प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.

ज्ञानक्षेत्रविषयक स्थूल कल्पना.– विज्ञानेतिहास सांगण्यापूर्वी तो इतिहास मनोरम करण्यासाठी आणि त्या इतिहासांतर्गत विकासाचे नियम स्पष्ट करण्यासाठीं वाचकांस ज्ञान व त्याचा सामाजिक संबंध यांविषयी कांही गोष्टींची स्थूल कल्पना पाहिजे. त्या गोष्टी येणेप्रमाणें :

(१) ज्ञान म्हणजे काय, शास्त्र म्हणजे काय, ज्ञान वाढत कसें जातें, ज्ञान वाढत असतां व नवीन ज्ञान आणि जुनें ज्ञान यांचे एकीकरण होत असतां काय क्रिया होतात, ज्ञान बरेच जमलें म्हणजे त्याची रचना कशी करतात, इत्यादि गोष्टींविषयी सामान्य कल्पना अभ्यासकास पाहिजेत. त्या कोणत्याहि एका संस्कृतींतील ज्ञानविकासाच्या अभ्यासानें मनुष्यास अवगत होतील.

(२) ज्ञानाच्या इतिहासांत मनुष्याच्या अहंकारमूलक अभिमानानें शास्त्र व शास्त्रद्वेष्टे यांत किंवा शास्त्राचे जुने उपासक व नवीन उपासक यांत द्वैत कसें उत्पन्न होतें, तसेंच ज्ञानक्षेत्रांत भिन्नसंप्रदाय कसे उत्पन्न होतात याविषयीं सामान्य कल्पना पाहिजेत. त्या ज्ञानविकास आणि ज्ञानाचें मनुष्याकडून ग्रहण या बाबतींत कांहीं धागे स्पष्ट करतील.

(३) ज्ञानाच्या इतिहासांत त्याच्या प्रसाराच्या इतिहासाचा अंतर्भाव होतो. ज्ञान दोन राष्ट्रांत निरनिराळ्या काळीं उत्पन्न झालें तर दोन राष्ट्रांच्या बौद्धिक परंपरा निरनिराळ्या असणार. राष्ट्राच्या संनिकर्षानें व ज्ञानाच्या प्रसारानें त्या भिन्न परंपरा एकत्रित होऊन जागतिक ज्ञानाचें एकत्व स्थापन व्हावयाचें तें स्थापन होतांना काय काय क्रिया होतात हाहि एक महत्त्वाचा विषय आहे. ज्या राष्ट्रांची संस्कृति अति-राष्ट्रीय होते त्या राष्ट्राच्याच इतिहासाचा तो केवळ भाग नव्हे. दुसरें राष्ट्र तें ज्ञान ग्रहण कसें करतें हा देखील इतिहासाचा विषय आहे. ग्रहण करणारें राष्ट्र जर विकसितवाङ्‌मय-विहीन असलें तर तें राष्ट्र नवीन ज्ञान त्या भाषेबरोबरच घेईल व ज्ञानग्रहण करणारी भाषा ज्ञानप्रसारक भाषेची एक तर्‍हेची उपभाषा बनेल. उदाहरणार्थ, द्राविडी लोकांनीं संस्कृत भाषेंत गढलेल्या ज्ञानाचें ग्रहण केलें त्यामुळें द्राविडी भाषांच्या स्वरुपावर विशिष्ट परिणाम झाला. ज्ञानाचा प्रसार होऊन, व्यापक संस्कृति बनत असतां तींत होणार्‍या क्रिया देखील इतिहासविषय आहेत.

(४) विज्ञानेतिहास हा मनुष्येतिहासाचा भाग आहे. ज्ञान उत्पन्न होतें तें मनुष्य आपल्या गरजा पुरवीत असतां किंवा जिज्ञासा तृप्‍त करून घेण्याकरितां जे शोध करतो त्या शोधाचें फल होय. विशिष्ट ज्ञान उत्पन्न झालें म्हणजे त्या ज्ञानाचा फायदा मनुष्य व्यवहारांत घेऊं लागतो अशी परिस्थिति असल्यामुळें विज्ञानेतिहास हा मनुष्येतिहाचा केवळ भागच आहे एवढेंच नव्हे तर मनुष्येतिहासाचा कारकहि आहे.

