प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
भाषांतर आणि मुळांतील शास्त्रवर्गीकरण— ज्ञानाचें पात्रांतर करतांना किंवा भाषांतर करतांना विज्ञानरचनाविषयक तत्त्वें लक्षांत घ्यावी लागतात; आणि भाषांतरकारापुढें खालील प्रश्न उभे राहतात :-
जें शास्त्र पृथक म्हणून मूळ ग्रंथकारानें मानलें आहे तें शास्त्र, किंवा मूळ ग्रंथांतील वाक्यें ज्या ज्ञानरचनापरंपरेचा अंश आहेत ती परंपरा ही आपणांस मान्य आहेत काय ? मान्य आहे किंवा नाही हें ठरवावयाचें तें केवळ मूळ ग्रंथांतील अथवा परंपरेंतील विचारांची परस्परसंगति पाहून ठरवितां येणार नाही. त्या विचारसमूहांची संगति अगर असंगति ज्ञानवाहक उर्फ भाषांतरकार आपल्या लेखांत पूर्वज्ञानरचना परंपरेशी संबद्ध जे जे शब्द वापरतो, अगर आपल्या वाचकांस जी विचारपरंपरा मान्य आहे असें गृहीत धरतो, किंवा निदान जी जुनी विचारपरंपराच काढून टाकण्याचा प्रयत्न करीत नाहीं, त्या विचारपरंपरेशी परकीय शास्त्राचें पृथक्त्व संगत आहे किंवा नाहीं, हे पाहून ठरवावी. कां की, लेखक जी भाषा अथवा जे शब्द वापरणार, ती भाषा व ते शब्द जुन्या विचारपरंपरेशी इतके निगडित झालेले असतात की, भाषांतरकारास पूर्वपरंपरेपासून अलिप्त राहण्याचें स्वातंत्र्य ठेवीतच नाहीत. भाषांतरकाराला एक तर जुने सर्वच शब्द काढून टाकून नवीनच शब्दसृष्टि करावी लागेल, किंवा जुन्या परंपरेच्या सुत्रांनी बद्ध व्हावे लागेल. या दोहोंमध्यें, दुसरी गोष्ट अधिक सुलभ आहे. परकीय ज्ञान आपल्या शब्दरचनेशीं जुळणार नाही तर घेऊं नये असा याचा अर्थ नाही. ज्ञानवाहकास ज्ञान हें अवश्य होय. ज्ञानाचें वर्गीकरण व घटना यांविषयी विकल्प म्हणजे स्वेच्छनियमनाची शक्यता आहे. तर त्यानें अमुक विशिष्ट नांव असलेल्या शास्त्रांत जें ज्ञान दिलेलें आहे ते ज्ञान कसें वर्गीकरण करावें याविषयी पूर्णपणें स्वातंत्र्यबुद्धि ठेविली पाहिजे. या स्वातंत्र्यबुद्धीचें प्रयोजन येणेंप्रमाणे :-
(अ) सध्यांच्या ज्ञानाचीं वर्गीकरणें अनेक आहेत. इंग्लंड मधील एका विशिष्ट वर्गीकरणाशींच हिंदुस्थानांतील लेखकांचा परिचय होतो. इंग्लंडांतील वर्गीकरणें फ्रान्समध्ये अगर जर्मनीमध्यें मान्य नाहीत.
(आ) ज्ञानवर्गीकरणाचीं तत्त्वें वारंवार बदलतात. उदाहरणार्थ ज्ञानाचें वर्गीकरण जें करावयाचे तें अभ्यासक्षेत्रांतील वस्तूंच्या सादृश्यविसादृश्यावरून करावयाचें, की अभ्यासनिष्पादितज्ञानांर्गत सादृश्यविसादृश्यावरून ठरवावयाचें हें निश्चित झालें नाहीं. अभ्यासास प्रारंभ वस्तूंवरून होतो, आणि निष्पादित ज्ञानाचें वर्गीकरण मागून होते; आणि तें झाल्यानंतर वस्तूंवरून झालेल्या वर्गीकरणाच्या प्रयोजनासंबंधानें संशय उत्पन्न होतो; आणि कालांतरानें दुसरें वर्गीकरण अस्तित्वांत येऊं पहातें.
(इ) पाश्चात्त्य शास्त्राच्या आजच्या स्थितीत ज्या शास्त्राचें आडनांव बदललेलें आहे, परंतु दत्तविधान पूर्ण झालें नाहीं अशींहि शास्त्रें आहेत. दत्तविधानाच्या अस्पष्टतेमुळें या शास्त्रांचा विषय कोणता याविषयी तंटे सुरू आहेत. उदाहरणार्थ "स्टॅटिस्टिक्स," हें शास्त्र घ्या. शब्दाचा अर्थ मुत्सद्दयाचें शास्त्र असा आहे. परंतु मुत्सद्दयाला सर्वांत जास्त महत्त्वाचा अभ्यास कोणता अशी चर्चा करीत करीत कांहीं महत्त्वाच्या मुत्सद्दी शास्त्रज्ञांनीं असें ठरविलें कीं, निरनिराळ्या देशांच्या राजकीय परिस्थितिनिदर्शक गोष्टीसंबंधाच्या आंकड्यांचा अभ्यास महत्त्वाचा; असें होऊन आंकड्यांच्या अभ्यासास प्राधान्य आलें. आंकड्यांचा अभ्यास करण्याची पद्धति जितक्या निरनिराळ्या अभ्यासक्षेत्रांत लावतां येईल, तितका लावण्याचा प्रयत्न सुरू झाला. अर्थात् पुढें असा वाद उपस्थित झाला कीं, ज्या गोष्टींचें मुत्सद्दयांस विशेष प्रयोजन नाही परंतु ज्यांचा आंकडेपद्धतींनी अभ्यास झाला आहे तो अभ्यास "स्टॅटिस्टिक्स" शास्त्रांत मोडतो किंवा नाहीं. पुढें त्याचें परिवर्तन 'स्टॅटिस्टिक्स' हें केवळ आंकडेशास्त्र आहे कीं समाजशास्त्राचा भाग आहे या वादविवादांत झालें. म्हणजें अंकांनी अभ्यास करण्याची पद्धति आणि मुत्सद्दयाला ज्यांचा अभ्यास अवश्य आहे अशा गोष्टी या दोन गोष्टींचा अर्थाअर्थी संबंध नसतां, त्या एका नांवाखालींच दडपल्या गेल्या आहेत; आणि एका अर्थाच्या अभिमानी गृहस्थांस दुसर्या विषयांस ढकलून देण्याची इच्छा झाली आहे; अशी तडफड अजून चालू आहे.