प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १७ वें.
खलीफत व इस्लामाचा प्रसार.
उत्तर आफ्रिका :- इ. स. ६४१ मध्यें अमर-बिन अलास यानें आफ्रिकेवर स्वारी करून बार्का व ट्रिपोली पर्यंत चाल केली. दुसरी स्वारी ६४७ मध्यें अबद्दल्ला अबी सर यानें करून अकुबाच्या लढाईंत तेथील सत्ताधीश ख्रिस्तधर्मी ग्रेगरी याचा पराभव केला व त्याला ठार मारले; आणि शेवटीं तो मोठी खंडणी घेऊन परत आला. पुढें ६६५ मध्यें पहिल्या उमईद खलीफानें मोठें सैन्य पाठवून बायझंटाईन बादशहाच्या फौजेचा मोड केला व तेथील मुसुलमानी अंमलाखालील प्रांतावर आपला सुभेदार नेमला. त्यानें बर्बर लोकांत मुसुलमानी धर्माचा झपाट्यानें प्रसार केला. पुढें आफ्रिकेंतल्या याच बर्बर लोकांनीं बंड करून पांच वर्षें स्वतंत्र राज्य केलें. पुढें कांहीं वर्षें अराजकता माजून राहिल्यावर ७०५ मध्यें पुन्हां अरबांनीं तो प्रांत जिंकून घेतला व तेथील ख्रिस्ती अम्मल नष्ट करून मुसुलमानी सत्ता कायम केली व बर्बर जातीचा एक सुभेदार नेमला. शुफ्री व इबादी या दोन्ही इस्लामी मतांचा येथें प्रसार झाला. ९ व्या शतकांत बगदादच्या खलीफाचे मांडलीक म्हणून कैरवान येथें अवलबाइट नांवाचें घराणें राज्य करूं लागलें व पश्चिमेकडे नव्या वसविलेल्या फेझ शहरांत इड्रिसडि घराणें उदयास आलें. याच ९ व्या शतकांतील अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे अबू अबदल्ला या फातिमिद मिशनरीनें अघलवाइट घराण्याचा नाश करून कैरवान ऐवजीं महादिया ही नवी राजधानी स्थापून तेथें एक शफी घराणें सुरू केलें. पुढें याच महादियाच्या फतिमिदांनीं सर्व ईजिप्त जिंकून कायरो शहर आपली राजधानी केली. पुढें ११ व्या शतकांत आल्मोरविद घराणें, १२ व्यांत आल्मोहद घराणें व १६ व्या शतकापासून १८३० पर्यंत शरीफ व तुर्क उत्तर आफ्रिकेंत राज्य करीत होते. नंतर फ्रेंचांचा अम्मल सुरू होऊन हल्लीं फ्रेंच साम्राज्य बरेंच पसरलें आहे. येथील मुसुलमान मूळ बर्बर जातीचे आहेत. शिवाय अरबहि वसाहती करून राहिले. येथील सुलतानांनीं नीग्रो लोकांना आपल्या सैन्यांत ठेविलें होते व एकदा त्यांची संख्या १,५०,००० पर्यंत होती.
पं थ व सं प्र दा य.- इ. स. ७५० मध्यें शाली बिन तरीफ यानें एक कुराण ग्रंथ तयार करून त्याचा प्रसार केला. त्यांत दिवस रात्र मिळून दहा वेळ निमाज पढावा, रमजान ऐवजीं रजब महिना उपवास करावा, अंडीं खाऊं नयेत वगैरे नियम सांगितले होते. हा ग्रंथ ११ व्या शतकांत लयास गेला. दुस-या एका कुराणाचा कर्ता बर्बर जातीचा हार्मीम नांवाचा इ. स. ९२५ च्या सुमारास होऊन गेला. त्यानें आपल्या पंथांत दररोज दोनच वेळ प्रार्थनेचा नियम केला. शिवाय त्यानें गुरूवारचा सबंध उपवास व बुधवारचा दुपार पर्यंत उपवास करावा असें ठरवून रमजानच्या उपवासाचें दिवस कमी केले आणि यात्रा, शुद्धिकारण व प्रायश्चित हे विधी बंद केले; डुकरीणचे मांस खाण्यास परवानगी दिली, कारण कुराणांत फक्त नर डुकराचें मांस निषिद्ध ठरविलेलें आहे. इ. स. ९२७ मध्यें या हामीमचा स्पेनमधील उमाद-अल-नाझिरनें पाठविलेल्या सैन्यानें पराभव केला व त्याचें शिर छाटून कार्डोव्हाला पाठवून दिलें.
