प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.

सामान्य ज्ञान आणि शास्त्रीय ज्ञान.- सामान्य ज्ञानास शास्त्र असें स्वरूप येत असतांना ज्या ज्या क्रिया होतात त्यांचा स्थुल मानानें खालीलप्रमाणें निर्देश करतां येईल.-

१. प्रत्यक्षसंकलन.- (इंडक्शन) सामान्य विचाराचा विषय जो विषय असेल त्याशीं सदृश आणि असदृश अशा अनेक भावांची (फिनामिनाची) मोजदाद करणें.

२.वर्गीकरण.- बरेचसे सदृश भाव एकत्र झाले म्हणजे त्यांचे वर्गीकरण करणें.

३. कार्यकारण शोध.- जे भाव दृष्टीस पडतील ते कशानें उत्पन्न झाले त्यांच्यामुळें आणखी दुसरे कोणते भाव उत्पन्न होतात त्यांचा अन्वय म्हणजे कार्यकारणसंबंध लावणें. भावांचें रुपांतर होत असतांना रूपांतरास कारक अशा ज्या ज्या गोष्टी होत असतील त्यांची नोंद घेणें.

४. अवयवज्ञान.- वस्तूचे घटक जाणणें व तिच्या रूपांतरांत घटकाचे होणारे फेरबद्दल जाणणें. भावांचे स्वरूप बदलण्यापूर्वी, जें स्वरूप असेल त्याची अंगें अनेक असतील. आणि भावांचें स्वरूप बदलल्यानंतर जो निराळा भाव उत्पन्न होतो त्याचें स्वरूप जर विविध असेल तर पूर्व भावाच्या कोणत्या अंगामुळें नवीन भांवांतील कोणतें अंग उत्पन्न झालें याचा तपास करणे;

५. अवलोकनशुद्धि.- वरील प्रकारचें संशोधन करतांना आपल्या ज्ञानाची सुरूवात प्रत्यक्ष अनुभवापासुन होते. प्रत्यक्षा पासून ज्ञानाची सुरूवात सर्वोतच सारखी होते;  परंतु जंगली मनुष्याचें प्रत्यक्षज्ञान व शास्त्रज्ञाचें प्रत्यक्षज्ञान यांत मोठा फरक आहे. केवळ प्रत्यक्षानें अत्यंत थोडें ज्ञान होतें. ज्ञानाचा विस्तार त्यावरून काढलेल्या अनुमानपरंपरेनें होतो. पुष्कळशीं अनुमानें आपण प्रत्यक्षासारखींच समजतो. उदाहरणार्थ, आपण केवळ अवलोकनानें स्वरूपावरून चांदी, सोनें, मोतीं, वगैरे पदार्थांस नांवे देतो व ओळखतों. ज्या वेळेस आपण चांदी पहातों त्या वेळेस आपण एक चकचकीत नेहमीच्या परिचयाचा रंग पहातों आणि केवळ रंगावरून चांदी आहे असें ओऴखतों. ह्या वेळेस चांदी पहात नसून अमुक चांदी आहे हें आपलें अनुमान असतें. अनुमानानें काढलेले सिद्धांत प्रत्यक्ष ज्ञानापासून फार दूरवर पोंचतील तेव्हां त्या अनुमानानें काढलेल्या ज्ञानास शास्त्र असें नावं द्यावयास हरकत नाही.

६. जेव्हां अनेक भाव समकालीन असतात, किंवा एकाची पुनरावृत्ति झाली म्हणजे दुसर्‍याची पुनरावृत्ति होऊं पहाते, तेव्हां त्या भावांमध्यें अन्योन्याश्रय स्वरूपाचा संबंध काय आहे हें पहावें लागतें.

७. कोणतेहि भाव संकीर्ण दिसले किंवा परस्परांशी संबद्ध दिसले तर त्यांचे पृथक्करण व एकीकरण वारंवार करून पहाणें अवश्य होतें.

८. प्रत्यक्षापासून होणारें ज्ञान शास्त्रज्ञ केवळ अनुमानानेंच वाढवितो असें नाही तर तो यंत्रांनींहि वाढवितो. यंत्राशिवाय होणारें प्रत्यक्ष ज्ञान अस्फुट असेल तर यंत्राच्या साहाय्यानें तें स्फुट करणें, आणि जो अनुभव मंदत्वानें मिळत असेल तो तीव्रत्वानें मिळविणें इत्यादि क्रियांस यंत्रांचा उपयोग होतो.

९. शास्त्रघटनेमध्यें अनुभवसिद्ध गोष्टी दोन प्रकारांनीं गोळा करितां येतात. एक तर प्रयोग करणें. प्रयोग अचेतन पदार्थांवर कांही अंशी वनस्पतींसंबंधानें आणि कांहीं अंशीं प्राणिवर्गासंबंधानें देखील करतां येतात. तथापि पुष्कळ भावक्षेत्र असें आहे कीं तेथें प्रयोग करणें शक्य नाहीं. उदाहरणार्थ आजकाल ज्याची बरीच वाच्यता चालली आहे. तें सुप्रजाजननशास्त्र म्हणजे "युजेनिक्स" घ्या. या शास्त्रांतील ज्ञानासाठीं मनुष्यांवर प्रयोग करतां येणें शक्य नाहीं. झाडांवर आणि पशूंवर प्रयोग करून जीं तत्त्वें निघतील तीं म्हणजे सर्व प्राणिशास्त्राचीं तत्त्वें फारतर सुप्रजानिर्माणार्थ कल्पना सुचवण्यास उपयोगी पडतील. अनुभवसिद्ध गोष्टी किंवा सत्यें मिळविण्याचें दुसरें साधन अवलोकन. बर्‍याच प्रसंगी प्रयोगाची अशक्यता असल्यामुळें ज्ञानाचें उत्पादन चालू परिस्थितीच्या अवलोकनानेंच होत आहे. अर्थात् चांगल्या शास्त्रज्ञास अवलोकनापासून सत्य अधिक काढतां येतें व अवलोकन पद्धतशीर कसें करावें हें समजतें. अवलोकनांत पद्धति आणण्याकरितां झालेल्या प्रयत्‍नांत दोन हेतू होते. (१) थोडक्या भावांवरून सिद्धांत काढण्यापेक्षां सदृश भावांचा संग्रह मोठा केल्यास स्थानिक व नैमित्तिक कारणांमुळें भावक्षेत्रांत जर कांही विशेषत्व आलें असलें तर तें विशेषत्व मोठ्या समूहांत विलीन होऊन सामान्य समूहविषयक सिद्धान्त काढतां यावा आणि (२) निरनिराळ्या काली होत असलेल्या फेरफारांची नोंद करतां यावी. या दोन हेतूंमुळे "स्टॅटिस्टिक्स" म्हणजे "अंकपद्धति"  लोकप्रिय झाली. मानवशास्त्रामध्यें पुष्कळदां प्रयोग शक्य आहेतः  पण, हे प्रयोग यशस्वी होण्यासाठीं अवलोकनकौशल्यच अधिक पाहिजे. उदाहरणार्थ बरेच झालेले सभाजव्यंग. निवारणविषयक म्हणजे दानविषयक प्रयत्‍न प्रयोगच आहेत.