प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.      
 
प्रागैतिहासिक काल —  इतिहासपूर्व किंवा प्रागैतिहासिक काल असे शब्द इतिहासलेखक वापरतात. साधारणपणें हा शब्द प्रत्येक राष्ट्राच्या इतिहासाचे कालभाग पाडतांना लावतात. पण या शब्दांनी मानवाच्या आयुष्यक्रमांतील एक विशिष्ट काल सांगतां येणार नाहीं. इसवी शकापूर्वीं हजार वर्षें हा काल जगांतील अनेक राष्ट्रांच्या इतिहासांच्या दृष्टीनें प्रागैतिहासिक ठरेल. पण इजिप्‍त किंवा बाबिलोनिया यांच्या दृष्टीनें हा संस्कृतिविकासानंतरचा काल ठरेल. तर प्रागैतिहासिक मानव हे शब्द जगाच्या इतिहासाच्या दृष्टीनें जरा जपून वापरले पाहिजेत. असुरी आणि इजिप्‍त या संस्कृतींपूर्वीच्या कालांत अनेक राष्ट्रें बरींच मागसलेलीं असावींत.

प्रागैतिहासिक या शब्दानें मागसलेला, रानटी असा अर्थ सुचित केला जातो असा समज प्रचलित आहे; उलटपक्षीं शास्त्र हें सुधारलेल्या काळांत निर्माण होत असतें असें आपण समजतों. परंतु नीट विचार केल्यास या शब्दप्रयोगांत कांहीं एक विरोध नाहीं; कारण एक तर, ज्याला आपण ऐतिहासिक काल म्हणतों तो सुरू होण्यापूर्वीच बहुत काल मनुष्यप्राणी रानटी स्थितींतून बाहेर पडून चांगला सुधारला होता, म्हणजे कांहीं ज्ञानसंचय अगोदरच आला होता. शास्त्र हें सुधारणेनंतर उत्पन्न होत असतें ही गोष्टहि तितकीच खरी आहे. या विधानाची सत्यता बरोबर लक्षांत येण्याकरितां, प्रथम, शास्त्र म्हणजे काय हें आपण पाहिलें पाहिजे. शास्त्र हा शब्द आपल्या रोजच्या बोलण्यांत किती वेळां तरी येत असतो; पण त्या शब्दाचा अर्थ काय, ह्याबद्दल कोणी क्वचितच विचार करतो. तथापि या शब्दाचा अर्थ मोठा कठीण आहे असें मात्र नाहीं. थोडा लक्षपूर्वक विचार केल्यास असें दिसून येईल कीं, शास्त्र या शब्दानें पुढील तीन गोष्टींची बोध होतो. पहिली गोष्ट, प्रत्यक्ष अवलोकनानें माहिती जमविणें; दुसरी गोष्ट, त्या माहितीचें वर्गीकरण करणें; आणि शेवटीं या वर्गीकरणाच्या मदतीनें सर्वसामान्य कल्पना किंवा तत्त्वें ठरविणें. शास्त्र म्हणजे सुव्यवस्थित  मांडलेली माहिती, ही हर्बर्ट स्पेन्सरची व्याख्या सर्वांच्या परिचयाची आहेच.