प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १७ वें.
खलीफत व इस्लामाचा प्रसार.

इजिप्त - इ. स. ६४० मध्यें अरबांच्या ताब्यांत गेल्या पासून इजिप्तनें इस्लामी धर्माची लौकिक व पारमार्थिक दोन्हीं दृष्ट्या वाढ करण्यांत प्रमुख भाग उचललेला आहे. याचें एक कारण इजिप्तची नैसर्गिक सुसंपन्नता; दुसरें कारण, तेथील प्रसिद्ध अझर युनिव्हर्सिटी; व तिसरें, इजिप्तचा सीरियांतील पवित्र स्थळांवर असलेला ताबा. गेल्या शंभर वर्षांत तर इजिप्तनें मुसुलमानी संप्रदायाला यूरोपीय वळण देण्याचें काम इतर कोणत्याहि इस्लामी देशापेक्षां अधिक केलेलें आहे. इजिप्तचे लोक आजपर्यंत नेहमीं दुस-या लोकांच्या सत्तेखालीं रहात आले आहेत.

सातव्या शतकाच्या आरंभीं इजिप्तवर इराणची सत्ता होती, व इराणी सत्ताधीशांचा कारभार फार सौम्य व सहिष्णु होता. म्हणून पुढें जेव्हां पूर्व-ख्रिस्तसाम्राज्याच्या हिराक्लिअस बादशाहानें इजिप्त जिंकून घेतला, तेव्हां इजिप्शियन लोकांनां ही ख्रिस्ती सत्ता जुलमी वाटूं लागली. कारण हिराक्लिअसनें लवकरच ख्रिस्ती धर्म व जादा कर त्यांच्यावर लादण्याचा उपक्रम केला. त्यामुळें नाखूष झालेले इजिप्त मधील लोक अरब लोकांनां जिंकणें सुलभ गेलें, व थोडक्या सैन्याच्या मदतीनें चारदोन वर्षांत सर्व इजिप्त अरबांनीं हस्तगत केला. हें काम करणारा विजयी सेनापती उमर हाच इजिप्तचा पहिला सुभेदार झाला. त्यानें धार्मिक करांचे बाबतींत इजिप्शियन लोकांनां बिलकूल त्रास दिला नाहीं, उलट कॉप्टिक लोकांना मोठाल्या नोक-या दिल्या. त्यानें अलेक्झांड्रिया सोडून अलिकडच्या कैरो शहरानजिकच्या बाबिलोन शहरीं राजधानी आणली.

इराणी सत्तेप्रमाणें अरबांची सत्ताहि लवकरच नष्ट होईल या समजुतीनें इजिप्तमधील लोकांनीं मुसुलमानी धर्म लवकर स्वीकारला नाहीं; व ज्या कोणीं स्वीकारला तो कर द्यावे लागूं नयेत म्हणून; कारण मुसुलमानांनां कर माफ असे. उलटपक्षीं अरब सत्ताधीशहि कराचें उत्पन्न कमी होऊन सरकारी खजिन्याचें दिवाळें निघूं नये म्हणून धर्मांतराला फारसें उत्तेजन देत नसत. राज्यपद्धतिहि त्यांनी फारसा फेरबदल न करतां पूर्ववत चालू ठेविली. हिंदुस्थानांतील ब्रिटिश सरकारच्या धोरणाप्रमाणें इजिप्तमध्यें अरबांनीं वरिष्ठ अधिकाराच्या जागा मात्र आपल्या ताब्यांत ठेविल्या होत्या. हे अरब अधिकारी धर्माचे बाबतींत बिलकूल हात न घालतां फक्त शांतता राखणें, न्याय निवाडा करणें व कर वसूल करणें एवढींच कामें करीत असत. अरब मुसुलमानांनीं इजिप्तमध्यें इतकें सौजन्य दाखविलें की, या मूर्तिभजकांनीं इजिप्तमधील जुनीं देवतांचीं चित्रें असलेलीं शिक्का मोर्तबेंहि आपल्या राज्यांत चालू ठेविलीं होतीं. जेत्यांवर अरबी भाषा न लादतां ग्रीक व कॉप्टिक भाषाच सरकारी कामकाजांत चालू ठेविली. अरबीलोकांच्या जुलमाच्या तक्रारी कानांवर येतात. पण तो थोडा फार जुलूम अरब अधिका-यांचा नसून आधल्यामधल्या ईजिप्शियन नोकरांचा असे.

