प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.     
 
त्याचीं साधनें:-  याप्रमाणें संज्ञाकोशाची आवश्यकता कळून आल्यावर संज्ञाकोशाचीं साधनें कोणतीं हें पाहिलें पाहिजे. यापूर्वीच कित्येक लेखकांनी व संस्थांनी या बाबतींत प्रयत्‍न केले आहेत, व त्यांनीं मिळविलेल्या फळांवर सर्वांचीच सत्ता असल्यामुळे संज्ञाकोश करतांना योग्य तो त्यांचा उपयोग करुन घेतला पाहिजे, पूर्वगामी प्रयत्‍नांपैकीं रानडे व हिदीं साहित्यसभा यांनी केलेल्या प्रयत्‍नांचा प्रामुख्यानें उल्लेख केला पाहिजे. रानडे यांच्या कोशाचा निर्देश अगोदर केलाच आहे. हिंदी साहित्यसभेनें कांही वर्षांमागे एक शास्त्रीय संज्ञाकोश प्रसिद्ध केला आहे. तो बराच उपयुक्त असला तरी पुरेसा नाहीं. त्यांतील संज्ञांची संख्या अगदींच नियमित आहे. नवीन संज्ञाकोश निदान त्याच्या चौपट तरी होईल. असो. याशिवाय निरनिराळ्या लेखकांनी जीं पुस्तकें लिहिलीं आहेत ( उ. कै. प्रा. बा. प्र. मोडककृत रसायन व पदार्थविज्ञान शास्त्रावरील पुस्तकें), किंवा मासिकांत लेख लिहिले आहेत, त्यांतहि त्यांनी कारणपरत्वें पुष्कळ नवीन संज्ञा उपयोगांत आणल्या आहेत. त्याहि पाहणें जरूर आहे. याप्रमाणें गणित, वैद्यक, रसायन, पदार्थविज्ञान, भूस्तर, प्राणिशास्त्र, शेतकी, ज्योतिष वगैरे सर्व शास्त्रीय विषयांवरील हल्लींचें मराठी वाङ्‌मय शोधल्यास पुष्कळ संज्ञा मिळूं शकतील. त्या सर्व संज्ञा जमविल्यानंतर एकाच अर्थी निरनिराळ्या लेखकांनी भिन्न भिन्न संज्ञा वापरल्या असल्यास, त्यांपैकी चांगली संज्ञा निवडून काढतां येईल. अशा निवडलेल्या संज्ञांचीहि पुन्हां छाननी करावी लागेल. कारण पुष्कळ संज्ञा चुकीच्या वापरल्या गेल्या आहेत असें आढळून आलें असून, एक वेळ केलेली चुक विशेष कारणाशिवाय तशीच राहूं देणें इष्ट नसल्यामुळें ती दुरूस्त करणें प्राप्‍त आहे. नवीन संज्ञा बनवितांना जुन्या व लोकांस परिचित अशाच संज्ञा कायम करण्याचे धोरण शक्य तर ठेवावे;  त्यायोगाने नवीन संज्ञा वापरल्यामुळें होणारा घोटाळा टळतो. परंतु घोटाळा होण्याचा संभव पत्करूनहि कांही प्रंसगी चुका दुरूस्त कराव्या लागतात. कायद्यांतील दृष्टांत घेतल्यास, बरेच दिवस अमलांत असलेला निवडा थोडाबहुत चुकीचा असला तरी जज्जाला त्याला मान्यता द्यावी लागते; व त्याचा विरुद्ध निकाल देंता येत नाहीं. कारण, तसें करण्यापासून लोकांचा घोटाळा होण्याचा संभव असतो. परंतु तोच निवाडा नवा असेपर्यंत त्याविरूद्ध निकाल देऊन तो सहज कुचकामाचा करतां येतो. जुना निवाडा अगदीच बेकायदेशीर असला, तर मात्र तो केवऴ जुना आहे या सबबीवर त्याला मान्यता दिली जात नाहीं. त्याशीं विसंगत निकाल देतां येतो. त्याचप्रमाणें नवे व फार परिचयांतले नसलेले शब्द थोडेहि चुकीचे असले तरी ते काढून टाकून त्यांऐवजीं नवीन शब्द निर्माण करावे लागतील.

येणेंप्रमाणें संज्ञाकोशाची साधनें कोणतीं याविषयी वर विवेचन केलें. त्याचाच थोडक्यांत सारांश देऊन हा विषय संपवितों.

