प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.   

शब्दांच्या अर्थाच्या पृथक्करणाची पद्धति:-  प्रत्येक भाषेस इतिहास असतो. एकच शब्द अनेक अर्थींनी निरनिराळे लोक वापरतात. असें झालें म्हणजे जे भिन्न भिन्न अर्थ असतील त्यांतील कोणता अर्थ आपणांस प्रथम घ्यावयाचा याचा विचार करणें ही पहिली पायरी होय. उदाहरणार्थ "टर्म" हा इंग्रजी शब्द घ्या;  "टर्म" या शब्दाचा कायद्यांत अर्थ निराळा आहे; कॉलेजांत जाणार्‍यांच्या दृष्टीनें अर्थ निराळा आहे; शास्त्रज्ञांच्या दृष्टीनें अर्थ निराळा व इंग्रजी तर्कंशास्त्राच्या दृष्टीने निराळा अर्थ आहे. तर असे निरनिराळे अर्थं ज्या वेळेस दृष्टीस पडतील त्या वेळेस कोणत्या अर्थाशी आपणांस प्रयोजन आहे हें प्रथम ठरवावें. मुळांत अनेकार्थी शब्द आहे म्हणून मराठीतहि अनेकार्थीच शब्द वापरला पाहिजे असें नाहीं; व शब्दाचे अनेकार्थ ज्यांत व्यक्त होतील असा एक शब्द टांकसाळींतून पाडण्याचेंहि कारण नाहीं. "अस्माकूनां नैय्यायिकानां अर्थरि तात्पर्यम् न तु शब्दरि" हाच जुना नियम भाषांतरकारांसहि लागू आहे.