इ जि प्त व र अ र ब स त्ता.- इजिप्तवर उमइद खलीफांची सत्ता सुमारें एक शतक (६५८-७५०) होती. अरबांनीं एकंदर दोन शतकें इजिप्तवर राज्य केलें. त्या काळांत इजिप्तला मोठ्या शांततेचा व भरभराटीचा लाभ झाला. खलीफांनीं पाठविलेली सुभेदार चांगले न्यायी व दक्ष असत. ख्रिस्ती लोकांचा त्यांनीं धर्मनिमित्त छळ कधींच केला नाहीं. ईजिप्तमध्यें जमिनदारी पद्धति होती ती अरबांनीं बदलून जमिनी कसणा-या कुळांनां मालकी देऊन टाकली व जमीनदारांनां सरकारचा कर वसुल करणारे अधिकारी म्हणून नेमलें.

तु र्की स त्ता.- अरबांनंतर तुर्कांचा अम्मल इजिप्तवर सुरू झाला. कायरोनजीक क्वाटाई शहरीं त्यांची राजधानी होती. अरबांच्या वेळचें मोठमोठ्या इमारती वगैरे कोणतेंहि शिप्लकाम झालेलें नसल्यामुळें आरबांची आठवण म्हणून इजिप्तमध्यें कांहींच त्यांच्या मागें राहिली नव्हती. उलटपक्षीं तुर्कांचीं स्मारके पुष्कळ राहिलेलीं आहेत. तुर्की जातीच्या घराण्याचा मूळ पुरुष इब्न टूलून याची मोठी सुंदर मशीद काबाच्या देवालयाच्या धर्तीवर ख्रिस्ती शिप्लकारांनीं बांधलेली आहे त्याशिवाय इतरहि ब-याच इमारती व सार्वजनिक उपयोगाचीं कामें आहेत. तुर्की अम्मल इ. स. ८६८-९६९ पर्यंत होता.

फा ति मा इ द ख ली फ- नंतर इ. स. ९६९ ते ११७१ पर्यंत फातिमाइद वंशाच्या खलीफांनीं राज्य केलें. त्यांच्या कारकीर्दींत ईजिप्त वैभवाच्या शिखरास जाऊन पोहोंचला. त्यांची आल-क्वाहिरा राजधानी होती; तेंच अर्वाचीन कायरो शहर होय. फातिमाइद खलीफ मोठे सुधारणाप्रिय व विद्वान होते. त्यांनीं लवकरच आल्जेरियापासून सीरियापर्यंत सर्व आफ्रिका आपल्या सत्तेखालीं आणली. अरबस्थानांतील सर्व पवित्र स्थानें त्यांच्या ताब्यांत आली होतीं. वित्त व जीवित पूर्ण सुरक्षित असल्यामुळें लोकसंख्या झपाट्यानें वाढली, दळणवळण वाढलें, हिंदुस्थानाबरोबर व्यापार सुरू झाला. त्यामुळें आब्बासि खलीफांची राजधानी बगदाद या शहराला उतरती कळा लागून कायरो भरभराटीस चढले. कायरोच्या फातिमाइद खलीफांत अझीझ हा सर्वांत श्रेष्ठ निघाला. या घराण्याचें ईजिप्तवर व सर्व मुसुलमानी जगावर उपकार झालेले आहेत ते त्यांनीं स्थापलेल्या अझर कॉलेजमुळें हें महाविद्यालय इ. स. ९७२ मध्यें स्थापन झालें. त्याला जोडून गरीबांकरितां एक दवाखानाहि ठेवला होता. प्रथम तें शियापंथाचें होतें, नंतर सुनीपंथाच्या हातीं गेलें व त्याची मोठी भरभराट सुनी विद्वानांच्या हस्तेंच झाली. ११६९ मध्यें फातिमाइद वंश नष्ट झाल्यावर सर्व ईजिप्तच सुनी बनलें. फातिमाइद घराण्याची आठवण देणा-या पुष्कळ इमारती आहेत. अझरची मशीद, हकीमची मशीद व जुन्या शहराचे दरवाजे हे आजहि प्रवाश्यांनां दाखवितां येतात. पण मुख्य म्हणजे खुद्द कायरो शहर हेंच फातिमाइद खलीफांचे मोठें स्मारक आहे. सुनी पंथाखेरीज ईजिप्तमध्यें मलिक इबन-अनासचा पंथ, शफी पंथ, अबुहनीफाचा हनाफी पंथ व हनबाली पंथ हे चार मुख्य आहेत. त्यांपैकीं शफी पंथ सर्वांत अधिक लोकप्रिय असून मतस्वातंत्र्याचा मोठा भोक्ता जो हनाफी पंथ तो सरकारच्या फार मर्जीतला आहे.

