प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण ९वें
आर्य-असुर-संबंध.

असुरांच्या प्रदेशांत आर्य. (डॉ. रा. गो. भांडारकर) - ''आशिया-मायनरमध्यें, हिटाइट लोकांचा राजा आणि मिटनीचा राजा यांच्यांत झालेल्या तहासंबंधी जो शिलालेख सांपडला आहे, त्यांत मिटनीचा राजा, इंद्र, मित्रावरूण आणि नासत्य यांनां त्यांच्या ॠक्संहितेंत आढळणार्‍या नांवांनीं आव्हान करीत असल्याचें दिसून येतें. हा लेख सांपडल्यापासून यांत घडलेल्या गोष्टीला वैदिक संस्कृतींत कोठें स्थान द्यावें असा प्रश्न पंडितांपुढें येऊन पडला आहे. या प्रश्नाचें समाधानकारक उत्तर अद्याप मिळालेलें नाहीं; पण ज्या योगानें या प्रश्नाचा पटेल असाच उलगडा होणार आहे, अशी एक संशोधनाची दिशा दाखवितां येईल. संशोधनाला 'असुर' शब्दापासून सुरुवात करावी. ब्राह्मणग्रंथामध्यें याचा अर्थ देवांचे वैरी असणाऱ्या प्राण्यांची एक जात, असा आहे. ॠक्संहितेंत सजीव, ''वीर्यशाली, '' ''बलिष्ठ'' अशा अर्थानेंच बहुधा हा योजलेला असून, द्यौ, इंद्र, वरुण इ. निरनिराळ्या देवांचे विशेषण म्हणून असतो. पण तीन चार ठिकाणीं देवशत्रु असा अर्थ घ्यावा लागतो. तथापि अशीं कांहीं स्थळें आहेत कीं, त्यांता असुरांसंबधीं जें म्हटलें आहे ते दैस्यूच्या संबंधांत लागू पडण्यासारखें असतें; आणि त्या स्थळीं असुर शब्दाचा अर्थ मानवशत्रू असा घेतां येतो. ॠ. ८, ९६,९ या ॠचेंत, जे देव नाहींत किंवा ज्यांनां देव नाहीं अशा असुरांना आपल्या चक्रानें मारण्याविषयीं इंद्राला पाचारण केलें आहे. दुसऱ्या स्थळीं बर्चिन्, आणि पिप्रु असुरांच्या सैन्यांचा देवांनीं नाश केल्याचें म्हटलें आहे. इंद्र, अग्नि, सूर्य यासारख्या कांहीं देवांना असुरहन् म्हटलें आहे.

खालीं दिलेल्या उल्लेखांतून असुर संज्ञेचा अर्थ ज्यास्त स्पष्टपणें मानवशत्रु असा होतो, अथर्व. १९.६६,१ मध्यें उपासक असुरांनां शत्रू (सपत्नान्) असें म्हणतो व त्यांना मारण्याविषयीं अग्नीची प्रार्थना करितो. जर ते उपासकाच शत्रू असले तर ते दस्यूंप्रमाणें मानव असले पाहिजेत. अथर्व ९,२,१७ आणि १८ मध्यें पुन्हा, देवांनीं ज्याप्रमाणें दस्युंना निबिड अंध:कारांत लोटून दिलें त्याप्रमाणें उपासकांच्या शत्रूंनां हांकलून लाविण्यासाठीं कामाला आव्हान केलें आहे. या ठिकाणीं असुरांची दस्तूंशी तुलना केली आहे. आणि म्हणून ते एखाद्या विशिष्ट देशांतील मूळ रहिवाशी असावेत. अथर्व. १०.३,११मध्यें ''स मे शत्रून् वि बाधताभिन्द्रो दस्यूनिवासरान्'' असा ॠगर्ध आहे; तेथें, वरण वृक्षाच्या ताईतानें, इंद्राने दस्यु असुर यांचा नाश केल्याप्रमाणें तो धारण करणाऱ्याच्या शत्रूंचा नाश करावा अशी इच्छा केली आहे. या ठिकाणीं दस्यु आणि असुर हे शब्द जवळ जवळ आले असून दस्यु शब्द असुराला लाक्षणिक म्हणून आला आहे. त्यांचा एकत्र अर्थ ''दस्यु असुर'' म्हणजे ''रहिवासी असुर'' असा तरी होईल किंवा ''दस्यु आणि असुर''असा होईल. तेव्हा भारतांतील मूळ रहिवाशांनां दस्यु असें नाव असलें तर असुर हेंहि दुसऱ्या एखाद्या देशांतील मूळ रहिवाशांचें नांव असलें पाहिजे, हें समजण्यास अवघड पडणार नाहीं. कांहीं लोक दस्यु याचा अर्थ दैत्य किंवा देवशत्रु असा घेतात. पण, आर्य देवांनां न जुमानणारें, आर्यसंस्कार न पाळणारे आणि ज्यांचा पाडाव करण्यास देवानीं आर्यांना समर्थ केले असे कृष्णवर्णीय भारतांतील मूळ रहिवाशी असा अर्थ ज्यास्त रूढ असून, त्यापासूनच देवशत्रू असा अर्थ पडला असावा. ऐतरेय ब्राह्मणांत (७.१८) याचा अर्थ मूळ रहिवाश्यांची जात असा स्पष्टपणें घेऊन, आंध्र, पुण्ड, शायर पुलिन्द आणि मूतिब हे त्याच्याच जातींत घातले आहेत. ''

