प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १७ वें.
खलीफत व इस्लामाचा प्रसार.
इराण :- इराणांत इस्लामीधर्माचा प्रवेश बराच लवकर झाला. महंमद पैगंबर मरण पावल्यापासून एका वर्षाच्या आंत मुसुलमानी सैन्य व इराणी सरकार यांच्यामध्यें तैग्रिस ते ऑक्झस या नद्यांच्या दरम्यान रणसंग्राम सुरू झाले ते सतत ३० वर्षें चालू होते. शेवटचें झोरास्टर घराणें इ. स. ७५० मध्यें विलयास गेलें. इस्लामी धर्माचा प्रसार व झोरास्टर धर्माचा नायनाट हळूहळू होत होता. इस्लामी धर्माच्या बौद्धिक क्षेत्रांत इराणी विद्वानांनीं ग्रंथरचना करून उत्तम कामगिरी केली. अरब लोकांनी इराण देश जिंकून घेतल्यानंतरहि इराणांतील मूर्तिपूजक लोकांत नेस्टोरियन (एक ख्रिस्ती पंथ) मिशनरी धर्मप्रसाराचें काम जोरांत करीत होते व त्यांनां यशहि चांगलें येत होतें. आणि इराणी लोकांनां इस्लामी संप्रदाय म्हणजे परकीयांचा मोठा हल्ला असल्यासारखें वाटत होतें.
अल्लीच्या पंथाला मात्र आरंभांपासून इराणांत अनुयायी मिळत गेले; याचें कारण हुसेननें एका ससनियन राजकन्येशीं लग्न लावलें होतें. उमाईद खलीफांच्या वेळीं वारंवार बंडें होत होतीं व त्यांतील पुष्कळशीं खारिजी लोकांनीं केलेलीं असत. आब्बासींचा गुप्त कट मूळ इराणांत झाला. त्यांतला कटवाल्यांचा नायक अबू मुस्लीम हा इराणी जातीचाच होता; व त्यांतील झाब येथील निर्णयक लढाई इराणच्या भूमीवरच झाली. मुसुलमानांतील शिया पंथाचा प्रसार इराणांत करण्याचा निकराचा प्रयत्न इस्माइलियनांनीं केला. नंतर मूर्तिपूजक मोगलांनीं हल्ला केला, त्यांत इराणी लोकांनाच भयंकर हाल सोसावे लागले व त्यावेळीं इस्लामी धर्म अगदीं नष्ट होण्याचा प्रसंग आला होता. तैमूर हा सुनी मुसलमान होता, तरी त्यानें कोणावरहि दया केली नाहीं. त्यानें सर्वांची सरसकट कत्तल सुरू केली. इ. स. १५०० पासून पुढें सफवी राजांच्या कारकीर्दीत शिया पंथ हा राजधर्म म्हणून स्वीकारण्यांत आला व हल्लींहि इराणी सरकारनें तोच धर्म पत्करलेला आहे. या शियापंथांत प्रकटीकरणाचें कार्य महंमद पैगंबरबरोबर संपले असें मानीत नाहींत; ते अल्लीला महंमददाइतकाच पूज्य मानतात. प्रकटी करणें व देवाचे प्रेषित पुन्हा पुन्हां होत असतात अशी यांची श्रद्धा आहे.
