प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १७ वें.
खलीफत व इस्लामाचा प्रसार.

चिनी महमदीयांचें सामान्य वर्णन.- जर चीनमधील मुसुलमान लोकांचा एकच संकीर्ण समाज कल्पिला तर त्यांचे ठोकळ वर्णन खालीं दिल्याप्रमाणें आहे.

(अ) वं श व भा षा.- निरनिराळ्या मुसुलमान जातींची उत्पत्ति कशी कां असेना त्यांनां सर्वांनां आज चिनी या नांवानेंच संबोधलें जातें. त्यांच्यामध्यें चिनी लोकांचे गूण किती उतरले आहेत हे नक्की ठरवितां येत नाहीं. ते सर्व लोक चिनी भाषाच वापरतात. त्यांच्या व चिनी लोकांच्या विचारांत देखील पुष्कळ साम्य आहे. तरी पण या दोहोंमध्यें फरकहि पुष्कळच आहे व त्यामुळें चीनमधील लोकसंख्येचे चीनी व मुसुलमान असे भाग पडूं शकतात. चीनमधील मुसुलमानांनां डंगन्स असें नांव आहे व हें नांव वर सांगितल्याप्रमाणें त्यांनां पसंत नसून ते आपल्याला हुयि-हुयि असें म्हणवून घेतात; परंतु त्यांनां स्वतःला आपण चिनी म्हणवून घेणें मुळींच आवडत नाहीं. सारांश चिनी व मांचू या लोकांप्रमाणेंच ते आपली स्वतंत्र जात मानतात.

चीनमध्यें अशाच प्रकारची एक शक्ति आहे कीं, कोणत्याहि जातीचे लोक तेथें आले असतां त्यांचे जातिभेद अगदीं शिथिल होतात व एक प्रकारें चीनच्या रहिवाश्यांशीं त्यांचें मिश्रण होऊं लागतें. चीनमध्यें जातिभेद ढिले करण्याची एक विशेष शक्ति आहे. मांचू लोक आले व ते चीनच्या रहिवाश्यांप्रमाणें मिसळून गेले व अशाच प्रकारचा थोडा फार परिणाम या मुसुलमान लोकांवर झाल्याशिवाय राहिला नाहीं. शिवाय चिनी लोकांमध्यें परक्या जातींत मुली देण्याला प्रतिबंध नसल्यामुळें त्यांच्या व मुसुलमानांच्या रक्ताचें मिश्रण होऊन त्यांच्यापासून पुष्कळ महत्त्वाचे परिणाम निष्पन्न झाले. तरी पण होतां होईल तों मुसुलमानांनीं आपलें स्वत्त्व कायम राखण्याचा बराच यशस्वी प्रयत्न केला व जरी एकमेकांमध्यें रक्तसंबंध झाले तरी पण त्यां दोघांमध्यें अनेक भेद आहेत. चिनी लोकांचा तर्कावर सारा भर तर मुसुलमान लोक परंपरागत चालीला फार मान देतात. चिनी साधारणतः सोशिक व शांत वृत्तीचा असतो, पण मुसुलमान मात्र त्याला दुखविलें असतां लगेच चिडतो. चिनी लोक तोंडावरून पहातां मलूल असे दिसतात तर मुसुलमान छाती वर काढून व मोठ्या ऐटींत चालतात. तसेंच अफूच्या व्यसनामुळें चिनी लोक फार अशक्त असतात पण मुसुलमान चांगले बळकट असतात. अशा रीतीनें आपल्याला या दोघांत स्पष्ट भेद दिसून येतो.

तेव्हां चीनमधील मुसुलमानांचा वंश कोणत ? मुसुलमानांच्या अगदीं पहिल्या स्वा-यांपासून विविध जातींचा हा चीन देश इतका अनेकवार बेचिराख झालेला आहे कीं, त्यामध्यें एकच जात प्रमुख आहे असें दाखवतांच येणें शक्य नाहीं. याशिवाय दुस-या धर्मांतील लोक व विशेषतः खरेदी केलेलीं मुलें मुसुलमान करण्याचें मुसलमानांचें धोरण आपण विसरतां कामा नये. डी ओलोन म्हणतो कीं, हीं विकलेलीं चिनीं मुलें चिनी लोकांपेक्षां गुणधर्मामध्यें भिन्न अशीं दिसतात. तसेंच चीनमध्यें इतक्या जाती मिसळून गेल्या आहेत कीं, एखादा मुसुलमानधर्मी नसला म्हणून तो शुद्ध चिनीच आहे असेंहि म्हणतां यावयाचें नाहीं.