शास्त्रीय लेखनांत विषय आटपशीरपणे लिहितां यावा म्हणून विशिष्ट क्रिया, गुणधर्म, अथवा स्थिति इत्यादींचा दर्शक लहानसा आटोपशीर शब्द वापरतात. या शब्दाला "संज्ञा" असें म्हणतात. कोणत्याहि भाषेंतील संज्ञा घेतल्यास त्यांचे तीन वर्ग पाडतां येतात. क्रिया, गुणधर्म इत्यादींशीं मुळींच संबंध नसणार्‍या, म्हणजे ज्यांनां मूळ अर्थ कांहींच नाही अशा संज्ञा; व या दोहोंशिवाय इतर संज्ञा. पहिल्या संज्ञा सर्वांत चांगल्या असें कांही म्हणतात, तर इतरांच्या मतें दुसर्‍या उत्तम ठरतात. परंतु तिसर्‍या प्रकारच्या संज्ञा कनिष्ट दर्जाच्या होत. संज्ञांचे हे तीन वर्ग, संज्ञांच्या मूळ अर्थाचें त्यांनां नवीन दिलेल्या अर्थांशी असलेलें नातें पाहून ठरविले आहेत. परंतु परक्या भाषेंतील संज्ञांशी सदृश अशा मराठी संज्ञा बनवितांना संज्ञांचें वर्गीकरण निराळ्या धोरणावर करावें लागतें. त्या धोरणानुसार, जशाच्या तशाच ठेवलेल्या संज्ञा, अपभ्रष्ट संज्ञा, भाषांतररुप संज्ञा, व अन्वर्थक संज्ञा असे संज्ञांचे वर्ग पाडतां येतील. पैकीं भाषान्तररुप संज्ञा करणें विशेष श्रेयस्कर नाही. अन्वर्थक संज्ञा बनविणें चांगलें, मात्र त्या बनवितांना मूळ संज्ञेची अर्थकक्षा नीट पाहून अव्याप्ति अतिव्याप्ति दोष टाळावे.

मराठी भाषेंत सध्यां संज्ञांचा बराच अभाव आहे. पुष्कळ विषयांचे लेखन संज्ञांच्या अभावी जड जात आहे. तें सुलभ करण्याकरितां संज्ञाकोश तयार केला पाहिजे. आजपर्यंत रानडे, व हिंदी साहित्यसभा यांनीं संज्ञा तयार करण्याचे प्रयत्‍न केले आहेत. परंतु त्यांचा प्रयत्‍न अपुरा आहे, व कित्येक ठिकाणीं त्यांत दोषहि राहिले आहेत.

याशिवाय रा.कृ.शं. दीक्षित यांची ज्योतिःशास्त्र— परिभाषेवर व रा. ल. ग. साठे यांची रासायनिक परिभाषेवर अशा दोन पारिभाषिक शब्दांच्या याद्या विविधज्ञानविस्ताराच्या ग्रंथ ४४ व ४५ यांत प्रसिद्ध झाल्या आहेत. रा. दा. ना. आपटे यांनी विद्युत् शब्दकोश म्हणून एक स्वतंत्रच लहानसें पुस्तक प्रसिद्ध केलें आहे. त्याप्रमाणें नुकताच एक गुजराथींत छोटासा ग्रंथ तयार झाला असून, रा. भरतराम भानु सुखराम मेहेता यांनीं शास्त्रीय संज्ञांवर दहाव्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या वेळी एक निबंध वाचुन दाखविला. शेवटच्या दोहोंवर पुण्याचे धुंडिराज दीक्षित यांनी विविधज्ञान विस्तारांत (१९२२ फेब्रूवारी) एक अभिप्रायात्मक लेख प्रसिद्ध केला आहे. या सर्व गोष्टी परकीय शास्त्रें देशीभाषांत आणण्यासाठी संज्ञांची अडचण लोकांस कशी भासते हें व यावर थोडासा विचार आपल्या देशांतील सुशिक्षित लोक करूं लागले आहेत हें दाखवितात.

असो, वर दिलेल्या भाषांतरतत्त्वांवरून भाषांतराबरोबर ज्ञानशुद्धि ही क्रिया कांही अंशी कशी काय होते हें लक्षांत येईल. महाराष्ट्रीय ज्ञानकोशरचनेंत प्रस्तुत तत्त्वें शक्य तितकीं अवलंबावयाचीं आहेत. ह्या तत्त्वांचे अवलंबन सोपें नसल्यामुळें अवलंबनाचा निश्चय करुनहि जेथें तत्त्वें अवलंबिलीं गेली नाहींत असे प्रसंग पुष्कळ येणार; तथापि स्वतःच्या तत्त्वांचा अवलंब न केल्यामुळें येणार्‍या असंगतीच्या दोषाला न भितां तत्त्वें अगोदर मांडली आहेत याचें कारण हेंच कीं आमच्या कृतीपेक्षां तत्त्वांस आह्मीं अधिक महत्त्व देतों.