झोरस्ट्रियन धर्माचा कांहीं कांहीं परिणाम झालेला कुराणग्रंथांत दिसतो. इराणांत सुनी लोक १० लक्ष, शिया इराणी ५० लक्ष, तार्तार २० लक्ष, अली इलाही ३ लक्ष व बहाई १ लक्ष आहेत, असा अंदाज आहे. कर्बला हें यात्रेचें प्रसिद्ध ठिकाण असून तेथें धार्मिक शिक्षण देण्यांत येतें. प्रत्येक शहरांत शिक्षणांचें कॉलेज आहे; पण मोठी विद्वत्ता व मान मिळविण्याकरितां कर्बला येथें शिक्षण घ्यावें लागतें. १० दिवस मोहरमचा उत्सव फार मोठ्या प्रमाणांत केला जातो. यांत दु:खप्रदर्शन म्हणून ऊर बडविणें व डोकीं फोडणें असले क्लेशकारक प्रकार फार मोठ्या प्रमाणावर चालतात आणि सुशिक्षित वर्ग अल्प असल्यामुळें त्यांच्या हातून हे प्रकार बंद होऊं शकत नाहींत. मशीदीमध्यें धर्मोपदेश मुख्यतः चालू असतो व त्यांत इमामांच्या चरित्रांचें वर्णन विशेषे करून असतें. घदीर बैराम व कुर्बान बैराम यांची योग्यता सारखीच मानतात.
मुतशरी पंथांची संख्या पुष्कळ आहे. हे लोक जुन्या परंपरेच्या गोष्टींनां चिकटून राहणारे आहेत. याशिवाय शेखी, वहाबी व दुसरे कांहीं किरकोळ पंथ आहेत. शेखी लोक बुद्धिकौशल्यानें अनेक गूढ गोष्टींचा खरा अर्थ समजावून सांगणारे आहेत वहाबी हे विरक्त फकिरी वृत्तीचे आहेत. अली इलाही व बहाई हे पंथ मर्यादित अर्थानेंच मुसुलमान आहेत. पहिल्या पंथांत अल्ली खेरीज दुसरा कोणीच इमाम मानीत नाहींत, शरी-आ हा कायदे ग्रंथ मानीत नाहीत व रमदान म्हणजे प्रार्थना करण्याकडे लक्ष देत नाहींत. किरमानशहा हें या पंथाचें मुख्य ठिकाण आहे. कुर्द, तुर्क व इराणी जातीचे लोक या पंथांत आहेत व त्यांची संख्या खेड्यांपाड्यांत विशेष आहे. बहाई पंथ पर फारच प्रसिद्ध आहे. महम्मद पैगंबर व शरीआ यांच्या अधिकाराचा अतिक्रम ते करतात. या पंथाचे लोक शहरांत आहेत व सुशिक्षित वर्गांत आहेत म्हणून त्यांची संख्या अल्प असली तरी महत्त्व विशेष आहे. सुफी नांवाच्या पंथांत दरवेशी लोकांचा भरणा विशेष आहे. ते धर्माच्या तात्त्विक व बौद्धिक अंगाचाच विशेष विचार करणारे भक्त आहेत. त्यांच्यांत कवीहि पुष्कळ होऊन गेलेले आहेत, त्यांपैकीं फार प्रसिद्ध जलाल अल-दिन, शम स-इ ताब्रिझ, फरीद-अल-दिन, अत्तार व हाफिझ हे होत.
येथील धार्मिक संस्था पूर्ण लोकसत्ताक पद्धतीच्या असून उमेदवारांची लोकप्रियता पाहून त्यांची अधिकाराच्या जागेवर नेमणूक होते. हलक्या कुळांत जन्मलेल्यांनांहि धार्मिक अधिकाराच्या जागा मिळतात. सामान्य लोकांनां मशीदींतील शाळांत शिकण्याची सोय होते. मुसुलमानी देवळांतून अनीतीचे प्रकार पुष्कळ चालतात. मुल्ला लोकांची दुराचरणाबद्दल प्रसिद्धि आहे. शीर आ या कायदेग्रंथामुळें सुधारणेची मति खुंटलेली आहे. सुशिक्षित लोकांत धर्मबंधनें शिथिल होत आहेत. अगदीं अलीकडे बुद्धिप्रामाण्यवाद व (देवाच्या अस्तित्वाबद्दलच) संशयवाद उत्पन्न झाला असल्यामुळें इस्लामी धर्मांत फेरफार होणार असें दिसतें. ख्रिस्ती धर्म व पाश्चात्य संस्कृति यांचाहि परिणाम इराणवर झपाट्यानें होत आहे.