प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
जगाच्या इतिहासात एक महत्त्वाचा भाग म्हटला म्हणजे जगाच्या ज्ञानाचा इतिहास होय. ज्ञानकोशकारांस तर हें इतिहासाचें अंग अत्यंत महत्त्वाचें होय.
या इतिहासाची अपूर्णता.- जगाच्या ज्ञानाचा इतिहास देतांना ज्या एका उणीवीकडे लक्ष ओढलें पाहिजे ती उणीव ही कीं, कोणत्याहि काळाच्या ज्ञानकक्षेसंबंधानें विवेचन साहित्याच्या अभावीं रहाणार, कारण समाजांतील सर्वच ज्ञान ग्रंथीं व्यक्त होत नाहीं आणि जें ग्रंथी व्यक्त होत नाहीं त्याचें अस्तित्व कळणें कठीण होतें. समाजांत असें पुष्कळ ज्ञान असतें कीं, त्यांची समाजासच जाणीव नसते. समाजांत चालू असलेल्या सर्व प्रकारच्या व्यवहारांचें आज तरी वर्णन कोठें सांपडेल ? प्रत्येक व्यवहारांत प्रत्येकास जो अनुभव प्राप्त होतो तो कोठें लिहिला जातो ? प्राचीनांचे, उदाहरणार्थ इजिप्त-बाबिलोनियामधील लोकांचें ज्ञान कितपत असावें याविषयीं आज आपण जें लिहूं तें फारच सावधगिरीनें लिहिलें पाहिजे.