सालर या नांवाची मुसुलमानांची एक विशिष्ट जात आहे. हे लोक होअंगहोच्या उजव्या तीरावर सुन हुआहिंग शहरामध्यें व आसपासच्या खेड्यांत आहेत. त्यांच्यामध्यें व चिनी मुसलमानांत मोठा फरक आहे. ते स्वभावतः उंच असून चिंचोळ्या व लांब नाकाचे असतात. त्यांचा चेहरा लांबट असून त्यांनां पुष्कळ दाढी असते; त्यांची कातडी काळी असते; चीनच्या ताब्यांत असलेल्या तुर्कस्तानांतील तुर्कांशीं त्यांचें बरेंच साम्य दिसतें. त्यांच्यांतील विशेष म्हणजे त्यांची अगदीं अशुद्ध भाषा होय. ते चिनी लोकांप्रमाणें पोषाख करतात. धर्मगुरुंनां ते अतिशय पूज्य मानतात. ते अतिशय मद्य पितात. त्यांच्यामधील पतित वर्गदेखील अरबी भाषेशीं परिचित असतो. पूजेच्या वेळीं ते धूप जाळीत नाहींत व त्यांनां मशीदींत बादशहाची तसबीर ठेवणें मुळींच खपत नाहीं.

वि वा ह, कु टुं ब व आ प्त सं बं ध.- चीनमधील मुसुलमानांच्यामधील विवाहविधि शारिआच्या पद्धतिप्रमाणें केले जातात. ही पद्धति सर्व इस्लामधर्मीयांनां सारखीच लागू आहे. चीनमधील परिस्थितिमुळें या विधीमध्यें कांहीं फेरफार झाले किंवा नाहीं हें समजण्यास साधन नाहीं. आणि थोडी फार माहिती मिळविली तरी निरनिराळ्या भागांमध्यें निरनिराळी परिस्थिति असल्यानें तिचा फारसा उपयोग होणार नाहीं. तशीच स्त्रियांच्या बाबतींत निरनिराळ्या भागांत निरनिराळी स्थिति दृष्टीस पडते. डी ओलोनच्या मतें बुरख्याची पद्धत चीनमधील मुसुलमानी स्त्रियांमध्यें आढळून येत नाहीं. ग्रेनाडच्या मतें श्रीमंत व वरच्या दर्जाच्या स्त्रिया बुरखा घेतात. चूमध्यें मात्र डीओलोनला निराळीच पद्धत आढळून आली. तेथील स्त्रिया डोळ्यापासून खाली बुरखा वापरतात व घोड्यावर बसून रस्त्यांतून जातात. पण पाय बांधण्याची पद्धत चीनमधील मुसुलमानांमध्यें आहे. मुसलमानांनां परधर्मांतील स्त्रियांशीं लग्न लावण्याची मुभा आहे पण आपल्या धर्मांतील स्त्रियांनां परधर्मीयांनां देण्याची मनाई आहे. याला कांहीं कांहीं अपवाद आढळून येतात नाहीं असें नाहीं. उदाहरणार्थ तुर्क राजकन्येचा शिएनलंग बादशहाशीं विवाहसंबंध झाला. व्यभिचाराला जरी कडक शिक्षा नाहीं तरी पण तो निषिद्ध मानला जातो. एकंदरींत चिनी लोकांपेक्षां नैतिक दृष्ट्या चीनमधील मुसुलमान जास्त उच्च आहेत. कौटुंबिक पद्धतींतील दोन विशेष म्हणजे पितृपूजा व मातृपितृभक्ति हे होत, धर्मगुरूंच्या बाबतीशिवाय समाजांतील उच्चनीच भाव हा जन्मावरून ठरला जात नाहीं.

