प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
विचारपद्धतींचें अनवश्यक भिन्नत्व.— अनेक तत्त्वज्ञानपद्धतींचे अंतिम एकच आहे. तें अंतिम म्हणजे निर्दोष अनुमानांच्या साहाय्यानें ज्ञानसाधन करणें. तें साध्य करुं इच्छिणार्यांस असें वाटतें की, परस्परांहुन भिन्न परंतु ज्यांची भिन्नता केवळ संज्ञामूलकच आहे अशा पद्धतीचें प्राचुर्य फारसें हितावह नाही. सामाजिक विषयावर लिहितांना शब्दांनां अर्थ लावून सुरूवात करण्यापेक्षां समाजांतील भावांचे पृथक्करण करून जे अंतिम घटक असतील त्यांस जितक्या अर्थद्वयाची अशक्यता असलेल्या संज्ञा देतां येतील तितकें बरें. नाहीं तर नेहमी एका विशिष्ट प्रकारच्या वितंडवादास स्थान रहातेंच. तो वितंडवाद म्हटला म्हणजे एकानें दुसर्याची व्याख्या नाकबूल करावी आणि त्या व्याख्येनें दर्शविल्या जाणार्या विषयांचें क्षेत्र, हें देखील निराळें आहे म्हणुन सांगावे. आणि पूर्वीच्या व्याख्येप्रमाणें निरनिराळ्या विषयांचे जे संबंध आहेत, ते सर्व चुकीचे म्हणुन सांगूं लागावें या प्रकारचें पांडित्य फार झालें आहे. उदाहरणार्थ बुद्धि हा शब्द घ्या. याचा अर्थ आपण साधारणपणें ज्ञान मिळविण्याची शक्ति उर्फ यंत्र असा करतो; आणि अनुभवानें किंवा अनुमानानें जें आपण मिळवितों तें ज्ञान असें म्हणतों. अमुक मनुष्याचें ज्ञान चांगलें आहे म्हणजे त्यानें बुद्धीनें जें पैदा केलें आहे तें त्याच्यापाशीं चांगलें जमलें आहे असें समजतों. दुसरा एखादा तार्किक पुढे येऊन काय म्हणेल कीं, छे, छे ! बुद्धि ही ज्ञानाच्या वरची पायरी होय, आणि चराचराचें एकत्व यांचे मनुष्यास ज्ञान झाल्यानंतर त्याच्या मनाची जी स्थिति होईल तिला बुद्धि म्हणावें. तुम्ही ज्याला बुद्धि म्हणतां ती बुद्धीच नव्हे. बौद्धांनीं व विशेषेंकरून जैनांनी ज्या विचारपद्धती निर्माण करुन ठेवल्या आहेत त्या याच प्रकारच्या आहेत; आणि त्या पद्धतींतील कृत्रिम अवजडपणा व व्यर्थ शब्दच्छल यांबद्दल त्या विचारपद्धतींस काळाकडून कडक शासन मिळालें आहे, आणि तें कडक शासन म्हणजे त्यांचा बाष्कलाच्या शाखेप्रमाणें जवळ जवळ लोप होय.