प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.          
 
प्रागैतिहासिक शास्त्रज्ञानाचीं व्यंगें:- वरील एकंदर वर्णनावरून असें दिसून येईल कीं, अलीकडे अनेक शास्त्रें मिळून विद्यादेवीची जी टोलेजंग भव्य इमारत उभारण्यांत आली आहे, तिचा मूळ पाया प्रागैतिहासिक काळांतील मानवजातीच्या ज्ञानानें व अनुभवानेंच घातलेला आहे. पूर्वीच्या काळांतील असंख्य पिढ्यांनीं ज्ञानाच्या बाबतींत कांहीच करून ठेविलें नसतें तर ऐतिहासिक काळांत जी सुधारणेची इतकी वाढ झालेली आहे तितकी झाली नसती. आद्यकालीन मानवांच्या मनावर निरनिराळ्या शास्त्रींय प्राथमिक तत्त्वांचा संस्कार झालेला नसता तर अलीकडील नवे नवे शास्त्रीय शोध इतक्या लवकर लागले नसते. म्हणून आपल्या प्रागैतिहासिककालीन पूर्वजांनी करून ठेवलेल्या शास्त्रीय ज्ञानाच्या प्रगतींतील कामगिरीबद्दल त्यांचा आपणांस योग्य शब्दांत गौरव करणें जरूर आहे. परंतु या बाबतीत न्यायाचा कांटा समतोल रहावा म्हणून या विषयाची दुसरी बाजूहि विचारांत घेतली पाहिजे. येथपर्यंत आद्यकालीन मानवांनां कोणत्या गोष्टी माहीत होत्या त्याचा हिशोब घेतला. परंतु शास्त्रीय रीत्या कार्यकारणमीमांसा किंवा उपपत्ति बसविणें यासंबंधानें त्यांनीं काय केलें याचें वर्णन फारसें आलें नाही. कारण तसा सृष्टिव्यापारांची कारणे शोधून काढण्याचा प्रयत्‍न म्हणजे अनुभव घेऊन नंतर त्यावरुन सामान्य सिन्त ठरविणें हा होय; व तसेंच सतत करीत राहिल्यानें खर्‍या शास्त्रीय ज्ञानाची प्रगति होत असते. परंतु ही सामान्य सिन्त प्रस्थापित करण्याची मानवी मनाची प्रवृत्ति मर्यादेबाहेर जाण्याचा फार संभव असतो. हीच चुक आद्यकालीन मानवांच्या हातून घडली. त्यांनी प्रत्यक्ष अवलोकन करून त्यावरून तर्कपद्धतीनें अनुमानें काढून सामान्य सिन्त ठरविण्याचा प्रयत्‍न चालविला होता; पण आपली अनुमानपद्धति तर्कशास्त्रशुद्ध आहे कीं नाहीं, हें त्यांनी प्रत्येक वेळ लक्षपूर्वक पाहिलें नाहीं. आपलीं ज्ञानप्राप्तीची साधने किती मर्यादित आहेत ही गोष्ट त्यांच्या लक्षांत आली नव्हती. कित्येक गोष्टीचे परिणाम सतत एकसारखेच होत असल्याचें पाहण्यांत आल्यावरून त्यांनी त्यांच्या मधील कार्यकारणभाव निश्चित ठरविला. संनिकृष्ट कारणें समजल्यानंतर त्याच गोष्टीचीं विप्रकृष्ट कारणें शोधून काढण्याचा त्यांनी यत्‍न चालविला. लहान बालकाप्रमाणें त्यांचें मन, ‘ असें कां ? ’ असा प्रश्न सतत करीत राही व बालकाप्रमाणें उघड उत्तर मिळावें अशी त्यांची अपेक्षा असे, सृष्टीतील पंच महाभूतें त्यांनां त्रास देऊं लागलीं, वारा व पाऊस त्यांनां अडथळा करूं लागला आणि मेघगर्जना व वीज ही त्यांच्या जिवावर सकंट आणूं लागलीं. तेव्हा त्यांनां मानवी शत्रूंचीच आठवण होऊन पंचमहाभूतांचा त्रास होण्यासहि कोणी अज्ञात पण दुष्ट चिद्रूप व्यक्ति कारण असावी असें वाटूं लागलें, शास्त्रीय ज्ञानाच्या कोणत्याहि क्षेत्रांत कार्यकारणपरंपरा लावीत गेलें म्हणजे अखेर कारणरहित अशा कांही मूळ गोष्टी गृहीत धराव्या लागतात ( म्हणजे स्पेन्सरचा अज्ञेयवाद स्वीकारावा लागतो ) विद्युत् ही शक्ति काय प्रकारची आहे हा प्रश्न व त्याचप्रमाणें इतर अनेक अवघड शास्त्रीय प्रश्न आधुनिक काळांतील शास्त्रीय ज्ञानाच्या प्रगतीमुळें सुटले आहेत; ते प्रश्न आद्यकालीन मानवांनां सोडवितां आले नव्हते. आणि आधुनिक पद्धतीप्रमाणें