प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
शास्त्रांचें भारतीय वर्गीकरण.— कल्पसूत्रांचे पुढें भाग पडले, आणि त्यांतूनच पुढें शुल्बसूत्र अथवा भूमिति निघाली. ही भूमिति देखील यज्ञार्थ अवतरली; कांकी भूमितीशिवाय यज्ञाची वेदी बांधतां येणार नाहीं. येणेप्रमाणें सर्व शास्त्रांचा उगम वेदांत दाखविण्याची प्रवृत्ति निघाली; ती आज शालिवाहनाच्या १९ व्या शतकापर्यंत चालू आहे. ज्ञानाचीं वर्गीकरणें करण्याचीं तत्त्वें अनेक असत हें आज उपलब्ध संस्कृत वाङ्मयांतील अनेक वर्गीकरणांवरून दिसतें. सोळा विद्या व चौसष्ट कला यांचा उल्लेख तर वारंवार येतो. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरूषार्थ आहेत, व यांपैकीं प्रत्येक पुरूषार्थाच्या साधनेस परिश्रम निरनिराळ्या प्रकारचा पाहिजे, असें समजून ग्रंथांचें वर्गीकरणहि पुरूषार्थाप्रमाणें होऊं लागलें. धर्मांचें प्रवचन मन्वादिकांनी केलें; अर्थाचें चाणक्यादीनीं केलें; कामाचें वात्स्यायनानें केले; आणि मोक्षाचें आम्ही करतों असा बाणा बाळगणारे मार्गदर्शकहि जागोजाग दिसून येतात. चाणक्याच्या अर्थशास्त्रांत चार विद्या स्थापन केल्या आहेत; त्या त्रयी, आन्विक्षिकी, वार्ता आणि दण्डनीति या होत. शास्त्रें किती आहेत, एक, कीं, तीन कीं चार याचा वादविवाद चाणक्याच्या अर्थशास्त्रांत दिसतो. आणि चाणक्य चारपेक्षां कमी शास्त्रें आहेत असें म्हणणार्या ग्रंथकारांची नांवें व मतें देतो आणि आपलें शास्त्रचतुष्ट्याचें मत स्थापित करतो. ज्ञानाचें या त्रयी इत्यादि चार शास्त्रांमध्ये वर्गीकरण जें झालें त्या चार शास्त्रांखाली अनेक प्रकारच्या वाङ्मयाचें वर्गीकरण चाणक्यानें केलें होतें. कांही ग्रंथकारांनी अनेक वर्गीकरणें भिन्न नसुन एकच आहेत असें म्हणून चार वर्ण व चार पूरूषार्थ यांची संगति चार विद्यांशीं जोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्रयी आणि आन्विक्षिकी हें ज्ञानक्षेत्र ब्राम्हणांचें, दण्डनीति हें ज्ञानक्षेत्र क्षत्रियांचे आणि वार्ता हें क्षेत्र वैश्यांचे; किंवा, त्रयी ही धर्मपुरूषार्थ साधक होय; आन्विक्षिकी म्हणजे जींत वेदांताचा समावेश होतो ती विद्या म्हणजे अर्थसाधक होय आणि वार्ता म्हणजे पैसे मिळविण्याचें ज्ञान हें कामपुरूषार्थाचें साधक होय; अशा तर्हेची विचारसरणी देखील कित्येक ग्रंथकारांमध्यें दिसून येते. प्रत्येक विषयाखाली कोणत्या तर्हेची माहिती येईल याविषयी थोडा मतभेदहि दिसतो. अन्विक्षिकी या शास्त्राच्या व्याख्या निरनिराळ्या केल्या आहेत. "चार" वेद म्हणजे वेदविद्येचें ऋत्विक्कर्मानुसार केलेलें ज्ञानवर्गीकरणच होय.