 अ य्यु बि द व मा म लु क.- ११७१ ते १२५० पर्यंत अय्युबिप खलीफांनीं व १२५० ते १५१७ पर्यंत मामलुकांनीं इजिप्तवर राज्य केलें. या काळांत अझर युनिव्हर्सिटीची भरभराट अत्यंत झपाट्यानें झाली. ही युनिव्हर्सिटी म्हणजे ईजिप्तचें बुद्धिमापकयंत्रच होय. फर्डिनांड व इसाबेला यांनीं १४९८ मध्यें स्पेनमधून हाकून दिलेल्या मूर लोकांपासून किंवा १३ व्या शतकांत जेंगिझखानाच्या व १४ व्या शतकांतील तैमूरलंगाच्या खा-यांपासूनहि इजिप्तला मुळींच धक्का पोहोंचला नाहीं. आणि कार्डोव्हा व बगदाद हीं मुसुलमानी संस्कृतीचीं केद्रें रसातळास जात असतां इकडे कायरो शहर इस्लामी विद्या व संस्कृति यांचे माहेरघर होऊन राहिलें होतें. मुसुलमानी जगांतील निरनिराळ्या देशांतून विद्यार्थी अझर विद्यापीठांत येत असत. व अधिक दूरदूरच्या विद्यार्थ्यांची सोय तेथें प्रथम करीत असत. येथील अध्यापकांपैकीं सर्वश्रेष्ठ असा इबन-खाल्डून हा प्रसिद्ध इतिहासज्ञ व तत्त्ववेत्ता होता. हा मूळ ट्यूनिसचा रहिवासी असून कायरो येथें मलिकींच्या काझीच्या अधिकारावर नेमला होता. तेथेंच तो १३०६ त मरण पावला प्रो. फ्लिंट यांनीं आपल्या इतिहाससिद्ध तत्त्वज्ञानाच्या इतिहासांत इब्न खल्डून याचे उतारे देऊन तारीफ केली आहे. या अझर विद्यापीठाची किर्ती यूरोपांतील विद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या काळापर्यंत कायम होती. पुढें मात्र तें जुन्या, मागसलेल्या शिक्षणाचें स्थान होऊन बसलें. तेथें फक्त देवज्ञान, धर्मशास्त्र व व्याकरण या तीन विषयांचें जुन्या पद्धतीनें शिक्षण मिळूं लागलें गणित, सृष्टिविज्ञान, इतिहास, भूगोल वगैरे विषयांकडे पूर्ण दुर्लक्ष झालें. उलट यूरोपमध्यें शिक्षण व संशोधन दोन्ही बाबतींत ख्रिस्ती लोकांचें पाऊल झपाट्यानें पुढें पडूं लागलें.

सं प्र दा य - ख्रिस्तीमधर्मांतील मठांची स्थापना ईजिप्तमध्यें प्रथम झपाट्यानें झाली होती. पुढें मुसुलमानी धर्म स्वीकारल्यावरहि ही मठवासी वृत्ति इजिप्शियन लोकांमध्यें कायम होती. गूढार्थकविता लिहिणारे कवीहि पुष्कळ झाले. त्यांत इबन-अल्-फरिद हा सर्व श्रेष्ठ होय. (११८१-१२३५) मुसुलमांनी धर्म मूळ एकेश्वरवादी खरा, पण त्यांत पुढें मुसुलमान साधुसंत फार झाले व त्यांची पुजा अर्चा लोक करूं लागले. मुसुलमानी जगांत असल्या साधुसंतांचे मठ व धार्मिक पण गुप्त संस्था फार आहेत. अशा या पूज्य मानलेल्या फकीरांच्या मशीदीहि जागोजाग सर्व मुसुलमानी देशांत पसरलेल्या आहेत. तेथें रोगमुक्ततेकरतां किंवा पुत्रप्राप्तीकरतां नवस, मंत्रतंत्र वगैरे गोष्टी चालू असतात व शिवाय अनीत्याचरण व गुन्हे करण्यासहि हीं ठिकाणें पुष्कळ अंशीं सोयीच्या जागा होतात.