शास्त्रीय संशोधन करून ते प्रश्न सोडवीत बसण्याचा धिमेपणाहि त्यांनी दाखविला नाहीं. सर्व शास्त्रीय प्रश्नांची उत्तरें मिळावी अशी त्यांनां घाई व तीं शोधून काढण्याचा त्यांनी हव्यास धरला. हें आपलें विश्व अनेक अदृश्य शक्तींनी भरलेलें आहे, या अदृश्य व्यक्ती माणसाप्रमाणेंच बोलतात चालतात, फक्त मानवांइतकें त्यांचें शक्तिसामर्थ्य मर्यादित नसतें. अशा तर्‍हेची दैवतकोटी आहे असें मानून सृष्टीतील सर्व चमत्कार या अदृश्य शक्ती घडवून आणतात असा उलगडा त्यांनी लाविला. मनुष्याचें क्षणभंगुर जीवित पाहून तर अतिमानुष व्यक्तीच्या अस्तित्वाबद्दलची कल्पना मानवजातीला अधिकाधिकच पटत गेली. स्वत:च्या शरीरांत आत्मा म्हणून एक भाग असतो व तो शरीर मृत होतें त्या वेळी त्यांतून बाहेर पडून स्वेच्छेनुसार परिभ्रमण करीत राहतो; अशा तर्‍हेच्या कल्पना आद्यकालीन मानवांना तर्कशास्त्रशुद्ध आहेत असें वाटूं लागलें व या अदृश्य व्यक्ती पृथ्वीवरील सजीव माणसांच्या सुखदु:खाला कारण होतात अशी त्यांनी ठाम समजूत करून घेतली. आपल्या बुद्धिमत्तेचा शास्त्रीय पद्धतीनें उपयोग करूनच सृष्टिव्यापारांची कारणें म्हणून त्यांनी अदृश्य व सर्वशक्तिमान् अशा व्यक्तींचे आस्तिक्य प्रस्थापित केलें. हे सामान्य सिन्त असंख्य पिढ्यांतील लोकांनां मान्य होत जातां जातां प्रागैतिहासिक काळांतच त्यांनां त्रिकालाबाधित अशा शास्त्रीय सितांचें स्वरूप प्राप्त झालें. या सिताचा पुढें मानव जातीच्या मनावर इतका जबरदस्त पगडा बसला कीं, त्यांनां जन्मसि कल्पनांचें (इन्नेट आयडियाजचें) स्वरूप प्राप्त झालें. हे सिद्धांत ज्या गोष्टी अवलोकन करून ठरविले गेले होते, त्यांपैकीं बहुतेक गोष्टीची कारणें अगदीं निराळीं असल्याचें अलीकडील शास्त्रीय शोधांवरून सिद्ध झालें आहे. पण जुनी कारणपरंपराच सामान्य जनांच्या मनांत खिळून बसलेली असल्यामुळें तिचें उच्चाटन करण्याचें काम अत्यंत बिकट आहे. सर्व ठिकाणी व सर्व काली असले चुकीचे परंपरागत सिन्तच शास्त्रीय ज्ञानाच्या प्रगतीला अत्यंत अडथळा करीत आहेत. मनुष्यगुणांचा अध्यारोप करून कल्पिलेलीं दैवतें आधारास घेऊन तत्त्वज्ञानासंबंधाच्या निरनिराळ्या पद्धती निघाल्या आहेत, या बहुतेक पद्धतीनी आत्मा अविनाशी आहे हें तत्त्व स्वीकारलेलें आहे; इतकेंच नव्हे तर तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रांतील देव, आत्मा इत्यादि गोष्टीसंबंधाचे धार्मिक व पवित्र प्रश्न चिकित्सक व संशयवादी शास्त्रीय संशोधकांनी बिलकुल हाती न घेतां तत्संबंधी तत्वज्ञान्यांनी पूर्वीच ठरवून ठेविलेले सिन्त बिनहरकत निमूटपणें मान्य करावे असाहि त्यांचा आग्रह आहे. परंतु वास्तविक पाहतां आत्मा व दैवतें यांचें आस्तिक्य सिद्ध करणारा अल्पहि असा पुरावा आज अस्तित्वात नाहीं किंवा नव्हता कीं जो शुद्ध शास्त्रीय संशोधनाच्या व शुद्ध तर्कशास्त्रपद्धतीच्या कसोटीस टिकेल. अशी वस्तुस्थिति आहे तरीहि कित्येक भोळ्या भाविकपणाच्या समजुती प्रागैतिहासिक काळांतील लोकांच्या मनांत जितक्या दृढ होत्या तितक्याच त्या चालू काळांतहि बहुजनसमाजाच्या मनांत खिळून बसलेल्या आहेत. ऐतिहासिक काळांतील लोकांवर प्रागैतिहासिक काळांतील पूर्वजांचे शास्त्रीय ज्ञानाच्या प्रगतीच्या बाबतीत किती उपकार झालेले आहेत तें ठरवीत असतांना उपरिनिर्दिष्ट अहितकारक परिणामहि लक्षांत घेणें जरूर आहे.