प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
महाराष्ट्राची वैज्ञानिक महत्त्वाकांक्षा:- जगाचे एक अवयव या नात्यानें आपलें एक महत्त्वाचें कार्य म्हटलें म्हणजे जगाच्या ज्ञानाच्या बरोबर आपल्या समाजाचा ज्ञानसंचय आणणें. आपल्या राष्ट्रास बौद्धिक अधोगति प्राप्त झाली आहे ती घालविणें हा ज्ञानकोशरचनेचा मुख्य हेतु आहे. पण तो एकाएकीं साध्य व्हावयाचा नाहीं. ग्रंथमर्यादा, साहित्य आणि महाराष्ट्रांत उपलब्ध असलेलें पांडित्य या गोष्टींवर यशापयश अवलंबुन राहणार. ज्ञानकोश हें सर्व प्रयत्नाचें फल, तसेंच उत्तरकालीन प्रयत्नाचा प्रारंभ होय. आपले शास्त्रज्ञ जगांतील शास्त्रज्ञांच्या तोडीचे झाले पाहिजेत एवढेंच नव्हे तर आपल्या सामान्य जनतेवर वाढत्या शास्त्रज्ञानाचा संस्कार झाला पाहिजे. सामान्य जनतेस शास्त्रीय ज्ञानाचें बाळकडूं मिळाल्याशिवाय देशांत मोठमोठे शास्त्रज्ञ उत्पन्न होण्यास अवकाश नाही. आणि सामान्य जनता शास्त्राशी अनभिज्ञ असतां शास्त्रज्ञान जरी उत्पन्न झालें तरी त्याचा समाजास फारसा फायदा मिळणार नाहीं. कोणी नवीन शोध केला तरी त्याचा फायदा परके लोक घेणार. शास्त्राचा प्रत्यक्ष उपयोग अनेक प्रकारच्या व्यवहारांत होतो. शास्त्राच्या साहाय्यानें बाजारांतील वस्तु निर्माण करण्याची खटपट शक्य होणें हे, मोठमोठे व्यापारी, भांडवलवाले या प्रकारच्या लोकांनां त्या शोधाचें व्यावहारिक स्वरूप समजून त्यांत फायदा आहे कीं, तोटा आहे, हें जाणण्याइतकें शास्त्रज्ञान वाढलें असण्यावर अवलंबून आहे. अर्थात् शास्त्रज्ञान सार्वत्रिक झालें पाहिजे. तें सर्वजनसमाजामध्यें वाढविलें पाहिजे. येथें हेंहि सांगितले पाहिजे की, शास्त्रीय ज्ञान देश्य भाषेंत आल्याशिवाय त्याचा लोकांत प्रसार होणें शक्य नाहीं. परकी भाषा शिकून ज्ञान पैदा केलें तरी तें देशांत चिरस्थायी होणार नाही. असे समजावे. परकीय ज्ञान स्वदेशी भाषांत आणण्याचें काम जितकें सोपें वाटतें तेवढें मात्र नाही. सध्यां भाषांतरें करणारा वर्ग गचाळपणानें भाषांतरे करीत आहे.