पु न्हां तु र्की स त्ता.- इ. स. १५१७ पासून पुढें इजिप्तवर ओटोमन तुर्कांचें राज्य होतें. १७९७ मध्यें फ्रेंच लोकांनीं ईजिप्तवर स्वारी केली, तेव्हांपासून इजिप्तचा इतिहासांत नवें युग सुरू झालें. खेदिवांनीं यूरोपीय वळण सर्व गोष्टींनां देण्याचा उपक्रम सुरू केला. महंमद अल्लीनें बरेच तरूण शिक्षणाकरतां पॅरिस येथें पाठविले, पण त्यांना यूरोपियांच्या सदगुणांपेक्षां दुर्गुणच अधिक लागले. इस्मायलनें रेल्वे व तारायंत्रे सर्व देशभर सुरू केलीं. तैफिकच्या कारकीर्दींत गुलामपद्धति बरीच कमी झाली व अनेकपत्निपद्धतिहि नाहींशी होत चालली. त्याच वेळेपासून वृत्तपत्रांनांहि लेखनमुद्रणस्वातंत्र्य मिळालें, पण त्याचा आजपर्यंत दुरूपयोगच अधिक झालेला आहे. हल्लीं स्त्रियांकरतां स्त्रिंयांनीं चालविलेलीं अशीं तीनचार पत्रें आहेत. तेथें तीन प्रमुख राजकीय पक्ष आहेत. ते राष्ट्रीयपक्ष, काँझर्वेटिक अथवा पुराणाभिमानीपक्ष व तिसरा प्रोग्रेसिव्ह अथवा प्रागतिकपक्ष. वृत्तपत्रें या निरनिराळ्या पक्षांनां वाहिलेलीं असतात. अझर युनिव्हर्सिटी १९०९ पर्यंत जुन्या पद्धतीचें १३ व्या शतकांतलेंच शिक्षण देत होती. त्या सालीं विद्यार्थ्यांनीं संप करून शिक्षणक्रमांत कांहीं सुधारणा करून घेतल्या. त्यापूर्वीच खार्टूम येथें गॉर्डन कॉलेज व कायरो येथें एक आधुनिक शिक्षण देणारी युनिव्हर्सिटी स्थापन झालेली आहे.

कला.- एकंदरीत इजिप्तमधील मुसलमानी धर्म उच्च दर्जाचा होता व त्यानें ज्ञानप्रसारालाहि बरेंच उत्तेजन दिलें. पाषाण व धातूच्या कलाकौशल्याच्या कामालाहि त्यानें बरेंच उत्तेजन दिलें. तेथील लोक फ्लॅस्टरची जनावराची चित्रें करीत असत. मामलूकांच्या कारकीर्दीत बांधलेल्या मशीदी फार नमुनेदार आहेत. खेदिवांच्या कारकीर्दींतहि शिप्लकलांनां चांगलें उत्तेजन मिळालेलें आहे. अरबांनीं जुन्या इमारतींची व बांधकामाची मोडफोड केली नाहीं. मुसुलमानांनी इराणमध्यें झोरास्ट्रिअन धर्माचा व स्पेनमध्यें प्रॉटेस्टंटपंथाचा उच्छेद केला, पण इजिप्तमधील कॉप्टिक पंथ अरबांनीं नाहींसा केला नाहीं. ब्रिटिशांनीं ईजिप्त व्यापण्याचा उपक्रम केला तेव्हां कॉप्ट लोक जुन्या मुसुलमान राजकर्त्यांनां मिळून राहिले, ही गोष्ट विशेष लक्षांत घेण्यासारखी आहे. येथील मुसुलमानांची नीतिमत्ता इतर देशांतील मुसलमानांपेक्षां वाईट नव्हती. अद्यापहि धूम्रपान, सार्वजनिक रस्त्यावरील नाच तमाशे, गाणी व गोष्टी ऐकणें असले शोक त्या लोकांत फार आहेत.