प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
जुन्या विचारांतील अनवश्य भागांचे दुरीकरण आणि वैज्ञानिक रचनेचीं तत्त्वे:- आधुनिक यूरोपीय लोकांचा शास्त्रीय विचार हा ग्राह्य नाही असें कोणी म्हणणार नाहीं. तथापि युरोपांत निरनिराळ्या काळांत उत्पन्न झालेल्या विचारव्यंजनांची दर्शनें येथें शिकविण्याचा अट्टाहास कशाला ? यूरोपीय लोकांचे आधुनिक विचारहि सदोष नाहीत असें नाही. जुन्याशीं मिळतें करून घेण्याची तारंबळ व शब्दांचे स्वतःच्या भावमूलक इच्छेप्रमाणें केलेले अर्थ यांच्या स्पर्शामुळें कांट, व जुन्या विचारांचा द्वेष्टा कोंट यांच्या सारख्यांचे विचार दूषित झाले आहेत. आणि यामुळें यूरोपांत सध्यांचा येणारा विचारोघ केवळ शास्त्रीयज्ञानमूलक आहे, किंवा दुसर्या कोणत्या तरी भक्तिमूलक मोहाने दूषित झाला आहे याचे निर्दयपणें पृथक्करण करून आपणांस भावी वैज्ञानिक रचनेची तत्त्वें तयार केलीं पाहिजेत.
वरील वर्ज्यावर्ज्यविवेकाचीं तत्त्वें येणेंप्रमाणे :-
१. जो विचार केवळ निरनिराऴ्या भौतिक शास्त्रांच्या मूलस्वरूपासारखा आहे तो विचार वजा केला पाहिजे.
२. त्याप्रमाणें भौतिकशास्त्रविषयांच्या जुन्या कल्पनांवर जो तात्त्वित विचार रचला गेला आहे, तोहि वगळला पाहिजे. म्हणजे ज्या शास्त्रामध्ये जग पंचमहाभूतात्मक धरुन, किंवा द्रव्यविषयक जुन्या कल्पना धरुन त्यावर सिद्धांत रचले गेले असतील त्या शास्त्रांचे सिद्धांत गटारांत टाकून दिले पाहिजेत.
३. जो कल्पनाभेद केवळ शब्दमूलक आहे, किंवा भावनेच्या विशिष्ट स्वरूपामुळें जो वादविवाद उत्पन्न झाला आहे तोहि अजिबात वजा केला पाहिजे.
या तर्हेने जुन्या विचारांचे पृथक्करण थोडें बहुत येथेंच देण्याचा आमचा विचार आहे. आणि परंपरागत आलेल्या युरोपांतील विचारसमुच्चयाचा कोणता भाग भावी अभ्यासकांनी खुशाल माळ्यावर टाकून, आपण मोकळ्या बुद्धीनें विचारास लागलें पाहिजे हें शोधण्याचा येथें थोडासा उपक्रम केला आहे. सध्यांचे तत्त्ववेत्ते जरी घेतले, तरी प्राचीनांच्या आदरामुळें त्यांच्या लेखनांत मूर्खपणा कोठें कोठे येतो, याचें सामान्य स्वरूप मात्र येथें निदर्शित केले जाईल. 'फिलॉसफी' या नांवाखाली येणारें जुन्या पांडित्याचे भूत पूर्णपणें गाडून टाकणें ही गोष्ट आपल्या भावी वैज्ञानिक उत्कर्षास अत्यंत अवश्य असल्यामुळे हें काम जितक्या निर्दयतेनें व्हावयास पाहिजे तितक्या निर्दयतेनें आमच्या हातून झालें नाही. तरी आपल्या देशांतील भावी पंडितवर्ग तेंच काम अधिक मोकळ्या मनानें आणि निर्भय बुद्धीनें करील असा भावी प्रगतीची सुखकर स्वप्ने पहाणार्या ज्ञानकोशकारांस पूर्ण भरंवसा आहे.
जितका निर्दयपणा पाश्चात्त्य विचार तपासतांना ठेविला पाहिजे, त्याहूनहि अधिक निर्दयपणा आपल्या वाडवडिलांचेच विचार तपासतांना ठेविला पाहिजे. परक्याचें खूळ लवकर दिसतें, व खुळास खुळ म्हणण्यास दिक्कत वाटत नाही. परंतु आपल्या बापजाद्यांचे खुळ जरी त्याहूनहि मोठें असलें, तरी त्यास खुळ म्हणण्यास संकटच वाटतें; आणि यासाठी आपले पैतृक विचार तपासतांना आपण जास्तच जागरूक राहिलें पाहिजे. शिवाय हेंहि लक्षांत ठेविलें पाहिजे की, आपण पैतृक भाषाच बोलत असल्यामुळें भाषामूलक विचारदोष आपल्या डोक्यांत चटकन उतरणार नाहीत. शब्दांवरून वस्तुज्ञान करून घेण्याची अशास्त्रीय संवय आपणांस पैतृक विचार तपासतांना अधिक भोंवेल, याची जाणीव आपण ठेविलीच पाहिजे.
पाश्चात्यांची खुळें तपासुन आपणांस तीं काढून टाकावयाची, आणि ज्ञानाभास ज्ञानापासून खुला करावयाचा. या क्रिया करण्यासाठी आपणांस प्रथम दोन क्रिया कराव्या लागतील. एक क्रिया म्हटली म्हणजे "तत्त्वज्ञानें" उर्फ "फिलॉसफी" या नांवाखाली विकल्या जाणार्या पद्धतीचें भावी पिढीस ग्राह्याग्राह्यतेच्या दृष्टीनें परीक्षण, आणि दुसरी गोष्ट म्हटली म्हणजे ज्ञानाची शब्दजालापासून सोडवणूक. ही सोडवणूक करण्यासाठी म्हणजे शब्द आणि कल्पना यांतील संबंधातींल अनिश्चितपणा काढून टाकण्यासाठीं भाषांतर करण्याची तत्त्वें बोधिलीं पाहिजेत. ज्ञानकोश तयार करतांना लेखकांपुढे जें सूचनापत्र ठेवलें होतें तेंच येंथें मांडलें असतां शब्दजालापासून ज्ञान सोडविण्याची क्रिया कशी केली पाहिजे याची कल्पना येईल. यासाठी तीं तत्वें येथें देतों 'फिलॉसफी' या नावांखाली खपणार्या विचारपद्धतींचा परामर्श पुढे घेण्यांत येईल.