 उ द्यो ग धं दे.- चीनमधील मुसुलमानांचे मुख्य उद्योगधंदे (१) शेतकी, (२) व्यापार व (३) वाहुतुकीचा व्यापार हे होत. साधारणतः मुसुलमान लोक शेतकीचा धंदा करीत नाहींत पण या देशांतील लोक मात्र शेतकीच्या धंद्यांत प्रवीण आहेत. याचें एक कारण म्हणजे चिनी लोक स्वतःशेतकचा धंदा करीत असल्यामुळें व कोणताहि परका मनुष्य आला असतां आपल्या संवयी त्याला जडविण्याची उपजत शक्ति त्यांच्यामध्यें असल्यामुळें त्यांच्या संसर्गानें मुसुलमानांनीं तोच धंदा करण्यास सुरवात केली. व्यापाराच्या बाबतींत चिनी लोक फार प्रवीण असले तरी मुसुलमानांनीं देखील या बाबतींत बरेंच प्रावीण्य संपादन केलें आहे व माल ने आण करण्याच्या त्यांच्या मोठमोठ्या कंपन्या आहेत. उदाहरणार्थ सर्व चीनमध्यें घोडे भाड्यानें देणारे व घोड्यांचा व्यापार करणारे लोक मुख्यतः मुसुलमानच आहेत; व पशुवध करणें इत्यादि धंदे हेच लोक करतात. तरी पण मुसुलमानांचा कल अधिकाराच्या जागा पटकावण्याकडेच अधिक आढळून येतो. मांगोलीयन काळानंतर आतांपर्यंत अनेक मुसुलमानांनीं लष्करामध्यें कामें केलेलीं आहेत व त्यांत त्यांनीं मानहि मिळविला आहे. याचीं ताजीं उदाहरणें म्हणजे सेनापति तंग फूसियंग व झेचौन येथील सैन्याचा सेनापति, महालुंगचा पुतण्या यूनानचा मानिकाई हे होत.

सं स्कृ ति व शि क्ष ण.- चीनमधील मुसुलमान धर्माच्या बाबतींत नेमस्तवृत्तीचे होते. स्वतःच्या शरीराच्या व वित्ताच्या संरक्षणासाठीं ते राज्यकर्त्यांनीं धर्माच्या बाबतींत हात घालण्यास थोडीफार मोकळीक देतात व मुसुलमानी अधिकारी चीन राष्ट्रीय धार्मिक विधींत भाग घेतांना आढळून येतात. येथील मुसुलमान अधिकारी परकीय लोकांचा द्वेष करतात पण तो धर्मदृष्टीनें नसून परदेशीयांच्या चीनच्या अंतस्थ कारभारामध्यें लुडबूड करण्याच्या सवयीमुळें करतात. पुष्कळ बाबतींत अधिकारांची फाजील हाव असल्यानें सुद्धां ते परकीयांचा द्वेष करतात असे दिसून येतें. उदाहरणार्थ तुंगफूसिअंग यानें अधिकाराच्या जागेसाठीं स्वतःत्सो त्संगु तंग याचा हस्तक बनून महालुंग या 'नवीन तात्त्विक' पंथाच्या संस्थापकाचा शिरच्छेद करविला, व याबद्दल त्याला पुष्कळ संपत्ति व मुलूख मिळाला. यानेंच सिनिंगफू आणि होचौ मधील बंड मोडून पुष्कळ लूट मिळविली. त्याला सेनापति अशी पदवी मिळाली पण देशाचा तो राजाच होता असें म्हटलें तरी चालेल. १९०० मध्यें पेकिंग येथें बॉक्सर बंड उद्भवलें त्यावेळीं त्यानें परकीय लोकांच्या विरुद्ध अनन्वित कृत्यें केलीं. त्याला पुढें हद्दपारीची शिक्षा दिली असतां तो कानसु येथें एखाद्या सुलतानासारखा राहिला व तेथें त्यानें आपलें इतकें प्रस्थ वाढविलें कीं, त्याच्या परवानगीशिवाय कोणतीहि गोष्ट होत नसे. १९०८ सालीं फेब्रुवारींत तो मरण पावला व त्याला मोठ्या सन्मानानें पुरण्यांत आलें. असे कांहीं साहसी लोक सोडून दिले तर चिनी लोकांमध्यें व मुसुलमानांमध्यें बराच द्वेष आहे, व तो द्वेष एखाद्या वेळीं बंडाच्या रूपानें बाहेर पडतो. विशेषतः उत्तरेकडील प्रदेशांत हा द्वेष फार माजला आहे. तरी पण हा द्वेष केवळ धर्मसमजुतींमुळें नसून, सामाजिक, औद्योगिक राजकीय, वगैरे बाबतींतील अनेक मतभेदांमुळें माजलेला आहे.

