प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
शास्त्रघटनेंतील तंटे.- कोणत्याही शास्त्राचा उदय व वाढ होण्याची क्रिया साधारणरीत्या वर सांगितलेल्या रीतीनें होत असते. परंतु अशा रीतीने अस्तित्वांत आलेले सिद्धान्त फार क्वचितच मुकाट्यानें कबूल करण्यांत येतात. त्यांच्या वर जोरजोराचे हल्ले होत असतात व कधी तर या हल्ल्यांच्या पुढें ते सिद्धांत टिकावहि धरूं शकत नाहीत. असें होण्याची कारणें मुख्यत्वेंकरून पुढीलप्रमाणे देतां येतील.
नाममूलक.— प्रथमतः एखाद्या शास्त्राला दिलेल्या नावांस बरेंचसें महत्त्व प्राप्त होतें; व म्हणून त्या शास्त्राशीं संबद्ध अशा दुसर्या एखाद्या उपयुक्त विषयाचा अभ्यास करणारी कांहीं माणसें त्या शास्त्राचीच संज्ञा अधिक व्यापक करून तींत आपल्या आवडीच्या विषयाचा अंतर्भाव करण्यासाठी धडपड करितात.
साधनमूलक.— ज्ञानाचा शोध लावण्याकरितां एखादी नवीन पद्धति किंवा काही उपयुक्त साधन अस्तित्वांत येतें. जुन्या कल्पना नवीन पद्धतीच्या किंवा साधनाच्या कसास लावुन पाहण्याचा प्रयत्न करण्यांत येतो. या प्रयत्नामध्यें कधी कधी एखादें नवीन सत्य बाहेर पडतें. जुन्या कल्पनांतील चुका निदर्शनास येतात व त्याचा त्याग करणें प्राप्त होतें.
अशा रीतीनें अस्तित्वांत आलेल्या नवीन तत्त्वांपुढें मूळ शास्त्र अजीबात ढांसळतेंच असें नाही; त्यांच्या योगाने मूळ शास्त्रांत अधिक सुधारणा होते इतकेंच काय तें. परंतु कधीं कधीं जेव्हां जुन्या विचारपरंपरेतील अत्यंत महत्त्वाचा पण केवळ गृहीत धरलेला सिद्धांत चुकीचा असतो, म्हणजे ती सदोष उपपत्तीवर बसविलेली असते तेव्हां शास्त्रांत महत्त्वाची क्रांति होते.
व्यक्तिमूलक:- प्रत्येक शास्त्रांत काहींना कांही तरी मुद्दयावर मतभेद होऊन तज्ज्ञ लोकांमध्ये तट पडले असल्याची मौज पुष्कळ वेळां आपल्या दृष्टोत्पत्तीस येते. परंतु ही भिन्न मतें अस्तित्वांत येण्याचें कारण त्या शास्त्रीय ज्ञानांतच कांही वैशिष्ट्य असतें असें नव्हे, तर त्यांच्या मुळाशीं केवळ त्या शास्त्राच्या अभ्यासकांचे स्वभाववैचित्र्यच असतें. कारण आपलीं जुनीं मतें टाकून नवीन गोष्टीचा स्वीकार करण्यास बरेच लोक तयार नसतात. उलटपक्षी कांही माणसें अशी असतात कीं, एखादें मत नवीन निघालें म्हणजे केवळ त्यांतील नाविन्यामुळेंच त्यांचें मन त्या बाजुस झुकतें. कांही कांही गोष्टींमध्ये तर सत्याचा शोध लावणेंच अशक्यप्राय असल्यामुळें वैयक्तिक निवड व भावना यांना बराच अवसर सांपडतो.
सत्यदुर्लभतामूलक:- बर्याचशा प्रसंगी सत्य हें अज्ञातच राहतें. कांहीं प्रश्न असे असतात की, मानवी बुद्धीस त्यांचे पूर्णपणें आकलन करणें शक्य नसतें. सामाजिक प्रश्नासारख्या घोटाळ्याच्या प्रश्नांत पुष्कळदां एक कार्याच्या मुळाशी अनेक कारणें असलेलीं आढळून येतातं. अशा वेळीं तें कार्य कोणत्या विशिष्ट कारणामुळें घडून आलें हें ठरविणें सोपें नसतें; एवढेंच नव्हे तर शक्यहि नसतें. शिवाय अभ्यासकाच्या स्थानित परिस्थितींतच कधीं कधीं अशा प्रकारचे भेद असतात की, त्यामुळे या अनेक कारणांपैकी एखाद्या विशिष्ट कारणासच दुसर्यापेक्षां ज्यास्त महत्त्व भिन्न अभ्यासकांकडून दिलें जातें. याच्याच जोडीची आणखी एक अडचण म्हटली म्हणजे एखाद्या गोष्टीसंबधी सत्य अद्याप अज्ञात आहे ही गोष्ट सर्वांस संमत असते, तेव्हांहि तें सत्य ज्ञात कसें करून घेतां येईल याचा निर्णय करणें कांही अंशी आटोक्याबाहेरचें असतें.
सत्याचा निर्णय करण्यास वरीलप्रमाणे अडचणी असल्यामुळे साहजिकच मनुष्यास मताची निवड करण्यास जागा राहते. ज्या कारणांमुळे या निवडीच्या संधीचा लोक फायदा घेण्यास उद्युक्त होतात तीं अशी :—
कांहीं लोकांची पुराणप्रियता व कांहीची नाविन्याविषयीं आवड ही दोन्हीहि अशा प्रसंगी काम करीत असतात. तत्त्वज्ञांमध्ये देखील नेहमी राष्ट्राभिमानाची भावना कांहीं अंशी दृग्गोचर होत असते. आपण केवळ शास्त्रशुद्ध सत्याचेच निःपक्षपाती पुरस्कर्ते आहोंत असा आविर्भाव एकीकडे दाखवीत असतांहि पुष्कळ संशोधकांच्या व तत्त्वज्ञांच्या मनावर अमुक एक कल्पना आपल्या देशबांधवानें काढली आहे या विचाराचा बर्याच प्रमाणांत परिणाम होत असतो. तसेच कांहीं शास्त्रज्ञांच्या ठिकाणी आपल्याशिवाय इतर राष्ट्रांतील शास्त्रज्ञांनी काढलेल्या शास्त्रीय कल्पना, सिद्धांत, उपपत्ती इत्यादि सर्व गोष्टींविषयी एक प्रकारें मूळचाच दुराग्रह असतो. शिवाय आणखीहि एक गोष्ट अशी दिसते कीं, शास्त्रज्ञ नेहमीं ज्ञानाच्याच पाठीस लागून ग्रंथलेखन करीत असतात अशांतला भाग मुळींच नसतो. पुष्कळ वेळां त्यांची आपल्या स्वतःच्या पूर्वग्रहांचेंच समर्थन करण्याकरितां कांही तरी कारणें शोधण्याची धडपड चाललेली असते.