प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.

शास्त्रेतिहासांचा पद्धतिशास्त्रास आणि शास्त्रवृद्धीस उपयोग:- शास्त्रांचे इतिहास हे त्यांच्या वाढीस फारच महत्त्वाचे आहेत. निरनिराळ्यां शास्त्रीय विषयांत परिश्रम करणार्‍या शास्त्रज्ञांची चरित्रे म्हणजेच हे इतिहास असे नव्हे;  किंवा आजपर्यत जे शास्त्रीय शोध होऊन गेले त्यांची केवळ अनुक्रमानें माहिती देणें म्हणजे इतिहास असेहि नाहीं. जर एखाद्या इतिहासकाराच्या मनांत इतिहासलेखनार्थ घेतलेल्या शास्त्राची वाढ करण्याच्या कामीं खरोखरच आपला कांही उपयोग व्हावा अशी इच्छा असेल, तर त्याला त्या शास्त्राच्या प्रगतीस पुष्कळच हातभार लावतां येण्यासारखा आहे. शास्त्राच्या इतिहासकारांपासन ज्या गोष्टींची अपेक्षा करण्यांत येते ती हीच कीं, त्यांनीं पद्धतिशास्त्राच्या वाढीस शक्य तेवढी मदत करावी. कारण शास्त्र हे नेहमी आपल्या वाढीबरोबरच सहजच निरनिराळ्या पद्धतीचीं वाढ करीत असतें. एखाद्या सिद्धांताचा विचार करतांना शास्त्राभ्यासी हा आपल्या स्वतःचेच कांही तरी पूर्वपक्ष करून त्यांवरुन आपल्या युक्तिवादानें नवीन शास्त्रीय सत्य शोधून काढूं पाहतो. बहुतेक प्रंसगीं, जेव्हां एखादा शास्त्राभ्यासक, विशेषतः हुषार शास्त्राभ्यासक, एखादी नवीन युक्ति शोधून काढतो त्या वेळी त्याच्या पद्धतिशास्त्रांतील शोधाची त्याला जाणीवहि नसते. म्हणून अशा नवीन पद्धति व युक्त्या एकत्रित करून त्यांची नीट व्यवस्थेशीर मांडणी करणे इतिहासकारांचे ध्येय असलें पाहिजे.

अनुमानाच्या बलावर प्रत्यक्ष ज्ञानाचे क्षेत्र विस्तृत करणें हाच संशोधनपद्धतीचा उद्देश असतो. इतर कोणत्याहि शास्त्रज्ञांपेक्षा समाजशास्त्रसंशोधकांना आपल्या संशोधनामध्यें ज्यास्त विविध पद्धती उपयोगांत आणाव्या लागतात. कारण, इतर शास्त्रज्ञांस सोडवावयाच्या सिद्धांतांपेक्षा या शास्त्रज्ञांचे सिद्धांत विविध व गुंतागुंतीचे असतात. शास्त्रीय संशोधनांत प्रत्येक प्रंसगी तर्कशक्तीची अतिशय अवश्यकता असते. ज्ञात असलेल्या गोष्टीपासुन अनुमानें काढणे हे तर्कशक्तीचें कार्य आहे. न्यायाधिशास न्यायदानसंबधी कराव्या लागणार्‍या क्रियेप्रमाणे समाजशास्त्रीय संशोधकांसहि पूर्वी घडलेल्या उदाहरणांवरूनच तत्त्वनिर्णय करावा लागतो. पद्धतीसंबंधी तत्त्वें काढतांना झालेल्या शोधांची विविध प्रकारची उदाहरणे संग्रथित करून एखाद्या शास्त्रांतील पुराव्यांच्या उपयुक्ततेचे किंवा इतर ठोकळ नियम बांधण्यांत फारच खबरदारी घ्यावी लागते.

पद्धतिविषयक लेख लिहिण्यास सर्वच लोक लायख असतात असें नाही. नालायक लोकांनीच या विषयावर अधिक लिहलेलें सांपडेल.  जॉन स्टुअर्ट मिल्लनंतर होऊन गेलेल्या, व "पद्धति" विषयावर ज्यांनी बरेच ग्रंथ लिहिले आहेत अशा कित्येक अर्थशास्त्रज्ञांनी व समाजशास्त्रज्ञांनी पद्धतीवर लिहितांना आपली जाडी विद्वत्ता दाखविण्यापलीकडे अधिक असें कांहीहि कार्य केलेलें नाही. ज्या नवशिक्यांस अशा विषयावरील तत्त्वज्ञांच्या विवेचनाची युक्तायुक्तता कशी ठरवावी हें माहीत नसतें, ते या प्रकारच्या अनुपयुक्त विद्वतेच्या प्रदर्शनानें अगदीं गोंधळूनच जातात. जेथें ग्रंथकार विषयस्पष्टीकरणाचा मनःपूर्वक प्रयत्‍न करण्या ऐवजीं केवळ आपल्या विद्वत्तेचेंच प्रदर्शन करतात त्यांच्या कृतीचा तीव्र निषेधच केला पाहिजे. कधी कधीं तर या ग्रंथकारांचे विद्वत्ताप्रचुर विवेचन इतकें दुर्बोध होतें कीं, वाचणारास तें समजत नाहीं आणि तेव्हां आपण फारच मठ्ठ डोक्याचे आहोंत की काय अशी त्यास शंका येऊं लागते. वरील विधान इंग्रज व अमेरिकन ग्रंथकारांनी या विषयावर ग्रंथ लिहिले आहेत त्या लेखनासच विशेषतः लागू पडतें. एका तज्ज्ञ माणसानें या पुस्तकांविषयीं असें म्हटलें कीं, "पद्धतिशास्त्रावरील अनेक ग्रंथकारांचे ग्रंथ वाचून पाहिले आहेत परंतु त्यांपासुन कांहीहि बोध झाला नाहीं.

"पद्धति" विषयावर लेखनव्यवसाय करण्यास, म्हणजे एकंदर शास्त्रीय ज्ञानाची व्यवस्थित मांडणी करून नवीन शास्त्रीय शोध लावण्याकरितां उपयुक्त असे ठोकळे नियम बांधण्यास वाटेल तो मनुष्य लायख नसतो; आणि निरनिराळ्या विशिष्ट शास्त्रांचे अध्ययन करणार्‍यांमध्ये वरील काम नीट रीतीनें करणारीं फारच थोडी माणसें असतात. यावरून शास्त्रज्ञांमध्यें योग्य पद्धतीचा उपयोग करणारे लोक फारच थोडे असतात अशी भलतीच समजूत मात्र कोणी करून घेऊ नये. हुषार शास्त्रज्ञ पद्धतिशास्त्राच्या ग्रंथांत वर्णिल्या जाणार्‍या पद्धतांपेक्षा सर्व प्रकारें श्रेष्ठ अशा रीती नेहमीं योजीत असतात. ज्यांनां नीट सुसंबद्ध रीतीनें विचार करतां येतो पण तर्कशास्त्राच्या सामान्य सिद्धांतांचें सुद्धां आकलन करतां येत नाही, अशीं ज्याप्रमाणें माणसें आढळून येतात, त्याचप्रमाणें कांहीं माणसे अशींहि दिसून येतात कीं, त्यांना शास्त्रीय शोध लावण्याकरितां नवीन अशा स्वतःच्या कित्येक युक्त्या योजतां येतात परंतु त्यांनीं केलेल्या संशोधनांची पद्धतिविषयक उपपत्ति मात्र त्यांस लावून देतां येत नाहीं.