येथील मशीदी साधारणतः भव्य मंदिरासारख्या भासतात कांहीं ठिकाणीं इंडोअँरोबिक पद्धतीच्याहि मशीदी बांधलेल्या आहेत. प्रार्थनेच्या वेळीं धर्मगुरू पांढरी टोपी वापरतात पण बाकीचे लोक पगडीमध्यें बसलविलेली टोपी वापरतात. या टोप्या इतर वेळीं वापरावयाच्या नसतात. या दोन आकाराच्या केलेल्या असतात. कांहीं वाटोळ्या, तर कांही चार पांच तुकडे शिवून कंलेल्या असतात. दुस-या आकाराच्या टोप्याच पुष्कळजण वापरतात. अशाच प्रकारच्या टोप्या रशियांतील मुसुलमान व चीनच्या ताब्यांत असलेल्या तुर्कस्थानांत वापरतात.

इस्लाम धर्माच्या बाबतींत इतरत्र घडून येणारे अत्याचार येथेंहि थोडे फार आढळून येतात. कानसु येथील बंडांत मारला गेलेला महालुंग हा एक नवीन पंथाचा होता. तेथें त्याचे पुष्कळच अनुयायी होते. त्याचे सर्व अनुयायी त्याला महंमदाचा अवतार असें मानतात. हें तत्त्व काय आहे हें गूढच आहे, कांहीं लोकांच्या मतें तें तत्त्व सुनी पंथालाच पोषक आहे. कांहींच्या मतें महालुंग हा एक तोतया होता. कानसुमधील सरदार लोक याच्या नादाला लागले नाहींत. नवीन पंथाचा प्रवर्तक या नात्यानें त्यानें आपल्या अनयायांसाठीं काहीं स्वतंत्र विधी सांगितले आहेत. उदाहरणार्थ प्रार्थना मनांत म्हणण्याची प्रचलित रीत टाकून देऊन त्यानें प्रार्थना मोठ्यानें म्हणण्याची आज्ञा केली व त्या वेळीं हात सरळ व उघडे ठेवावेत असें सांगितलें. याच्यापूर्वीं सालार लोकांमधील धर्मसुधारक महमद अमीन यानें मोठ्यानें प्रार्थना करण्याची चाल सुरू केली होती आणि त्या वेळीं यावर बरेच दंगे झाले होते. महालुंगनें मशीदींमध्यें प्रार्थना करण्यास मनाई केली नाहीं तरी पण त्यानें होतां होईतों घरीं प्रार्थना करण्यास सांगितलें. या लोकांत सामान्यतः तीन चार घरांना मिळून एक प्रार्थनेसाठीं निराळी जागा असते. सुंगपानतिंगमध्यें नवीन मताचे लोक जुन्याच मशीदींमध्यें जातात. पण शेंतूमध्यें मात्र जुन्या मशीदींत नवीन पंथाचे लोक अजीबाद प्रार्थना करीत नाहींत. या नवीन मताचे लोक यूरोपिअन लोकांशीं तेढीनें वागतात, महालुंगच्या मरणानंतर भांडणें सुरू झालीं. या महालुंगचा जावई मातासि व नातू मामीसी यांच्यामध्यें युद्ध झालें. मातासि हा १९१५ सालीं बासष्ट वर्षांचा असून त्याला पुष्कळ अनुयायी होते. तो चाकौ येथें रहात असून तें ठिकाण धर्माचें केंद्र झालें आहे. महालुंगच्या तत्त्वाचा प्रसार त्याच्या टलासान नांवाच्या भावानें केला. त्याचे यूनानमध्यें फार थोडे अनुयायी आहेत.

