प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १७ वें.
खलीफत व इस्लामाचा प्रसार.

तार्तरी - तार्तरीमध्यें ज्या वेळेस सामानीयाचें बलाढ्य राज्य पूर्वेकडे विस्तार पावत होतें त्या वेळीं इस्लामचा प्रवेश झाला. अशी एक आख्यायिका आहे कीं पश्चिमेकडून आलेल्या अबू नस्त्रसामानी या नांवाच्या एका मुसुलमानानें सतकबोघ्रा या राजपुत्राला १२ व्या वर्षी इस्लामीधर्माची दीक्षा दिली. बोघ्रेड अथवा इलेकिड या नांवानें प्रसिद्ध असलेल्या बोघ्राच्या वंशजांनीं जवळ जवळ १०० वर्षें आपली सत्ता गाजवली व टॉपगॉशच्या कारकिर्दींत १०७० मध्यें यूसफखान हलीबनें इस्लामी रहस्यानें भरलेलें बोधपर काव्य संपविलें. पर्शिअन भाषा व पर्शिअन संस्कृति यांचा प्रसार झाल्यामुळें तार्तरीत इस्लामचा प्रसार झाला असल्याचा संभव आहे. पण या ठिकाणच्या राज्यकर्त्यांनीं जरी इस्लाम धर्म पत्करला तरी पण त्याच्या लगतच्या पूर्वेंकडील तुर्की राज्यांत इस्लामी धर्माचा प्रवेश झाला नाहीं. शिवाय ज्या वेळीं कारा खिताईनें इलेकिडचें राज्य जिंकलें त्या वेळीं देखील त्यानें जित लोकांनां धर्मस्वातंत्र्य दिल्याकारणानें इस्लामधर्माचा तेथें प्रसार झाला नाहीं. अशाच प्रकारची सवलतचें गिझखान उर्फ जेंगिझखान यानें दिली. पण ज्या वेळेस चेंगिझखानाच्या साम्राज्याचे तुकडे झाले त्या वेळीं त्याच्या नातवाच्या ताब्यांत तार्तरी जाऊन त्याच्या बंशजांनीं इस्लाम धर्म स्वीकारला. तरीपण पुष्कळ दिवसपर्यंत राजांची अगर प्रजेची श्रद्धा या धर्मावर बेताचीच होती. या यांच्यामध्यें लामांचा धर्मच प्रसृत होता. पुढें १७५७ साली तार्तरी हा चीन लोकांनीं जिंकून यांतील झंगेरिया व काश्गर हे प्रांत आपल्या राज्यास जोडून घेतले. त्या काळापासून तो प्रांत चिनी लोकांच्याच ताब्यांत आहे. फक्त कांहीं काळपर्यंत (१८६४-७७) अलटीशहर व येट्टीशहर हीं संस्थानें रानटी पण अतिशय राजकारस्थानपटु अशा याकुब वेगच्या आधिपत्याखालीं स्वतंत्र झालीं व त्यांनीं खलीफाची सत्ता कबूल केली. या प्रांतांतील मुसुलमान हे सर्व तार्तर असून त्यांची लोकसंख्या कोटि दीडकोटि आहे.