या वरील उताऱ्यांत असुर हे दस्यूंप्रमाणेंच आर्य फिरस्त्यांचे शत्रू असून आर्यांच्या देवांनी त्यांचा नाश केला असें वर्णन आहे. पातञ्जलमहाभाष्यात एके ठिकाणीं असुर हें नांव म्लेच्छांच्या किंवा परकीयाच्या एका विशिष्ट वर्गाचें द्योतक म्हणून आलें आहे. ''तेऽसुरा हेलयो हेलय इति कुर्वन्त: पराबभूवु: । तस्माद्ब्राह्मणेन न म्लेच्छित वै नापभाषितवै । म्लेच्छो हवा एष यद्पशब्द: । म्लेच्छा मा भूमेत्वध्येयं व्याकरणम्॥'' ''ते असुर हेलय: हेलय: असे शब्द करीत पराभव पावले – कारण, भाष्यकार म्हणतात, हे ३ अरय: हे ३ अरय: या शुद्ध संस्कृताच्या ऐवजी, त्यांनी दीर्घ स्वर गाळला, अ तोडून काढला, आणि र चा ल केला आणि अशा रितीनें आपण आर्य नाहीं. म्लेच्छ आहोंत असें दाखविलें. म्हणून ब्राह्मणानें म्लेच्छाप्रमाणें वागूं नये व अपशब्द बोलूं नये. अपशब्द म्लेच्छ आहे असें म्हणतात. आपण म्लेच्छ बनता कामा नये म्हणून व्याकरण शिकावें. '' या ठिकाणीं असुर शब्दाचा अर्थ परकीय, अब्राह्मण जात असा स्पष्ट केला आहे.

हा पातञ्जलभाष्यांतील उतारा कोणत्या तरी ब्राह्मणांतून घेतला असला पाहिजे. शतपथ ब्राह्मणांत (३.२, १. १८-२४) अशाच तर्‍हेचा एक उल्लेख आढळतो. त्या ठिकाणीं असें म्हटलें आहे कीं, देव आणि असुर दोघेहि प्रजापतीपासून उत्पन्न झाले, व आपल्या पित्याचा दाय मिळविते झाले; देवांनां मन मिळालें व असुरांना वाणी मिळाली; त्या योगानें देवांनां यज्ञ व असुरांनां फक्त वाणी प्राप्त झाली; देवांना दूरचें जग (स्वर्ग) व असुरांनां ही (पृथ्वी) लाभली. नंतर प्रजापतीपासून असुरांना मिळालेली वाणी त्यांच्याकडून हिसकावून घेण्याचा देवांनीं उद्योग आरंभिला व तसे झाल्यावर असुर हेलव: हेलव: असें म्हणत पराभव पावले यांनीं काढलेले उद्गार अशा प्रकारचे न कळण्यासारखे होते, आणि (जो असें बोलतो) तो म्लेच्छ असतो. म्हणून कोणींहि ब्राह्मणानें म्लेच्छ भाषा बोलूं नये (न म्लेच्छेत्) कारण असुरांची वाणी अशा प्रकारची असते (असुर्याहैषावाक्). येथें दोन विधानांवर भर दिला पाहिजे. देवांनां स्वर्ग नेमून दिला व असुरांनां पृथ्वी दिली हें एक विधान. याचा अर्थ असुर हे पृथ्वीवरील रहिवाशी होते. दुसरें विधान म्हणजे, ब्राह्मणांनीं म्लेच्छाप्रमाणें वागू नये, म्हणजे म्लेच्छ भाषा बोलूं नये अशाबद्दल केलेली आज्ञा. याचें कारण ती असुरी भाषा आहे. यावरून असें दिसून येते कीं, असुर हे म्लेच्छ भाषा बोलणारे पृथ्वीवरील रहिवाशी होते असें मानीत; तेव्हां ते म्लेच्छ किंवा परकीय रानटी लोक होते. जे पृथ्वीवर राहात होते, जे म्लेच्छ होते आर्यांचे जे शत्रू किंवा प्रतिस्पर्धी होते आणि हिंदुस्थानांत आर्यांना अडथळा करणाऱ्या दस्यूंशीं किंवा हिंदुस्थानातील मूळ रहिवाशांशीं ज्यांची तुलना केली आहे ते हे असुर कोण होते, या प्रश्नाचें उत्तर आपण येथें विचारांत घेतलेल्या शिलालेखानें मिळेल.