प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १७ वें.
खलीफत व इस्लामाचा प्रसार.

अरबस्तानः- महंमदानें मक्का शहर पुन्हां काबीज करून घेतांच सर्व अरबस्तानांतून जुन्या मूर्तिपूजकांच्या संप्रदायांचा पूर्ण नायनाट करून टाकण्याचें ठरविलें आणि इतक्या अल्पावधींत त्यानें सर्व जुने उपासनासंप्रदाय नष्ट करून टाकले कीं, महंमदाची थोडक्या काळांतील ही अवाढव्य कामगिरी पाहून फार आश्चर्य वाटतें. अरबस्तानांतील कांहीं अद्याप असंशोधित असलेल्या प्रदेशांत जुने मूर्तिपूजक लोक आहेत असें कोणी म्हणतात परंतु या विधानाच्या खरेपणाबद्दल खात्रीलायक पुरावा पुढें आलेला नाहीं; इतकेंच नव्हे तर महंमदाच्या पश्चात् जीं बंडे उद्भवलीं त्या सर्वांचा उद्देश जुना धर्म पुन्हां प्रस्थापित करण्याचा नसून केवळ मुसुलमान संप्रदायांतल्याच कित्येक कडक व जाचक गोष्टींतून सुटका करून घेण्याचा होता. एका टोळीनें बंड करून प्रार्थना करण्याच्या दररोजच्या वेळा कायत्या कमी करून घेतल्या. तात्पर्य जुने पारमार्थिक संप्रदाय लवकरच पूर्ण नष्ट होण्याच्या मार्गास लागले; इतकेंच नव्हे तर जुना धर्म पाळणारांनां व तसेंच ज्यू व ख्रिस्ती लोकांनांहि कायद्यानें शिक्षा ठेवण्यांत आली व त्यामुळें सर्व अरबस्तान अल्यावधींत मुसुलमान धर्मी बनला.

अरबस्तानाच्या खलीफांपैकीं तिसरा खलीफ मारला गेला, या गोष्टीनें महत्त्वाचे परिणाम घडून आले. पहिला परिणाम मुसुलमानी संप्रदायांत निरनिराळे पंथ उत्पन्न झाले हा होय आणि दुसरा मुसुलमानी सत्तेची राजधानी अरबस्तानाबाहेर नेण्यांत आली हा होय. तिस-या खलीफाचा खून करणारे मारेकरी ईजिप्तमधील होते व नंतर खलीफाच्या गादीवर हक्क सांगणा-या वारसांतील लढाया बसरा, कूफा व दमास्कस या शहरीं झाल्या. हींच तीन शहरें गादीकरतां भांडणा-या पुरूषांच्या राजधान्या बनल्या व त्यामुळें मदनिी शहराचें महत्त्व गेलें तें कायमचेंच गेलें. अरबस्तान हा मुसुलमानी अंमलाखालींल केवळ एक दूरचा प्रांत बनला. त्यांत पुढें कित्येक संस्थानें पूर्ण स्वतंत्रहि झालीं पण तीं आकार व राजकीय महत्त्व या दोन्ही दृष्टींनीं लहानच होतीं. उलट अरबस्तानांत जन्मास आलेले अनेक थोर बुद्धिमान पुरूष बाहेर वरील राजधान्यांच्या शहरीं जाऊन तेथें उदयास आले आणि निव्वळ धर्मनिष्ठ असे मुसुलमान मात्र अरबस्तानांत येऊन राहूं लागले.

याप्रमाणें अरबस्तानचें राजकीय महत्त्व कमी झालें खरें तरी मुसुलमानी धर्मावर अरबस्तानचा कायमचा किंवा सतत परिणाम निरनिराळ्या मार्गांनीं होतच होता. उदाहरणार्थ, मुसुलमानी धर्माचें अत्यंत पवित्र स्थळ या नात्यानें मक्का शहराचें महत्त्व आजपर्यंत कायम आहे. इस्लामच्या पूर्वापार परंपरांची माहिती फक्त मक्केंतच मिळते. यामुळें मुसुलमानी निरनिराळ्या पंथांचे लोक येथेंच एकत्र जमतात; अद्यापहि या शहराचें महत्त्व पूर्ववत् कायम आहे. दुसरे शहर मदीना. याचें महंमदाच्या वेळीं असलेलें राजकीय महत्त्व जरी लवकरच नष्ट झालें तरी मुसुलमानी विद्येचें मुख्य पीठ म्हणून त्याचा लौकिक पुष्कळ काळ कायम होता. महंमदाच्या पश्चात् त्याच्या विधवा स्त्रिया बरींच वर्षें तेथें हयात होत्या. त्यामुळें महंमदाच्या चरित्रासंबंधी ब-याच आठवणी तेथें शिल्लक राहिल्या व मुसुलमानी कायद्यांचें उगमस्थान मदीनाशहर होऊन बसलें व तेथें मोठमोठे कायदेपंडित उदयास आले. मलीक व शफी हे प्रसिद्ध कायदेपंडित येथीलच असून तीन प्रसिद्ध मुसुलमानी कायदेग्रंथ यांनीं केलेले आहेत व हेच अरबी कायदेग्रंथ बहुतेक मुसुलमानी देशांत आजहि प्रचलित आहेत. निरनिराळ्या मुसुलमानी धर्मपंथांतील आपसांत झालेल्या लढाया मात्र सगळ्या अरबस्तानाबाहेर झालेल्या आहेत. आब्बासी घराण्याचा कारकीर्दींत झुबैरचा मुलगा अबदल्ली यानें उमइद सेनापतींच्या विरुद्ध लढून मक्का व मदीना हीं दोन्ही पवित्र शहरें स्वतंत्रपणें आपल्या ताब्यांत घेण्याचा प्रयत्न केला पण तो फसला. त्यानंतरहि अरबस्तानांत कित्येक बंडें झालीं, पण त्यांचा उद्देश अरबस्तान स्वतंत्र करण्याचा होता; मुसुलमानी साम्राज्याची गादी अरबस्तानांत आणण्याचा नव्हता.

अरबस्तानांत तीन प्रमुख राजकीय पंथ होते ते सुनी शिया व खारिजी. शिया पंथाची झैदी नांवाची शाखा दक्षिण अरबस्तानांत आहे. येथे महंमदी पंथस्थापनेनंतर अत्यंत महत्त्वाची धार्मिक चळवळ वहाबी नांवाची निघाली होती. येथील वाङ्मयाकडे पाहिल्यास तें अरबांनीं स्वतंत्र निर्माण केलेले नसून इतर प्रसिद्ध ठिकाणच्या ग्रंथकारांपासून तें उसनें घेतलेलें दिसतें. येमेनच्या शाली बीन महदीनें लिहीलेला देवशास्त्रपर (अलइला अलशमिला) ग्रंथहि मूळ अरबेतर जुन्या ग्रंथाच्या आधारेंच लिहिलेला आहे. अरबस्तानांतले मुसुलमान बहुतेक फार भाविक असतात पण खेड्यापेक्षां शहरांतले अधिक नियमिपणें धर्माचें आचरण करितात. यूरोपांत ज्यूंनां लेखतात त्याप्रमाणें ख्रिस्त्यांनां हें हलके लेखतात इतकेंच नव्हे ख्रिस्ती संशोधकांनां जीव बचावण्याकरतां मुसुलमान होऊन राहावें लागते. दक्षिण अरबस्तानांतील एका वृत्तपत्राचा संपादक मूळचा ख्रिस्ती आहे.