प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
 
व्यापक क्षेत्रांकडे लक्ष.– ज्ञानाचा इतिहास लिहितांना लेखकाकडून एक क्रिया होत असते. जें ज्ञान अधिक महत्त्वाच्या गोष्टीसंबंधाने असेल तिकडे अधिक लक्ष जातें, आणि जें विधान केवळ एकाकी विशिष्ट गोष्टीसंबंधाने नसुन नियमरूपाचें असेल त्याला अधिक महत्त्व दिलें जातें. तसेंच एखादा नियम जितका अधिक व्यापक असेल तितकें त्यास महत्व अधिक दिलें जाते; यामुळें व्यापक नियमरूपी आणि विश्वांतील अतिशय महत्त्वाच्या गोष्टींविषयी जें ज्ञान उपलब्ध झालें असेल तेंच विज्ञानेतिहासाचा महत्त्वाचा विवेचनविषय होतें. पुष्कळ प्रसंगी अधिक गूढ गोष्टीवर मनुष्य आपल्या कल्पनाच लिहित बसतो त्यामुळें बरेंचसें वाङ्‌मय उत्पन्न होतें. जगाचे वास्तविक ज्ञान जेव्हां फारच अत्यल्प होतें त्या काळापासुन सर्व विश्वासंबंधी सिद्धांत सांगणारे निघाले आहेत. आणि त्या प्रकारच्या लेखकांनी प्रत्येक देशांत शास्त्रीय विचाराला गति देण्यापेक्षां वारंवार व्यत्ययच केला आहे.

जगांत चालू असलेल्या घडामोडी व भौतिक विषय यांचे अवगमन व वर्णन करण्याची व त्यांत कांही नियम मांडण्याची खटपट पूर्वीपासून चालू आहे. या प्रकारचे नियम शोधून ते व्यापक नियमाच्या कक्षेंत मांडण्याचा प्रयत्‍न होत आहे. जगांतील कांहीं सामान्य क्रिया जर भौतिक नियमांनीं स्पष्ट करतां येतात तर सर्व विश्वोत्पत्ति देखील त्याच प्रकारच्या नियमांनी कां स्पष्ट करतां येऊं नये ?  सर्व शास्त्रीय प्रश्नांत कठिण प्रश्न जो जगाची उत्पत्ति तिकडेच प्रत्येक काळच्या तत्त्ववेत्यांचे अधिकाधिक लक्ष जाऊं लागले, आणि जगदुत्पत्तिविषयक सिद्धांतांशीं सृष्टींतील फेरफारांचे नियम जोडण्याचा प्रयत्‍न होऊं लागला. हा प्रयत्‍न जे लोक होऊन गेले ते मोठे तत्त्ववेत्ते होत असेहिं लोक मानूं लागले. आपल्याकडील दर्शनें, आणि यूरोपांतील "फिलासफी" नांवानें ओळखल्या जाणार्‍या विचारपद्धती या दोन्ही प्रकारच्या पद्धती भौतिक सृष्टीच्या घडामोडीचे सिद्धांत आणि अखिल विश्वाची उत्पत्ति ही दोन्ही मिळून होणारा व्यापक ज्ञानविषय हा आपला आहे, असें समजूं लागल्या.

शास्त्र आणि "फिलासफी" हा भेद अलीकडे युरोपांत केला जातो. या दोहोंचा संबंध काय याविषयीं वादविवाद वारंवार होतात. कित्येक फिलासफी हें देखील शास्त्र समजतात.

या दोहोंमधला भेद दिवसानुदिवस कमी होत जाण्याचें कारण समजण्यास ज्ञानक्षेत्राच्या संवर्धनांत ज्या दोन तीन क्रिया झालेल्या आहेत त्या जाणल्या पाहिजेत. त्या क्रिया येणेंप्रमाणे :  थोड्याशा प्रत्यक्षसंकलनानें नियम काढणें, आणि नियमावरून दुसरे नियम काढणें, व याच पद्धतीच्या विस्तारानें अत्यंत व्यापक नियम काढणें ही एक क्रिया. दुसरी क्रिया म्हटली म्हणजे, जितकें निश्चितपणें ठाऊक असेल तेवढेंच मान्य करणें आणि व्यापक नियम काढण्यास भिणें. या दोन क्रिया होत असतां, म्हणजे निश्चित ज्ञानकणांचा समुच्चय होऊं लागला असतां उत्पन्न होणारी तिसरी क्रिया म्हटली म्हणजे पूर्वागत व्यापक विचार तपासणें. यांतील पहिल्या क्रियेनें जो माल तयार होई त्याला शास्त्र म्हणत. तिसरी क्रिया जशी वृद्धिंगत होऊं लागली तशी फिलासफी ही शास्त्राच्या सदरांत येऊं लागली.