प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
प्रागैतिहासिककालीन शास्त्राचा इतिहास:- हा जो विचार आतांपर्यत व्यक्त केला हा केवळ पशूंच्या आणि अत्यंत रानटी मनुष्यांच्या निरीक्षणावरून तयार झालेला आहे. त्याच्या पुढील इतिहास जमवावयाचा तो सामान्य वाङ्मयांतून काढावा लागेल आणि अनेक वास्तुरूप अवशेषांवरून काढावा लागेल.
यानंतर प्रत्येक संस्कृतीत शास्त्रीय ग्रंथ तयार झाले आहेत. काही संस्कृती मरून गेल्या आणि कांही आजतागायत चालू आहेत. आज सर्व जगभर जी एक संस्कृति तयार होत आहे तिचा पाया यूरोपीय शास्त्रज्ञान होय आणि त्या ज्ञानाचा पाया अरबी व भारतीय ज्ञान होय. येणेंप्रमाणें देवघेवीचें चक्र एकसारखें चालू आहे. शास्त्रीय वाङ्मयाचा इतिहास द्यावयाचा म्हणजे सर्वच शास्त्रांची यथासांग माहिती द्यावयाची. ती यथाक्रम पुढें येईलच. येथें वाङ्मय आणि शास्त्र यांच्या संबंधाविषयी एकच प्रश्न विवेचनास घेतों.