प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
भाषांतरशास्त्र:- भाषांतर म्हणजे एका भाषेंत जें आहे तें दुसर्या भाषेनें व्यक्त करणें. भाषांतर करण्यासाठी जो ग्रंथ आपण घेतला असेल त्या ग्रंथाचा अभ्यास जितका सूक्ष्म होईल तितकें भाषांतरहि यथामूल होईल. ग्रंथाचा अनेक अंगांनीं अभ्यास झाला पाहिजे. म्हणजे भाषांतरांत मूळचीं अनेक अंगे स्पष्ट करितां येतील.
भाषांतर करण्यासाठीं लेखक ज्यावेळेस प्रवृत्त होतो त्यावेळेस त्याचा कांही विशिष्ट हेतु असतो. मुळ ग्रंथाचें सर्व तर्हांनी ज्ञान करून देणें हा त्याचा हेतु नसतो. हेतूंची भिन्नता आणि त्यामुळें उत्पन्न ज्ञालेले लेखनभेद हे लक्षांत येण्यासाठीं कांहीं उदाहरणें घेतों.
(१) प्राचीन इजिप्त देशांतील मनोर्यावरील, अगर ऋग्वेदांतील, अगर अवेस्तामधील उतार्यांचे भाषांतर.
(२) परक्या भाषेंतील कादंबर्यांचे अगर नाटकांचे भाषांतर.
(३) परक्या भाषेंतील शास्त्रीय ग्रंथांचे भाषांतर.
याप्रकारें ग्रंथभेदावरून व भाषांतर करण्याच्या हेतूवरून भाषांतरांच्या स्वरूपाचा विचार करावा लागतो. प्राचीन शिलालेखांचें, किंवा कोर्टापुढें येणार्या कागदांचें जितकें मूललेखस्वरूपज्ञानदायक भाषांतर होईल तितकें चांगले.
जो ग्रंथ शास्त्रीय किंवा विचारप्रवर्तक आहे त्या ग्रंथाचें भाषांतर करण्यासाठीं निराळी तत्त्वें लावलीं पाहिजेत. विशिष्ट ग्रंथाची माहिती करून देण्याचा हेतु येथें नसतो, तर विशिष्ट विषयाची माहिती करून देणें हा असतो.
परक्या भाषांतून शास्त्रीय किंवा ऐतिहासिक ग्रंथांचें भाषांतर करणारांनी हें लक्षांत ठेवावें की, भाषांतर करणें, म्हणजे एका राष्ट्रास असलेली माहिती अगर त्याच्या कल्पना हीं दुसर्या राष्ट्रांत नेणें होय; आणि भाषांतरासाठी भाषांतर करणारांनी ज्ञानाचे पात्रांतर कसें करावें याची तत्त्वें लक्षांत घेतलीं पाहिजेत.
एखाद्या ग्रंथाचे भाषांतर करतांना, भाषांतरकर्त्यानें खालील गोष्टींचा विचार करावा:-
(१) ग्रंथकर्त्याचा कोणतें ज्ञान वाचकांस अवगत करून देण्याचा विचार आहे ?
(२) वाचकांस कोणत्या गोष्टी अवगत आहेत असे भाषांतरासाठी घेतलेला ग्रंथकार गृहीत धरतो ?
(३) भाषांतरकर्ता अगर वक्ता ज्या वाचकवर्गास अगर श्रोतृवर्गास प्रवचन करीत आहे, त्या वर्गास मूळ ग्रंथकारानें पूर्वज्ञान म्हणून गृहीत धरलेल्या गोष्टी अवगत आहेत काय ?