हुफेये व चैहरिन्ये या पंथाप्रमाणेंच कुबेरिन्ये व कटेरिन्ये हे दोन नवीन पंथ येथें आढळून येतात. या दोन नवीन पंथांचा अर्थ बरोबर समजत नाहीं. एका धर्मगुरूच्या मतें चारीहि पंथांचा संबंध पहिल्या चार खलीफांशीं जोडतां येतो. ते चार खलीफा अनुक्रमें अबूबकर, उस्मान, उमर व अल्ली हे होत. जे मृतांची पूजा करतात अशांनां देखील चवथ्या पंथाचें नांव लावण्यांत येतें. चीनमध्यें इतर ठिकाणांप्रमाणेंच मुसुलमान लोक साधू लोकांच्या थडग्याला विशेष मान देतात. उदाहरणार्थ सुंगपानेतिंगच्या उत्तरेला एक मैलाच्या आंतच मदीनाहून आलेल्या साधाचें थडगें आहे. या साधूनें प्रार्थनेच्या जोरावर या प्रांताचा एका संकटापासून बचाव केला. दुसरें एक थडगें तेथेंच मशीदींमध्यें दृष्टीस पडतें. परंतु या मृतांच्या पूजेचा पुराणमतवादी मुल्ला लोक निषेध करतात.

चीनमधील मुसुलमान लोकांपैकीं बहुतेकांना इस्लाम धर्मीयांचा महागुरू खलीफ असतो हें माहीतच नाहीं. पण मागील शतकाच्या उत्तरार्धांत इस्तंबूल मधून याबद्दल जे प्रयत्न करण्यांत आले त्याचा थोडा फार परिणाम झाल्याशिवाय राहिला नाहीं. याकुब बेगनें अबदल अझीझला खलिफ म्हणून मान्य केलें. त्याचप्रमाणें यूनानचा मुसुलमान राजा सुलेमान यानें खलीफाची मदत मागितली.

मुसुलमान लोक जात्या फार धार्मिक वृत्तीचे असल्याकारणानें प्राथमिक शिक्षणाचें ध्येय मुलांनां धर्माचा ओनामा समजून देणें हें त्यांनीं आपल्या डोळ्यापुढें ठेवलें आहे व कुराणामधील उतारे व म्हणी यांचा अभ्यास या वयांत मुलांकडून करविला जातो. कुराणाचे उतारे काढलेलीं पुस्तकें अनेक आहेत. कला ही मुसुलमानांनां फारशी अवगत नाहीं. फक्त नक्षीदार अरबी लेखनपद्धति मात्र या दृष्टीनें थोडी महत्त्वाची वाटते. मुसुलमान लोक अरबी भाषेमध्यें कोरीव मुद्रालेख लिहितात.

राजकीय स्थिति.- खुद्द चीनमध्यें मुसुलमान लोकांनां स्वतंत्र राजकीय अस्तित्व नाहीं पण तुर्कस्तानमध्यें त्यांनीं कांहीं वर्षेपर्यंत याकुबबेगच्या हाताखालीं स्वतंत्र राज्य उपभोगिलें, कानसु व शेनसीमधील बंडाचा हेतु स्वातंत्र्य मिळविण्याचा होता. पण त्या चळवळीनां यश आलें नाहीं. कायमची राजकीय सत्ता असण्याला मुख्य साधन म्हणजे राष्ट्रीयत्वाची भावना होय. पण येथील मुसुलमानांत ती भावना आढळत नाहीं त्यांमध्यें एक धर्माची भावना आहे पण धर्माच्या पायावर उभारलेलें राष्ट्र कायमचें टिकत नाहीं असें इतिहास शिकवतो. कांहीं लोकांकडून असा ध्वनि निघत आहे कीं चीनमधील मुसुलमानांनीं प्रयत्न करून सर्व चीनमुसुलमानी करून मुसुलमानी करून इस्लामी-चीन राज्य स्थापलें; व अशा प्रकारची महत्त्वाकांक्षाहि मुसुलमानांमध्यें दृष्टीस पडते व चीनच्या सरकारीविरुद्ध असंतोष पसरविण्यास हें एक चांगलें साधनहि होईल हें निःसंशय आहे. परंतु ही कल्पना धर्मप्रसाराच्या महत्वाकांक्षेप्रमाणेंच स्वतःचें राजकीय हित साधण्यासाठीं उपयोगांत आणली जात आहे. अशा प्रकारचे निष्फळ प्रयत्न १९०० सालीं सुलतान अब्द अल हमीद यानें केलें व इतरहि अशाच प्रकारचे किरकोळ प्रयत्न करण्यांत आले पण ते सर्व निष्फळ झाले.