प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
 
विज्ञानेतिहास लिहिण्याची पद्धति.- ज्ञान निरनिराळ्या राष्ट्रांत उत्पन्न होतें. त्याची प्रगति कांही ठिकाणीं अधिक जोराची तर कांही ठिकाणीं मंद; ज्या विषयासंबंधाने ज्ञान उत्पन्न होतें ते विषय निरनिराळ्या ठिकाणीं निरनिराळे; अशा प्रकारची स्थिति असतां जगाच्या ज्ञानेतिहासाचे भाग तरी कसे पाडावयाचे ?  ते भाषेप्रमाणे पाडतां येतील. ज्या वस्तू ज्ञानविषय आहेत त्या वस्तूंप्रमाणे  पाडतां येतील. प्रत्येक ठिकाणी ज्ञानप्राप्‍तीचें साहित्य आहेच. आणि निरनिराळ्या राष्ट्रांचा परस्पर संबंध असल्यामुळे एकमेकांशीं ज्ञानाची देवघेवहि आहेच. यामुळें हा इतिहास लिहितांना बरीच गुंतागुंत होणार या गुंतागुंतीशिवाय इतिहासलेखनाचें काम कठीण करणारी आणखी एक गोष्ट म्हटली म्हणजे विषयाची व्यापकता होय. या व्यापकतेमुळें आपलें कांहीं गोष्टींकडे दुर्लक्ष होणारच. आणि वैयक्तिक आवडीनिवडीचा प्रसंग येणार. हा इतिहास लिहितांना आपण कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावयाचें हा आणखी मोठा महत्त्वाचा प्रश्न आहेच. खालील गोष्टींस अधिक महत्त्व द्यावयाचें आम्हीं योजिलें आहे.

(१) प्राथमिक ज्ञानाची निरनिराळ्या राष्ट्रांत उत्पत्ति.

(२) व्यापक विचाराचा आणि त्यांतल्या त्यांत विश्वोत्पत्तिविषयक विचाराचा विकास.

(३) ज्ञान मोठ्या प्रमाणांत एका राष्ट्राकडून दुसर्‍या राष्ट्राकडे गेलें असल्यास त्या कालाचें वर्णन म्हणजे कोणत्याहि संस्कृतीचें अतिस्थलत्व.

(४) ज्ञानविकासास कारण झालेल्या मोठ्या गोष्टी व क्रांतिस्वरूपी शोध.

(५) चालू जगाचें ज्ञानक्षेत्र व ज्ञानविरोधक भावांचे चित्र.

(६) राष्ट्रांचें ज्ञानैक्य, आणि ज्ञानरचनेची एकसूत्रत्वाकडे प्रगति.

विज्ञानेतिहास हा मनुष्येतिहासाचा एक भाग आहे आणि मनुष्यप्राण्याच्या निरनिराळ्या ठिकाणीं व निरनिराळ्या काळी होणार्‍या बौद्धिक चळवळी हा त्यांचा विषय होय, या दृष्टीनें वरील मुद्दे महत्त्वाचे आहेत. केवळ विशिष्ट ज्ञानसंचयाच्या विकासाचें स्पष्टीकरण करण्याच्या दृष्टीनें हे महत्त्वाचे नाहीत. जगांतील सर्व ज्ञान हें एक समुच्चय होय किंवा विशिष्ट ज्ञानांग अथवा शास्त्र हें देखील एक समुच्चय होय असें धरून त्याचा इतिहास लिहावयाचा मनांत आणल्यास, म्हणजे कोणा राष्ट्राचें ज्ञान कितपत होतें इत्यादि विचार मनांत न आणतां केवळ विशिष्ट ज्ञान कसें वाढलें याचा इतिहास लिहावयाचा झाला तर तो जरा निराळ्या तर्‍हेनें लिहावा लागेल. ज्ञानविकासाच्या पायर्‍या नियमित पण परिचित परिकरांत शोधाव्या लागतील. प्राचीन राष्ट्रांच्या ज्ञानविकासाच्या निरनिराळ्या पायर्‍या आपणांस उपलब्ध नाहीत. ज्ञानक्षेत्रांत संचार करणार्‍या आणि विजय मिळविणार्‍या प्राचीन व्यक्तींचे इतिहास अगदींच अपरिचित आहेत. त्यामुळें वैज्ञानिक इतिहासांत ज्ञानवृद्धीचे किंवा शास्त्रवृद्धीचे नियम शोधावयाचे झाले तर अर्वाचीन यूरोपाच्या ज्ञानसंचयाकडेसच लक्ष दिलें पाहिजे.

शास्त्रीय ज्ञानाचा इतिहास अवगत करून घेतांना शास्त्रविकास कसा होतो, शास्त्र आणि शब्दजाल याचें पृथक्करण कसें केले पाहिजे, इत्यादि गोष्टींविषयी स्थूल कल्पना असल्यास इतिहासावगम सोपा होईल. म्हणून त्याहि आम्हांस प्रारंभी दिल्या पाहिजेत.