प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १७ वें.
खलीफत व इस्लामाचा प्रसार.
चीन-बाह्यप्रांत-तिबेट.- मुसुलमानी जगाचा भाग या नात्यानें चीनचे दोन भाग पाडतां येतील (१) खुद्द चीन (याचे आठरा प्रांत) व (२) बाह्य चीन (तुर्कस्तान, तिबेट व मंगोलिया) व या बाह्य प्रान्तांपैकीं तिबेट व मंगोलिया मधील मुसुलमानांची संख्या अतिशय अल्प असल्याकारणानें उपेक्षणीय आहे. एच डी ओलोनच्या मतें हे मुसुलमान फक्त तिबेट मधून हिंदुस्थानाला जाणा-या खडकाळ मार्गामध्यें आहेत. उदाहरणार्थ टात्सिएन्लाजवळ रहाणा-या १०० मुसुलमान घराण्यासाठीं एक मशीद आहे. व हिंदूमुसलमानांच्यासाठीं ल्हासा येथें एक मशीद आहे. व बॅटंग येथें एक मशीद आहे. तिबेटचे लामा या इस्लाम धर्माला विरोध करीत नाहींत व याबद्दल एक कारण असें आहे कीं दोघांनांहि चीनचें वर्चस्व नको असल्यामुळें दोघांनांहि राजकीय दृष्ट्या एकमेकांचें सख्य पाहिजे आहे. तरी पण तिबेटमध्यें इस्लाम धर्म प्रसृत होईल असें दिसत नाही. आतांपर्यंतच्या मुसुलमान व तिबेटी यामधील व्यापारी दळणवळणामध्यें एकहि तिबेटी वाटला नाहीं. विशेषतः झेशुआन मधील संगपँटिंग येथील मुसुलमानांचा टिबेटी लोकांशीं चहाचा फार व्यापार असतांना १९०७ च्या डोलोनच्या स्वारीमध्यें इस्लामी धर्माला एकच तिबेटी व तो सुद्धां मेटाकुटीनें मिळाला. उलटपक्षी संगपँटिंगमध्यें पुष्कळ मुसुलमानच ख्रिस्तानुयायी झालेले आढळून आले.