प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.           

विज्ञानेतिहाससग्रंथांची चिरकालता:- शास्त्रीय वाङ्मयाच्याहि कित्येक शाखा अशा आहेत की, तच्छाखीय ग्रंथ कालरूपी मृत्त्यूच्या जबडयांतून वांचून कायमचे जिवंत राहूं शकतात. उदाहरणार्थ, शास्त्रीय ज्ञानाचे इतिहास हे ग्रंथ सामान्य राजकीय इतिहास या ग्रंथाहून निराळ्या स्वरूपाचे असतात. म्हणजे, ह्मूएलचा “ हिस्ट्री ऑफ दी इंडक्टिव्ह सायन्सेस, ” कूव्हिएचा तत्कालीन शास्त्रीयप्रगतीचा इतिहास, ड्रेपरचा “हिस्ट्री ऑफ दी  कान्फ्लिक्ट बिटंवीन रिलिजन अँड सायन्स “  व व्हाइटचा याच युवरील त्यानंतरचा ग्रंथ, इत्यादि ग्रंथ आणि अँरॅगो, हक्सले व टिंडाल यांसारख्या लेखकांचे अनेक इतिहासात्मक निबंध या सर्वांची वाङ्मयांतील योग्यता गिबन किंवा मॉमसेन यांच्या ग्रंथाची योग्यता ठरविण्याच्या दृष्टीनें मापली पाहिजे, शिवाय शास्त्रीय वाङ्मयाची आणखी एक अगदी निराळी शाखा असून या शाखेंतले ग्रंथहि फार महत्त्वाचे असतात, हे ग्रंथ म्हणजे सृष्टिविज्ञान (नॅचरल हिस्ट्री) व तत्संबंधी इतर विषय, या विषयांवरील होत. अशा ग्रंथांत ग्रंथलेखकांनीं सृष्ट वस्तूंचे स्वत: निरीक्षण करून वर्णन दिलेलें असल्यामुळे त्या माहितीच्या बिनचूकपणाबद्दल फारशी शंका घेण्यांचे कारण नसतें. अशा ग्रंथापैकी ऐझॅक वॉल्डनचा ‘ कंप्लीट अँग्लर ’ हा ग्रंथ, गिलबर्ट व्हाइटचा पक्षी, प्राणी व सर्प यांची माहिती देणारा “ नॅचरल हिस्ट्री ऑफ सेलबोर्न ” हा ग्रंथ, इमर्सनची मित्र थोरो याची पुस्तकें, जॉनमूरचे निबंध वगैरे प्रसिद्ध होत. हे सर्व फारच सुंदर लेखक, फार काय, प्रत्यक्ष गद्यकाव्यलेखक असून त्यांनी सृष्टिनिरीक्षण स्वत: करून वर्णनें दिलेलीं असल्यामुळें काव्यनाटकादि ग्रंथांप्रमाणें हे ग्रंथ चिरकाल आनंददायकच राहतील; कारण ते वनांतील सृष्टिसौदर्य मनश्चक्षूपुढें हुबेहुब उभें करतात. बूफॉचा निसर्गेतिहासावरील ग्रंथ व विल्सन व ऑडयुबॉन यांचे “ऑर्निथालाजीज” हे ग्रंथहि वरच्याप्रमाणेंच चित्तवेधक असून शास्त्रीय संशोधनाला मूलभूत माहिती पुरविणारे या नात्यानें त्यांची उपयुक्ता कमी झाल्यानंतरहि ते पुष्कळ काळ लोकप्रिय राहतील यांत शंका नाही.

