प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.

शास्त्रांचें वर्गीकरण व रचना.- ही कशी करावींत या संबंधाने यूरोपांत अद्याप वाद चालत आहेत. तथापि सर्वमान्य झालेलें एक तत्त्व म्हटले म्हणजे अनेक पद्धती उपयुक्त आहेत व अमुकच तर्‍हेचें शास्त्राचें वर्गीकरण केलें पाहिजे असा हट्ट धरूं नये हें होय. गेल्या शतकांतील शास्त्रीय वर्गीकरणासंबंधाचा प्रसिद्ध वाद म्हटला म्हणजे स्पेन्सर यानें केलेला होय. कॉट या फ्रेंच तत्त्ववेत्त्यानें शास्त्राची रचना महत्त्वांकित सोपान परंपरेच्या पद्धतीने केली होती; आणि ती पद्धती स्पेन्सरला मान्य नव्हती. स्पेन्सरचें मत असें होतें की एका शास्त्रापेक्षां दुसरें शास्त्र उच्च असें न समजतां अनेक शास्त्रें समान दर्जांची समजली जावीं. स्पेन्सरच्या विचारपद्धतीचें येथें थोडें दिग्दर्शन केल्यास निरनिराळ्या शास्त्रांच्या अंतर्घटनेची थोडिशी कल्पना यईल. स्पेन्सर म्हणतो कीं शास्त्रें

(१) ज्या निरनिराळ्या कल्पनांनी आपणांस जगांतील भाव गोचर होतात त्या निरनिराळ्या कल्पना शिकविणारीं असतात किवां,

(२) त्या भावांचीच माहिती करुन देणारीं असतात. आणि ती माहिती शास्त्रें

(अ) एक तर मूलतत्त्वांच्या रुपानें देतात किंवा

(आ) साकल्याच्या स्वरूपानें देतात.

पहिल्या वर्गांत गणित व तर्कशास्त्र उर्फ न्यायशास्त्र हीं स्पेन्सर घालतो. "एक" हा कांही भाव नाहीं. वस्तु एक या कल्पनेंत आपणांस गोचर झाली आहे. तसेंच, कार्यकारणसंबंध ही कांहीं वस्तु नाहीं. कार्यकारणसंबंध ही एक कल्पना आहे, आणि त्या कल्पनेच्या साहाय्यानें आपणांस वस्तूंचे गुणधर्म गोचर होतात म्हणून असल्या शास्त्रांस तो केवलभावात्मक (अबस्ट्रॅक्ट) शास्त्रें म्हणतों.

दुसर्‍या प्रकारच्या शास्त्रांमध्यें दोन प्रकार दिले आहेत. ते (अ) व (आ) या खालीं घातले आहेत. ज्या ज्ञानक्षेत्रांतील वस्तुंचें साकल्यानें ज्ञान करून घ्यावयाचें त्या ज्ञानक्षेत्रास केवलद्रव्यात्मक (काँक्रीट) शास्त्रें असें स्पेन्सर म्हणतो, आणि ज्या ज्ञानक्षेत्रांतील भावांचे अगर वस्तुंचे मूलतत्त्वाच्या रुपाने ज्ञान होतें त्यांस तो भाववस्त्वामक (अबस्ट्रॅक काँक्रीट) असें म्हणतो. केवळ वस्त्वात्मक शास्त्राचें उदाहरण म्हणजे "प्राणिशास्त्र" होय. येथें अखिल प्राणिवर्ग अभ्यासावयाचा आहे. येथें जें काहीं मूलतत्त्वस्वरुप शास्त्रीय लेखनास येतें त्याचें कारण एका नियमांत बर्‍याच गोष्टींचा समावेश करावयाचा हें होय. नियम दोन प्रकारचे आहेत. जेथें सृष्टींतील एकस्वरूपता गृहीत धरली असते ते खरे नियम होत. परंतु जेथे एक स्वरूपता गृहीत धरली नसून केवळ भाव अगर कार्ये हीं संकलित रीतीने सांगण्याकरितां सूत्ररूप लेखनाचा अवलंब केला जातो तेथें त्यासहि नियम म्हणण्याचा प्रघात आहे. परंतु या दोन प्रकारच्या नियमांत वस्तुत:  भिन्नता आहे ही गोष्ट स्पेन्सर पुढें आणूं पहातो. भाववस्त्वात्मक शास्त्रांत स्पेन्सर रसायनशास्त्र आणि पदार्थविज्ञान यांचा अंतर्भाव करतो.