प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
जीवनतत्त्वविषयक ज्ञान:- हल्ली ज्याला आपण जीवनशास्त्राविषयींचें ज्ञान म्हणून म्हणतों तसल्या प्रकारचें ज्ञान रोजच्या व्यवहारांतील प्रत्यक्ष अवलोकनानें मिळविण्याची संधि आद्यकालीन मानवांत विपुल होती. यामुळें प्लेटोनें आपल्या अंतीद्रियविज्ञानज्ञास्त्रामध्यें ज्या दोन कल्पनांना प्रमुख स्थान दिलेलें आहे, त्या साधर्म्य आणि वैधर्म्य या दोन कल्पना मनुष्यप्राण्याच्या मनांत आरंभापासूनच उदित झालेल्या असल्या पाहिजेत, याबद्दल शंका घेण्याचें कारण नाहीं. पुढील विवेचनांत लवकरच आपणांस दिसून येईल कीं, प्रत्यक्ष अवलोकनानें जे सामान्य सिद्धांत अमदी प्रथम माणसाच्या लक्षांत आले, त्यापैकींच वरील दोन साधर्म्य व वैधर्म्य या संबंधाचे सिद्धांत होत; आणि म्हणूनच या सिद्धांतांना मनुष्याच्या मनांतील नैसर्गिक किंवा जन्मसिद्ध कल्पना व सर्वत्र ( अखिल मानवजातींत ) दिसून येणार्या कल्पना असें मानण्यांत येऊं लागलें. उदाहरणार्थ, पृथ्वीवरील निर्जीव पाषाण आणि सजीव पदार्थ यांच्यामधील फरक अत्यंत हीन बुद्धीच्या आद्यकालीन माणसांनां दिसून आला नसेल अशी कल्पना करणें शक्य नाहीं. म्हणून सजीव पदार्थ व निर्जीव पदार्थ असे दोन वर्ग प्रागैतिहासिक काळांतच माणसांनीं केले असले पाहिजेत. आतां हेंहि खरें आहे की, आद्यकालीन नूतन शास्त्रज्ञांनी, ज्या सूर्यचंद्रग्रहवायुविघुदादिकांना आपण निर्जीव मानतों, त्यांनांहि सजीव मानलें असेल; आणि उलट पक्षी वृक्षलतादि वनस्पतीनां निर्जीव मानलें असेल. पण उदाहरणार्थ, पाषाण आणि लांडगा यांतला ढळढळीत निर्जीवसजीव हा भेद त्यांनां माहीत होता की नाही याबद्दल शंका घेण्यांचें बिलकुल कारण नाहीं. नंतर आणखी एक पाऊल पुढें जाऊन हें एक पाऊल पुढें पडण्यास कदाचित् शेंकडों, हजारों वर्षेंहि लागली असतील मानवप्राण्याची बुद्धि इतक्या दर्जाला पोहोंचली असावी कीं, तिच्या साहाय्यानें एखादा आद्यकालीन आरिस्टॉटलनें किंवा लिनॉसनें मासे, पक्षी, व लोंकर असलेला पशु यांच्यामधील साधर्म्य व वैधर्म्य नीट ओळखिलें असेल. इतक्या कल्पना येण्यास तात्त्विक विचार करण्याची मानवी बुद्धीची शक्ति बर्याच उच्च दर्जाला पोहोंचावयास पाहिजे हें खास आहे. पक्षी किंवा झाड या पृथक् पृथक कल्पना दर्शविणारे शब्द सु कित्येक मागसलेल्या रानटी जातींच्या लोकांच्या भाषांमध्ये नाहीत असें आपणांस आजहि आढळून येतें. यामुळें आपणांस असें मानणें भाग आहे की, प्राचीन काळांतील अधिकांत अधिक बुद्धिमत्ता असलेल्या माणसांच्या अंगीसुद्धां वर वर्णन केलेल्या प्रकारची पात्रता येण्यास कित्येक युगें जावी लागली असतील; तथापि त्याबरोबर हेंहि नि:संशय आहे की, आपल्या ऐतिहासिक काळाच्या पूर्वीच बहुत काळ आद्यकालीन मानवजातीची तितकी मानसिक उन्नति झालेली होती. तात्पर्य प्रागैतिहासिक कालीन मानवांनी मासे, पक्षी, व लोंकर असलेले पशू यांचे शास्त्रीय द्दष्टया वर्गीकरण करून जीवनशास्त्राभ्यासक या नात्यानें उच्च दर्जा गांठलेला होता.