इ. स. १२२८ मध्यें घुमरह जातीमध्यें महंमद अबील तबाजिन नांवाचा एक प्रवक्ता उदयास आला. त्यानें बरेच चमत्कार करून दाखविले व एक नवें कोडहि तयार केलें. परंतु अबद-अल-सलाम व मशीश नांवाच्या महात्मा फकीरानें त्याचा निषेध केला. तेव्हां बर्बर लोकांनीं त्याचें अनुयायित्व सोडून दिले. त्याचा सूड म्हणून महंमदानें मशीशचा खून करविला. परंतु स्यूटा येथील शिबंदी सैन्यानें महंमदाचा थोड्याच अवधींत पराभव केला व नंतर एका बर्बरनें त्याला ठार मारिलें. वदरसच्या आसपास त्याचे अनुयायी अद्यापहि अढळतात. यांच्यांतील पहिल्या प्रवक्त्यानें 'महादी' ही पदवी धारण केली; कारण पैगंबर हें नांव इतरांनीं धारण करणें मुसुलमानांनां पसंत नसे. आफ्रिकेतल्या फातिमिद व अल्मोहद घराण्यांतील मूळ पुरुषांनीं 'महादी' हीच पदवी स्वीकारली होती पण वास्तवीक हे सर्व तोतये होते. या प्रमुखपंथांखेरीज आणखी कांहीं किरकोळ धर्मपंथहि होऊन गेले.
का य दा व वा ङ्म य- उत्तर अफ्रिकेंत अनेक घराणीं होऊन गेलीं; तरी कायद्याचे मलीकी कोड हेंच बहुधा सर्वत्र प्रचलित होतें. पुढें तुर्की अमलाच्या प्रांतांत वरील कोडाबरोबर अबु हनीफाचें कोडहि चालूं करण्यांत आलें होतें. उत्तरआफ्रिकेंतील मोराक्को पासून तिंबक्तूपर्यंतच्या सर्व शहरांत धार्मिक शिक्षणाच्या ब-याच शाळा होत्या व त्यांतून शिकलेले बरेच विद्यार्थीं पुढें मोठे विद्वान लेखक व शिक्षक बनले. येथील अहमद बाबा नांवाच्या एका पंडिताच्या खाजगी संग्रहाला सुमारे १६०० ग्रंथ होते. आणि या पेक्षांहि मोठाले पुस्तकंसग्रह इतर विद्वानांजवळ होते. इब्न अस्कर यानेंहि लिहिलेला दाबत अल नशिर नांवाचा ग्रंथ फार प्रसिद्ध आहे. त्यांत मोरोक्को येथें होऊन गेलेल्या ब-याच फकीरांचीं चरित्रें दिलीं आहेत. फेज येथें १३१६ मध्यें प्रसिद्ध झालेला साल् वत् अल् अनफास नांवाचा दुसरा ग्रंथ याच प्रकारचा आहे. तथापि ऐतिहासिक दृष्ट्या उपयुक्त अशा माहिती या ग्रंथांत फारशी नाहीं.
वि धी आ चा र व गै रे- धार्मिक विधी व आर अरबांपेक्षां बर्बर लोकांच्या राहाणींत अधिक होते. १६ व्या शतकापासून बर्बर लोकांतील साधूलोकहि राजकारणांत पडूं लागलें. त्यांनीं बंडांमध्येंहि पुष्कळ वेळां पुढारीपण घेतलें होतें. सामान्यतः या लोकांचा उद्देश आफ्रिकेंतून ख्रिस्ती लोकांनां घालवून देण्याचा असे. तथापि ख्रिस्ती लोकांचीच मदत घेऊन ते कित्येकदां आपसांतहि लढाया करीत असत.
उत्तर अफ्रिकेत कित्येंक ठिकाणी प्रसिद्ध साधुपुरुषांच्या मशिदी असून तेथें यात्रेकरू जात असतात इड्रिस इबन मशीश यांच्या व इतर कित्येक मशीदी याप्रमाणें यात्रेचीं ठिकाणें प्रसिद्ध आहेत.