प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
 
पूर्वाजितपरीक्षण:-  जगाच्या विचारक्रमाच्या इतिहासाचें आपणांस पर्यालोचन तर अवश्य आहे; तथापि त्या पर्यालोचनांत आपलीं मतें बहकूं न देणें हें त्याहूनहि अवश्य आहे. हिंदुस्थानामध्यें आज अभ्यास इंग्रजी भाषेच्या साहाय्यानें होतो, आणि त्यामुळे त्या भाषेच्या योगाने विचाराला परकीय बंधन उत्पन्न होते, ते आपल्या बोकांडी बसत आहे. जुन्या विचारक्रमांत पुष्कळदां हें झालें आहे की, शास्त्रीय ज्ञानाचा, म्हणजे वस्तूंच्या पृथक्करणमूलक, सादृश्यासादृश्यज्ञानमूलक आणि व्यवस्थितदर्शनमूलक ज्ञानाचा विकास होण्यापूर्वीच, आणि हे ज्ञान संपादन करण्यास लागणारी यांत्रिक साधनशक्ति उत्पन्न होण्यापुर्वीच जो अजमासी विचार झाला तोच "विचार"  "फिलॉसफी" (इंग्रजी शब्द घेऊन त्या शब्दांचे भाषांतर करून त्या शब्दांनां कांहीं तरी अर्थ आहे असें समजणारे लोक त्याला तत्त्वज्ञान शब्द वापरतात.) या नांवानें बोधिला जाऊन सध्यां तो हिंदुस्थानांतील बर्‍याचशा भोळसर अध्यापकांच्या तोंडांतुन विद्यार्थ्यांवर निष्कारण लादला जात आहे. फिलॉसफी काय चीज आहे ती ठरली नाहीं. या शब्दावर फिदा होणारी मंडळी आपल्या इष्ट विचारसमुच्चयास हा शब्द लावतात. फिलॉसफी या शब्दांत मावणारा विचारसमुह एकाच्या मतानें एक तर दुसर्‍याच्या मतानें दुसरा आहे. वस्तूंनां ओळखून त्यांनां शब्द लावणें ही शास्त्रीय पद्धति टाकून देऊन एका आवडत्या शब्दाचा आपणास आवडता कांहीं तरी अर्थ उत्पन्न करणें, या पंडिती मोहापासून सुटका न झाल्यामुळें हा शब्द कायम ठेविला आहे; व निरनिराळ्या देशाचे व निरनिराळ्या बौद्धिक संप्रदायांचे लोक त्या शब्दाची अर्थकक्षा आपल्या इच्छेप्रमाणें आंखीत आहेत. परंपरागत मूर्खपणाच्या तावडीतून सुटूं इच्छिणार्‍या भारतीयांनी "फिलॉसफी"  नांवानें युरोपांतून येणार्‍या बर्‍याचशा मूर्खपणाच्या जाळ्यांत आपण सांपडणार नाहीं अशी खबरदारी घेतली पाहिजे. सध्यां हिंदुस्थानांतील अनेक युनिव्हर्सिट्यांत व कालेजात फिलॉसफी नावांचा विषय असतो; आणि त्या विषयाचे अध्यापक युरोपियन पंडितसंप्रदायांतील मूर्खपणाची फळी फोडून निघाले नाहींत असें मोठ्या खेदानें म्हणावें लागतें. इग्रंज "फिलासफी" चा अध्यापक आपला मूर्खपणा येथें शिकवितो, आणि त्या मुर्खपणाचीच परंपरा विद्यापीठांतील हिंदुस्थानी लोक शिकतात.