प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १७ वें.
खलीफत व इस्लामाचा प्रसार.

उमईद घराणें (इ. स. ६६१-७५०) - या घराण्यांत १४ खलीफ होऊन गेले. यांच्या अमदानींत इस्लामी सत्ता बरीच वृद्धिंगत झाली. आशियाखंडाच अगदीं पूर्वेस चीनच्या सरहद्दीवर व यूरोपखंडाच्या अगदीं पश्चिमेस स्पेन देशांत मुसुलमानी बावटा रोंवला गेला. या घराण्याच्या खलीफांची राजधानी दमास्कस येथें होती, त्यामुळें त्या शहराचा सौदर्यांत व महत्त्वांत बरीच भर पडली.

पहिला खलीफ मोआविया (६६१-६८०) हा मोठा शूर असून त्यानें मागील खलीफांच्या कारकीर्दींत सेनापतीची व सुभेदाराचीं कामें ब-याच वेळां केलीं असून, आपल्या अंगची मुस्तद्देगिरीहि अनेक प्रसंगीं दाखवून दिली होती. गादीवर आल्यानंतर ग्रीकांवर त्यानें आपलें शस्त्र उचललें. त्यानें कान्स्टंटिनोपल घेण्याचा दोनदां प्रयत्न केला व आफ्रिकेमध्यें सुद्धां मुसुलमानी सत्ता वाढविण्यासाठीं जोराची खटपट केली. ६७३ मध्यें ओबैदल्लानांवाच्या सरदारानें ऑक्ससनदी ओलांडून बुखारा घेतले. उस्मान खलीफाचा मुलगा व खोरासानचा सुभेदार जो सय्यद हा समरकंदवर चालून गेला. दुस-या सरदारांनीं काबूल, सिजिस्तान, मक्रान व कंदाहर हे प्रांत हस्तगत केले. मोआविया हा नमुनेदार अरब सय्यद (सभ्य गृहस्थ) होता. तो मोठा बुद्धिमान, आत्मसंयमी, उदार व धार्मिक होता. त्याच्यामागून यजीद खलीफ झाला. यानेंच अल्लीचे मुलगे हसन आणि हुसेन यांची कत्तल केली असा जनापवाद आहे. त्यामुळें शियापंथी मुसुलमान या कृत्याचा सूड उगविण्यास तयार झाले, त्याचा अवशेष अद्याप ताबुतांत दिसतो. यजीदनंतर दुसरा मोआविया व नंतर पहिला मरवान खलीफ झाला. यजीदचा मुलगा खालीद याचा हक्क बाजूला सांरुन मरवाननें आपला मुलगा अबदुल मलिक याला खलीफतचा वारस केलें. इ. स. ६८८ मध्यें धुलहिजा येथें जी यात्रा जमली त्या वेळीं खलीफतीवर हक्क सांगणारे चार पुरूष तेथें असून प्रत्येकाचा वेगवेगळा तळ पडला होता. या गोष्टीवरून एका खलीफाला आपल्या प्रतिस्पर्ध्यांशीं लढून प्रांत कसे आपल्या ताब्यांत घ्यावे लागत व इस्लामची मोठी शक्ति परप्रांत जिंकून खलीफत वाढविण्याऐवजीं पूर्वींच जिंकलेले प्रांत एका विशिष्ट व्यक्तीच्या किंवा पक्षाच्या ताब्यांत आणण्यांत कशी खर्च होत होती हें दिसून येईल.