अशा ग्रंथानां एक प्रकारचें चिरकालिक महत्त्व आहे, व तें त्यांतील लेखनपद्धतीमुळें आहे. तथापि उच्च प्रतीच्या वाङ्मयांत पहिल्या नंबरचा दर्जा या ग्रंथांनां केव्हांहि मिळणें शक्य नाहीं. खोल, गहन मनोविकार उद्दीपित करण्यांचे सामर्थ्य त्यांच्यामध्यें असणें शक्य नाही. जगांतील थोर दर्जाचें वाङ्मय निर्माण करण्याच्या कामी शास्त्रीय ज्ञानाची मदत होते ती या ग्रंथांनी नव्हे. फार काय पण ही मदत प्रत्यक्ष अशी होतच नसते; तर शास्त्रीय ज्ञानाची उत्कृष्ट वाङ्मय निर्माण करण्याच्या कामी होणारी मदत सर्व अप्रत्यक्ष स्वरूपाची असते.

जगांत वाङ्मय निर्माण होऊं लागलें तेव्हांपासून पाहिलें तरी असें आढळून येतें कीं, उत्कंठेनें लेखनपटू लोक आपआपल्या काळांतील सर्व शास्त्रीय ज्ञान अवगत करून घेऊन त्याचा उत्कृष्ट ग्रंथ लिहितांना उपयोग करीत असतात. शेक्सपियरचीच गोष्ट घ्या. शेक्सपियरकृत नाटकांच्या प्रत्येक वाचकाला हें माहीत आहे कीं, त्याच्या नाटकांत जागोजाग शास्त्रीय सत्यांचा निर्देश केलेला आढळतो, फार काय, पण शेक्सपियर व बेकन या दोन निरनिराळ्या व्यक्ती नसून एकच व्यक्ति होती असाहि वाद मध्यंतरी उत्पन्न करण्यांत आलेला होता. त्यावरुन काय सूचित होतें ? या बाबतींत आणखी उदाहरणें देत न बसतां आपणांस असें विनदिक्कत म्हणतां येईल कीं, जितका ललितवाङ्मयांत ग्रंथकार अधिक थोर योग्यतेचा तितका त्याच्या काळांतील शास्त्रीय ज्ञानाशी त्याचा परिचय अधिक असावयाचा. परंतु याचा अर्थ असा मात्र नाही की, चांगलें वाङ्मय निर्माण करणाराला शास्त्रीय ज्ञान अवश्य असलेंच पाहिजे; कारण जे उत्कृष्ट लेखक असतात ते प्रत्येक प्रकारचें मानसिक अन्न ज्ञान अत्यंत उत्कंठेनें ग्रहण करीत असतात. तथापि कोणत्याहि लेखकाला त्यांचे शास्त्रीय ज्ञान जितकें अधिक असेल तितकी उत्कृष्ट ललितग्रंथ निर्माण करण्याच्या कामी अधिक मदत होते, याबद्दल शंका नाही. कित्येक वेळां कांही मोठाल्या ग्रंथकारांनी ही गोष्ट स्वत: च कृतज्ञतापूर्वक कबूल केलेली आहे. उदाहरणार्थ, कोलिरिज उपमारूपकांदि अलंकारांचा सांठा वाढावा म्हणून डेव्ही नामक शास्त्रज्ञाची रसायनशास्त्रविषयक व्याख्यानें ऐकण्यास मुद्दाम जात असे, असें त्यानें स्वत:च  उघड बोलून दाखविलेलें आहे. इमर्सनला सुद्धां असल्या प्रकारच्या मदतीची जाणीव असलीच पाहिजे. त्याचे ग्रंथहि त्याच्या पिढीतील शास्त्रीय ज्ञानाच्या उल्लेखांनी जागोजाग भरले आहेत. टेन नामक लेखकानेंहि स्वत: अशी गोष्ट नमूद करुन ठेविलेली आहे कीं, त्यानें स्वत: चा लेखनव्यवसाय कांही काळ बाजूला ठेवून वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्यांत कित्येक वर्षे घालविलीं. कारण प्रत्येक लेखकाला निदान एका शास्त्रशाखेचें तरी चांगले ज्ञान असणें अवश्य आहे व अज्ञान रसहानिकारक आहे, असें त्याचें मत होतें.

