प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
ज्ञान लेखस्वरूप केव्हां पावतें - समाजांत असणार्या ज्ञानापैकीं कांही थोड्या अंशाचाच अंतर्भाव ग्रंथांत होतो. तथापि अलीकडचीं कांही वर्षे मात्र प्रगमनशील समाजांत अशी स्थिति उत्पन्न झाली आहे कीं, समाजांतील ज्ञानाचा बराच मोठा अंश लेखरूपानें व्यक्त होत आहे. तथापि ती स्थिति हिंदुस्थानांत आली आहे असें अजुन म्हणतां येणार नाही. समाजांतील अनेक व्यवहारांवर आपल्याकडे वाङ्मयच नाही.
ज्ञानाचा इतिहास देतांना अज्ञानाचा इतिहास देणें हेच पुष्कळदां मोठे काम होऊन बसते. अनेक गोष्टींचे खरें स्वरूप समजण्यापूर्वी त्या गोष्टींविषयी समाजांत कल्पनांचा अभावच असतो असें नाही, तर चुकीच्या कल्पना असतात. ज्ञानाभाव नसून ज्ञानाभास असतो. ज्ञानास ज्ञानाभासाची कोंडी फोडून बाहेर पडावे लागतें. चुकीच्या समजुतीवर पुष्कळांचे पोट किंवा उत्पन्न किंवा महत्त्व अवलंबून असतें. असा प्रकार झाला म्हणजे विज्ञानेतिहासाला धार्मिक, सामाजिक किंवा राजकीय इतिहासाचें स्वरूप येऊं लागतें, व विज्ञानेतिहासहि बराच मनोरंजक होतो.
जगाचा वैज्ञानिक इतिहास लिहितांना त्या इतिहासांचा प्रारंभीचा भाग सामान्य प्रकारच्या वाङ्मयांतून काढला पाहिजे. एवढेंच नव्हे तर ज्ञानाचा परिणाम ज्या वास्तुशिल्पादि वस्तूंवर होतो त्या वस्तूंवरून काढला पाहिजे. हा इतिहास काढतांना ज्या प्रकारच्या साहित्याशीं आपली गांठ पडते तें साहित्य अनेक प्रकारचें आहे आणि तें सर्व देशांत सांपडतें. आपणांस वाङ्मयें व ती उत्पन्न करणारी राष्ट्रें यांच्या एकंदर कर्तृत्वाचा हिशोब घेतला पाहिजे. बरेंचसें ज्ञानेतिहासबोधक साहित्य सर्वसामान्य वाङ्मयांतून किंवा विशिष्ट पारमार्थिक संप्रदायांच्या वाङ्मयांतून विखुरलेलें सांपडतें. पारमार्थिक संप्रदायांच्या वाङ्मयांत केवळ ईश्वरविषयक गोष्टी नसतात, तर ज्यांस आपण ज्ञान किंवा उच्च प्रकारचे विचार म्हणूं अशा प्रकारचें साहित्य असतें. या कारणामुळें अनेक पारमार्थिक संप्रदायांकडे आणि जगद्विषयक सिद्धांत काढूं पहाणार्या तत्त्ववेत्यांच्या ग्रंथांकडे आपणांस पाहिले पाहिजे. हे संप्रदाय व त्यांस अनुसरणारे तत्त्ववेत्ते पंडित एकाच देशांत किंवा एकच भाषेंत ग्रंथ निपजविते झाले नाहित. चिनी, संस्कृत, आरबी, ग्रीक, लाटिन, इंग्रजी, जर्मन इत्यादि सर्व प्रकारच्या प्राचीन आणि अर्वाचीन भाषांमधून या विषयास सजविणारें वाङ्मय सापडतें. विचार संप्रदाय जे निर्माण होतात ते निरनिराळ्या भाषांमधून दृग्गोचर होतात त्यामुळें आपणासं एखाद्या विचारसंप्रदायाची परंपरा पहाण्यासाठी अनेक भाषांतील ग्रंथांकडे जावें लागतें.