सारांश विज्ञानेतिहास आणि जगाचा एकंदर राजकीय आणि आर्थिक इतिहास यांची संगति जुळविली पाहिजे.

या चार मुद्यांवर थोडें अधिक विवेचन करुं. तें करावयाचें म्हणजे ज्ञानाचा विकास कसा झाला हें ज्ञानवृद्धीचा पूर्वेतिहास पाहून सांगावे लागेल आणि सांगतांना सामान्य प्रकारचें ज्ञान, आणि शास्त्रीय ज्ञान यांचा संबध स्पष्ट करावा लागेल; आणि शास्त्राची उभारणी कशी होते, नवीन ज्ञानाचें उत्पादन कसें होते, जमलेल्या ज्ञानाची मांडणी कशी करतात, या क्रियांचें स्पष्टीकरण करावें लागेल. या विवेचनांत स्पष्टीकरणाचे आणखी विषय म्हटले म्हणजे प्रयोग, अवलोकन, वस्तूंच्या अन्योन्याश्रयाचें शोधन. कार्यकारणभावाचें अवगवन, अवलोकनदोषनिवारणासाठीं यंत्रांचा उपयोग, व सामुच्चयिक अवलोकन, अनेक शास्त्रांचा म्हणजे ज्ञानक्षेत्रांचा एकमेकांशी संबंध, हे होत. प्रत्यक्ष आणि अनुमान यांच्या अल्पत्वामुळें किंवा अधिक्यामुळे होणारे ज्ञानक्षेत्रांत परिणाम म्हणजे एका सिद्धांतापासुन दुसरे सिद्धांत काढणे. या पद्धतीनें होणारी शास्त्रांची वाढ, व निव्वळ या पद्धतींवर भिस्त ठेवणारी मी मांसेसारखी शास्त्रें व त्यांपासून भिन्न दिसणारी मुख्यत: अवलोकनावर रचलेलीं शास्त्रे, या दोहोंचे विवेचन विज्ञानेतिहासावर प्रकाश पाडूं पहाणार्‍या प्रस्तावनेत पाहिजे, तसेंच शास्त्रप्रगतीस व्यत्यय उत्पन्न करणारे अनेक प्रकारचे अहंकार वाचकांस अवगत हवेत. शिवाय वाचकांच्या हेंहि लक्षांत आलें पाहिजे की, शास्त्रवर्धनाचें कारण ज्ञानक्षेत्रांकडे वारंवार अवलोकन हेंच नव्हे तर शास्त्राचा विषय जे भाव त्यांमध्येंहि एकसारखा फरक होत आहे हें होय.

शास्त्रांच्या इतिहासामध्यें केवळ शब्दांच्या अर्थाविषयीं अनिश्चयामुळें किंवा एकाच भावाचा नामनिर्देश करण्यासाठी भिन्न शब्द वापरल्यामुळें जे ज्ञानसंचयांत घोटाळे उत्पन्न होतात, त्यांच्या इतिहासाचें जरी नाहीं तरी त्या घोटाळ्यांच्या स्वरूपाचें ज्ञान वाचकांस पाहिजेच.

शास्त्रांचा विकास होत असतां प्रत्येक कालखंडांत मनुष्याची, वस्तूंचें अस्तित्व आणि परिणामांचें कारण स्पष्ट करण्यास लावली जाणारी जी विचारशक्ती तींत अनुमान काढण्याच्या शक्तींत होणारे फरक देखील आपल्या लक्षांत येऊन विज्ञानेतिहास अवगमिला पाहिजे. तर विज्ञानेतिहास शास्त्र म्हणून लेखिल्या जाणार्‍या गंभीर पूस्तकांतूनच केवळ काढावयाचा नसुन मनूष्यकृतींतून काढावयाचा असतो. यासाठीं कला म्हणून असलेल्या गोष्टी किंवा मनुष्योपयोगी गोष्टी यांकडे लक्ष दिंले पाहिजे. मनुष्याच्या क्रिया याच ज्या शास्त्रांचा भाग ती शास्त्रें कलांपासुन निराळीं करणें कठीण जातें. असो.