तथापि, उपर्युक्त लेखकांनी व शास्त्रीय ज्ञानाकडे कल असलेल्या अशाच प्रकारच्या बर्‍याचशा लेखकांनी आपल्या ग्रंथांत केलेला स्वत:च्या शास्त्रीय ज्ञानाचा उपयोग कमी प्रतीचाच होय. यापेक्षांहि अधिक महत्त्वाची शास्त्रीय ज्ञानाचा उपयोग काव्यग्रंथांत होय. असा उपयोग किरकोळ लहानसान काव्यांतूनच नव्हे तर जगांतील श्रेष्ठ म्हणून नांवाजलेल्या महाकाव्यांतहि आढळतो. उदाहरणार्थ, १४ व्या शतकामध्यें टॉलेमीच्या ज्योतिषशास्त्राविषयक सिद्धांतांच्या आधारावर रचलेलें शास्त्रीय ज्ञान डांटे कवीला पूर्णपणें माहीत होते; आणि त्या जगविख्यात कवीनें “ दैवी नाटक ” आपल्या महाकाव्यांतील संविधानकाला त्याच माहितीचा आधार घेतलेला आहे. पण टॉलेमीचे ज्योतिषशास्त्रविषयक सिन्त चुकीचे असल्याचें त्यानंतर लवकरच ठरलें, पुढें १६ व्या शतकांतले शास्त्रीय ज्ञान मिल्टन या महाकवीला माहीत होतें, आणि त्यानें आपल्या “ पॅराडाईज लॅस्ट ”  या महाकाव्यांतील संविधानकाची उभारणी त्या शास्त्रीय माहितीवर केलेली आहे. पण मिल्टननें हेच आपलें काव्य हटन, लामार्क, कूव्हिए, लायल व डार्विन यांनी विश्वोत्पत्तीसंबंधाची आपली शास्त्रीय मतें व सिद्धांत पुढें मांडल्यानंतर रचलें असतें, तर त्यामधील कित्येक सर्गांचें स्वरूप किती आमूलाग्र बदललें असतें हें लक्षांत घेतल्यास शास्त्रीय ज्ञानाचा काव्यरचनेवर किती मोठा परिणाम होत असतो हें स्पष्ट दिसून येईल. मिल्टनला १६ व्या शतकांत उपलब्ध असलेलें सर्व शास्त्रीय ज्ञान अवगत होतें. पण विश्वोत्पत्तीसंबंधाचें त्या काळांतलें ज्ञानच अगदीं अल्प व चुकीचें होतें, साध्य ज्ञानेंद्रियांच्या आटोक्याबाहेर असलेलें, केवळ सूक्ष्मदर्शक यंत्रें सूक्ष्मदर्शक यंत्रें व दुर्बिणी अशा यांत्रिक साधनांनी उपलब्ध होणारें विश्वातील अनेक सूर्य मंडलांचें व परमाणूंचे शास्त्रीय ज्ञान: तसेच विश्वाची उत्पत्ति, सचेतन जीवांची उतपत्ति, खुद्द मनुष्य प्राण्याची उत्पत्ति व मनुष्याच्या बौद्धिक व्यापारांचा आधारस्तंभ जो मेंदू यांचे ज्ञान; तसेंच मानवजातीच्या चालीरीती, मनोविकार, भोळ्या समजुती, धार्मिक कल्पना यांचे चिकित्सात्मक ज्ञान; या सर्व गोष्टीचें शास्त्रीय ज्ञान १९ व्या शतकांत अगदीं अखेरीस उपलब्ध झालेलें आहें. हें अगदी अलीकडील शास्त्रीय ज्ञान माहीत करून घेतलेला असा एखादा भावी मिल्टन नर्वेच महाकाव्य निर्माण करून त्यांत सेंद्रिय जीवांचा विकासवादानुसार पृथ्वीच्या पाठीवर कसा अवतार होत गेला यांचे उत्तम शब्दचित्र रंगवील. परंतु अशा प्रकारची काव्यरूपी चित्रें रंगवण्यास साधनसामुग्री पुरविण्याचें काम शास्त्रीय ज्ञानच करीत असतें हें लक्षांत घेतलें पाहिजे. असो.