प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १४ वें,
भूशास्त्रें
इलॅड्नीच्या उपपत्तीस पुष्टि.- यानंतर, विच्छिन्नकिरणदर्शकानें उल्का व तुटणारे तारे यांचें सादृष्य सिद्ध केलें; व वातावरणांतील या उल्कांचा धूमकेतू व तेजोमेघ यांसारख्या दूरदूरच्या ब्रह्मांडवासीयांशींहि संबंध जोडला गेला. अशा रीतीनें इलॅड्नीचा १७९४ मधील धाडसी वाटणारा सिद्धांत पूर्ण प्रत्ययास आला, व हल्लीचें ब्रह्मांड मनुष्याच्या पूर्वकल्पनांपेक्षां निराळें आहे अशी खात्री झाली.
याप्रमाणें, हा पूर्वीच्या शास्त्रज्ञांस खरा न वाटणारा पाषाण वृष्टीचा चमत्कार अगदीं नैसर्गिक गोष्ट असून, आपल्या वातावरणांत दररोज लाखोंवेळां तो पुन्हां पुन्हां घडत असतो हें सर्वांच्या दृष्टोत्पत्तीस आलें.