प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.

शास्त्र आणि तत्त्वज्ञान.- निरनिराळ्या भौतिक शास्त्रांचा अभ्यास करतांना त्या सर्वांस सामान्य असें कांही तत्त्वज्ञान लागु पडतें. "थिअरी ऑफ एव्होल्युशन" उर्फ "विकासवाद"  म्हणून स्पेन्सरनें ज्या मताचा आपल्या "सिंथेटिक फिलासफी" मध्यें अनुवाद केला आहे त्यास "फिलासफी" म्हणण्याचा प्रघात आहे. स्पेन्सरने "फिलासफी" या शब्दाची अशी व्याख्या केली आहे कीं, "फिलासफी" म्हणजे शास्त्रांचें शास्त्र. 'फिलासफी' या शब्दाला जे अनेक अर्थ निर्माण झाले आहेत त्यांतील इतर अर्थ वजा करून स्पेन्सरच्याच अर्थात प्राधान्य द्यावयाचें अशी पुष्कळ शास्त्रज्ञांची प्रवृत्ति आहे. तर, या 'फिलासफी' चा म्हणजे शास्त्रांच्या शास्त्राचा विशिष्ट शास्त्रघटनेचीं संबध काय तें पाहूं.

जगांत ज्या मोठमोठ्या घडामोडी होतात त्या घडामोडींनीं इतर लहान घडामोडींचा सर्व आयुष्यक्रम ठरविला जातो. तर प्रत्येक लहानशा अभ्यासक्षेत्रामध्यें जे अनेक भाव आढळतात त्यांचा कार्यकारणसंबंध लावावयाचा हें जरी कार्य असलें तरी त्या सर्वांवर परिणाम घडविणार्‍या ज्या गोष्टी आहेत तिकडे शास्त्रज्ञाने लक्ष दिलेंच पाहिजे, म्हणजे एकंदर जगांतील सर्व प्रकारच्या विवर्तांची माहिती जितकी शास्त्रज्ञांस असेल तितकें त्यांचे संशोधन व शास्त्ररचना हीं शुद्ध रहातील. यासाठी शास्त्रज्ञास फिलासफीची म्हणजे शास्त्रांच्या शास्त्राची अवश्यकता आहे.