अबदुल मलिकच्या कारकीर्दींत इस्लामचे पूर्वेकडील प्रांत जे आपआपसांतील युद्धांत हातावेगळे झाले होते ते पुन्हां मिळविण्याचा प्रयत्न सुरू झाला; तसेंच ग्रीकांविरुद्ध धर्मयुद्ध सुरू झालें. आफ्रिकेंत ट्यूनिस प्रांत घेऊन केरो शहर वसविण्यांत आलें. ६९३ पर्यंत मुसुलमानांचीं निराळी नाणी नव्हतीं तर ते बायझंशियन व इराणीं नाणीं वापरीत. अबदुल मलिकनें स्वतंत्र इस्लामी नाणीं पाडण्याची वहिवाट सुरू केली. आरबीभाषा ही सरकारदरबारची भाषा म्हणून मान्यता पावली. टपाल ने आण करण्याची व्यवस्थ सुरू झाली. इ. स. ७०५ त हा खलीफ वारल्यानंतर त्याचा मुलगा वालीद गादीवर बसला. इस्लामच्या इतिहासांत हा काळ अत्यंत वैभवशाली म्हणतां येईल. आशियामायनर व अमेंनिया या प्रांतांत खलीफाचा भाऊ मस्लामा व त्याचे सेनापती यानीं ग्रीकांवर अनेक विजय मिळविले व ब-याच काळपर्यंत वेढा देऊन टायना शहर घेतलें व कॉन्स्टंटिनोपल घेण्याची मोठी तयारी केली. आफ्रिकेमध्यें मूसा नांवाच्या सुभेदारानें थोड्याच दिवसांत फेझ, टँजियर आणि स्यूटा येथपर्यंत मुलुखगिरी केली. त्याच्या एका सेनापतीनें सिसिलीवर हल्ला करून सि-याक्यूज लुटलें. वालीद गादीवर आल्यानंतर पांच वर्षांनीं, स्पेनमध्यें तेथील राजा मरण पावतांच गादीच्या वारसासंबंधीं तंटा उपस्थित होऊन मृत राजाच्या मुलानें आरबांचे साहाय्य मागितलें, तेव्हां तारिक नांवाच्या सरदाराची तिकडे रवानगी करण्यांत आली. तो ज्या ठिकाणीं स्पेनमध्यें उतरला त्या स्थळाला जेबोलतारिक (''तारीकचा पर्वत'') असें नांव पडून पुढें त्याचा जिब्राल्टर असा अपभ्रंश झाला. तारीकनें राजपुत्रांच्या शत्रूचा पराभव करून त्यांचा फार दूरवर पाठलाग केला व मूसालाहि आफ्रिकेंतून आपल्या मदतीस बोलाविलें. या अरब सरदारांनीं कॉर्डोव्हा, सेव्हिले, कार्मोना व मेरिडा हीं व इतर स्थळें घेऊन राजधानींत मोठ्या थाटानें प्रवेश केला. सर्व राजपुत्र लष्करी व राजकीय बाबतीत कुचकामाचे आहेत असें पाहून दमास्कसचा खलीफ हा सबंध द्वीपकल्पाचा अधिराज आहे असें मूसानें जाहीर केलें   व मूळच्या वारसदारांनां कांहीं जहागिरी व मानमरातबी दिल्या. अशा रीतीनें पश्चिमयूरोप खंडांतील एक राष्ट्र खलिफाच्या ताब्यांत आलें.

इकडे पूर्वेकडे मुसुलमानी सैन्यानें अतिशय आश्चर्य वाटण्याजोगे विजय मिळविले. कोतैबा सरदारानें थोडक्या अवधींत पैकेंड, बोखारा, समरकंद, रव्वारिझम (खिवा), फरघणा आणि शाश, इतकेंच नव्हें तर चीनच्या सरहद्दीवरील काशगरसुद्धां घेतलें. महंमदबीन कासीमनें मक्रानवर स्वारी करून दैबोल (देवल) घेतलें सिंधु ओलांडली व हिंदुराजा दाहिर याचा पराभव केल्यानंतर सिंधमधून तो मुलतानवर चाल करून गेला व तें घेऊन मोठ्या प्रचंड लुटीसह परत आला.

वालीदनंतर सुलेमान खलीफ झाला. त्यानें कान्स्टंटिनोपलवरची वालीदनें हातीं घेतलेली मोठी मोहीम उत्साहानें पुढें चालविली पण त्याच्या कारकीर्दींत ती यशस्वी झाली नाहीं. सुलेमान नंतर दुसरा उमर, नंतर दुसरा यजीद, त्यामागून हशीम, हे खलीफ होऊन गेले. हशीम हा आपला बाप अबदुल मलिक याप्रमाणें आपलें सर्व बल देशांत शांतता व इस्लामसाम्राज्याची वाए करण्याकडे खर्च करणारा होता. खलीफ दुसरा उमर याच्या अमदानींत इस्लामला जोडलेले हिंदुस्थानांतील जे अनेक प्रांत स्वतंत्र झाले त्याला कारण सर्व मुसुलमानांना समान हक्क देण्याचें वचन पुढील खलिफांच्या वेळीं पाळण्यांत आलें नाहीं. हें होय. ग्रीकांशीं युद्ध चालू होतेंच व त्यांत मुसुलमानांची पिछेहाट होतच होती. पश्चिमेकडे मात्र पिरनीज पर्वत ओलांडून मुसुलमान फ्रान्समध्यें शिरले. तेथें त्यांनीं बोर्डो जिंकून लायरपर्यंतचा बहुतेक दक्षिण गॉल पादाक्रांत केला. पण इ. स. ७३२ मध्यें टूर्स येथें फ्रेंचांशीं गांठ पडून मोठी लढाई झाली; मुसुलमान आपल्या तळावरून मागें फिरले; त्यांचा शूर सेनापति अबदुल रहमान लढाईंत पडला. ही टूर्सची लढाई जगाच्या क्रांतिकारक लढायांपैकीं एक आहे. तीमुळें मुसुलमानांची पश्चिमेकडील प्रगति थांबून त्यांच्या ताब्यांतील ख्रिस्ती राष्ट्रें स्वतंत्र होऊं लागलीं. हशीमच्या कारकीर्दींतच मुस्लीम सत्तेला उतरती कळा लागून उमईद घराण्याचा लवकरच नाश होण्याचीं चिन्हें दिसूं लागलीं होतीं. त्याच्या मागून आलेला दुसरा वालीद, तिसरा यजीद, इब्राहीम व दुसरा मरवान या चार खलिफांचा इतिहास म्हणजे उमईदांच्या -हासाचा इतिहास होय यांत शंका नाहीं.