प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १७ वें.
खलीफत व इस्लामाचा प्रसार.

फातिमाइद घराणें. - यापुढें १२५८ पर्यंत २५ खलीफ होऊन गेले. पण त्यांच्या अमदानींत खलीफत वाढण्याऐवजीं -हास पावूं लागली; तिचे झपाट्यानें तुकडे पडूं लागले. गादीकरितां एकसारखीं भांडणें चालू राहिलीं. खलीफाची सत्ता ज्याच्या अंगांत जोर असेल तो धाब्यावर बसवूं लागला. बायझंटाईन लोकांशीं युद्ध चालू होतेंच. मोकटादीर खलीफाच्या कारकीर्दींत [९०८-९३२] फातिमाईद घराण्याची स्थापना झाली. त्याचें राज्य प्रथम माघ्रीबमध्यें व नंतर इजिप्तमध्यें अजमासें तीन शतकें टिकलें. या वेळीं खलीफत किती संपुष्टांत आली होती हें तिच्या ताब्यांतील प्रदेशांचा आढावा घेतल्यास कळून येईल. या काळचें साम्राज्य केवळ बगदाद प्रांतापुरतेंच होतें असें म्हटल्यास अतिशयोक्ति होणार नाहीं. कारण खोरासान व ट्रॅन्सऑक्सियाना सामानिद लोकांच्या हातांत होतें. फार्स बुयिद लोकांकडे होतें; किर्मान आणि मेदिया स्वतंत्र राजांच्या ताब्यांत होतें; हामदानिद लोकांनीं मेसापोटेमिया व्यापला होता; साजिद लोकांनीं अमेंनिया व अझरबैजन घेतला; इक्षीडाईट लोकांच्या ताब्यांत इजिप्त प्रांत होता: तसेंच फातिमाईद लोक आफ्रिकेचे व कार्माथियन अरबम्थानाचे मालक होते. अशा रीतीनें खलीफतचे तुकडे तुकडे झाले; व खुद्द खलीफ निर्बल झाला; तो इतका कीं, मोस्ताकफी नांवाच्या खलीफानें एका अट्टल दरोडेखोरापासून दरमहा २५००० दिनार घेऊन त्याला देशांत वाटेल तसा धुमाकूळ घालण्याचा परवाना दिला होता (९४५).