधारणांविषयींचा भयंकर द्वेष दृष्टीस पडतो. अगदीं चालू कळांतील त्यांची राहणी, सामाजिक व्यवहार, व्यापार व सरकारासंबंधाचीं वृत्ति पूर्णपणें ८ व्या व ९ व्या शतकांतल्याप्रमाणें आहे; किंबहुना ८ व्या ९ व्या शतकांत सुद्धां कुराणाच्या आज्ञा इतक्या कडकडीत रीतीनें पाळल्या जात नसाव्या. दिवसाचा बहुतेक दोनतृतीयांश काळ तेथील लोक धर्माचरणांत घालवितात. प्रत्येक मुसुलमान सदगृहस्थाच्या घरीं एका खोलींत धार्मिक शुद्धिकरणविधीकरतां स्वतंत्र खोल चौकोनी जागा केलेली असते, कुराण ठेवण्याकरितां ठरलेला कोनाडा असतो, तसेंच प्रार्थनेच्या वेळीं आंथरण्याची सतरंजी ठेवण्याची जागा नेमलेली असते. प्रत्येक माणसाचा पोषाख धर्माच्या नियमानुसार बरोबर असतो. आंतले व बाहेरचे कपडे कापण्यांत व बेतण्यांत रेसभरहि फेरफार चालत नाहीं. शुद्ध रेशमी कपडा वापरण्याची मनाई असल्यामुळें ते रेशमी कपड्यांत विणतांनां चार धागे तरी कापसाचे घालीत असतात. स्त्रियांनां कडक गोषांत ठेवतात व त्यांनां निर्जीव वस्तूंप्रमाणें किंवा गुलामाप्रमाणें पुरुष वागवितात. तरूण वयांत आलेल्या मुलींकडे पुरुषांची कामांध दृष्टि जाऊं नये म्हणून त्या मुलींनां वृद्ध स्त्रियांप्रमाणें वांकून व काठीला टेकून चालावयाला लावतात. प्रत्येक स्त्रीला डोक्यावरून पायघोळ बुरखा घ्यावा लागतो. मद्यपानाची बंदीहि इतर सर्व मुसुलमानी देशांपेक्षां येथेंच अधिक कडक आहे. तात्पर्य येथील सुनी मुसुलमान सर्व बाबतींत आपल्या इतर धर्मबंधूंपेक्षां फारच कडक आचरण करणारे आहेत. लोकांच्या धार्मिक आचरणावर सक्त नजर ठेवण्याकरितां एक स्वतंत्र अधिकारी असतो, त्याला राईस म्हणतात. तो बरोबर दोन शिपाई घेऊन बाजारांतून व सार्वजनिक जागांतून हिंडत असतो. प्रार्थनेला जाण्याची आरोळी ऐकतांच कोणी मशीदीकडे न गेलेला आढळला तर जवळच्या वादीच्या चाबकानें फटके मारण्याचा त्याला अधिकार असतो; किंवा त्याला तुरूगांतहि टाकतां येतें. तसेंच रस्त्यांत कोणलाहि हटकून कुराणाचा मुख्य आज्ञा सांगण्याचा हुकूम राईसला करतां येतो; आणि ज्याला त्या आज्ञा तोंडानें पाठ म्हणतां येणार नाहींत त्याला वृद्धतरूण, स्त्रीपुरूष असा कोणताहि भेद न करतां शाळेंत शिकण्याकरितां परत पाठविण्याचाहि राईसला अधिकार असतो. याप्रमाणें दाढी पिकलेल्या म्हाता-यांनांहि शाळेंत पाठविण्याचा अधिकार बजावतांनां हा नोकर आढळतो. हे अधिकारी बायकांनांहि असभ्य पोषाख असल्यास रस्त्यांत हिंडूं देत नाहींत.

 मध्य आशियांत निरनिराळ्या पंथांचें बरेंच महत्त्व आहे. दरवेशी पंथांतील लोक निरक्षर असतात, पण ते कुराणांतील वचनें व कवनें पाठ करून रस्तोरस्तीं म्हणत फिरतात. त्यांचा सोशिकपणा विलक्षण आहे. दोन दोन रात्रीं 'या हू, या हक्क' (तो परमेश्वर सत्यमूर्ति व धर्ममूर्ति आहे) असलें एकादें वचन मोठमोठ्यानें सारखे ओरडत असलेले आढळतात. तक्य किंवा खानका म्हणून अशा हिंडणा-या लोकांनां उतरण्याकरतां बांधलेल्या इमारती असतात. तेथें रात्रीं गाणें व ओरडणें इतक्या मोठ्यानें व पुष्कळ वेळ चालतें कीं, त्या दरवेशांच्या अंगांत आल्या सारखे त्यांचें अंग कापूं लागतें व तोंडांतून फेंस येऊं लागतो. त्यांच्याबरोबर तेथें जमलेले वृद्धतरूण स्त्रीपुरुषहि नाचूं ओरडूं लागतात, व बेसुमार गोंधळ माजवितात. असले प्रकार तुर्कस्तानांत कोठेंहि आढळत नाहींत. याप्रमाणें मध्यआशियांत सर्वच प्रकार पराकोटीला गेलेले आहेत.

 अपराध्यांनां शिक्षाहि फार कडक करतात. मद्यपान करणा-याला उंच शिखरावरून लोटून ठार केल्याचीं व जारकर्म करणा-या स्त्रीला धोंडे मारून ठार मारल्याचीं उदाहरणे आहेत. महंमदाच्या आज्ञा आपण फार कडक रीतीनें पाळतों याबद्दल या लोकांनां अभिमान वाटतो. धर्मोपदेशक, धर्माध्यक्ष व साधुसंत फकीर यांनां येथें फार मान आहे. बहा अलदिन नक्षबंदी हा एक विद्वान, पवित्राचरणी साधु असून बुखारा येथें त्याचें थडगें आहे व तेथें यात्रा जमत असते. ख्वाजा काशानी, ख्वाजा अक्सथ, ख्वाजा उबैद अल्ला अव्हार इत्यादि बरेच मोठे साधु होऊन गेले आहेत. ख्वाजा अब्द अल्ला हातिफी हा प्रसिद्ध कवि होता; तो बाबरबरोबर हिंदुस्थानांतहि आला होता.

 अशा प्रकारचे फिरते साधु मध्यआशियांतल्याप्रमाणें तुर्कस्तान, इराण वगैरे देशांत आढळत नाहींत. पण आधुनिक सुधारणेच्या दृष्टीनें मध्यआशिया अगदीं मागें म्हणजे ८ व्या ९ व्या शतकांतल्या सारखा अद्याप आहे. त्या मानानें तुर्कस्तान व इराणांतील लोक बरेच सुधारलेले आहेत व ते आपल्या मध्यआशियांतील फाजील धर्मनिष्ट बंधूनां हंसतात व नांवें ठेवितात. मध्यआशिया सुधारणेच्या कामी अगदीं मागासलेला असल्याचें कारण असें कीं, सरहद्दीवर मोठालीं वाळूचीं मैदानें असल्यामुळें त्याचें पुढारलेल्या मुसुलमान देशांशीं दळणवळण नाहीं. मध्यआशियांतील स्थितीचा दुसरा वाईट परिणाम म्हणजे अफगाणिस्थान वगैरे हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीवरील प्रांतांतल्या डोंगरी लोकांतहि तेंच धर्मवेडेपणाचें वारें शिरलेलें आहे; व त्यामुळें सरहद्दीवरील ब्रिटिश अधिका-यांनां पुष्कळ वेळां त्रास व अनर्थहि सोसावे लागतात.